पाटणे, जगन्नाथ शिवराम
जगन्नाथ शिवराम पाटणे ऊर्फ भाऊसाहेब यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झाला. लहानपणापासून आईच्या संस्कारामुळे आणि शिक्षणामुळे माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी त्यांना मिळाली होती. त्या काळात खेडमध्ये एकही शिक्षणसंस्था नव्हती. एकच शिक्षक चौथीपर्यंत मुलांना शिकवायचा, त्यानंतर मुलांना खेड सोडून बाहेर शिक्षणासाठी जावे लागत होते. त्यामुळे खेड तालुक्यात चांगल्या शिक्षणसंस्था उभ्या राहिल्या पाहिजेत असा ध्यास भाऊसाहेबांनी घेतला होता. भाऊसाहेबांनी खेडमध्ये सर्वप्रथम माध्यमिक शाळा सुरू केली. त्यासाठी त्यांनी १९४२ मध्ये खेड व्यापारी धर्मादाय एज्युकेशन सोसायटीची स्थापनाही केली. १९५२ ते १९५९ पर्यंत सोसायटीच्या संचालक पदाची धुरा त्यांनी सांभाळली. दातार महाविद्यालयाच्या नियामक मंडळावर तसेच चिपळूणच्या ‘दी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या’ व्यवस्थापन समितीचे ते सदस्य होते. पुणे विद्यापीठाच्या सिनेटवरही सदस्य म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले.
खेड्या-पाड्यातील जनतेमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी १९४५ मध्ये खेड नगर वाचनालयाची स्थापना केली. त्यानंतर ते आयुष्यभर या संस्थेचे सल्लागार म्हणून काम पाहात होते. संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे १९५७ मध्ये ते खेडचे आमदार झाले त्यापूर्वी त्यांनी खेड नगराध्यक्ष पदही भूषविले होते. खेड अर्बन बँकेचे प्रथम सचिव नंतर संचालक म्हणून त्यांनी १९४१ पासून काम पाहिले. त्यानंतर १९७६ पासून दहा वर्षे ते अर्बन बँकेचे संचालक होते. त्यांच्या पत्नी सरला पाटणे या सुद्धा खेड अर्बन बँकेच्या संचालक होत्या. भाऊसाहेबांनी दलितांसाठी केलेल्या कार्याची दखल राज्यशासनाने घेऊन १९८२ - ८३ मध्ये त्यांना ‘दलितमित्र’पुरस्कार ही प्रदान करण्यात आला. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि भाऊसाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खेडमध्ये जगन्नाथ कॉम्प्लेक्स ही उभारण्यात आले. खेड तालुक्याचा कायापालट करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.