Skip to main content
x

लेले, वामन केशव

         डॉ. वामन केशव लेले हे संस्कृतकाव्यशास्त्र आणि पाश्चात्त्य शैलीशास्त्र यांचे गाढे अभ्यासक आणि समीक्षक होते. त्यांना मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिन्दी आणि गुजराती अशा पाच भाषा अवगत होत्या. मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषांमधील अधिकारी विद्वान म्हणून त्यांचा लौकिक होता. अध्यापन आणि अध्ययन यांबरोबरच त्यांनी अनेक गंभीर व संशोधनपर ग्रंथ लिहिले. ते ग्रंथ देशविदेशांत मान्यता पावले.

विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या योजनेच्या अंतर्गत पुणे, नागपूर व मराठवाडा विद्यापीठांमध्ये पाश्चात्त्य शैलीशास्त्र आणि मराठी साहित्यह्या विषयावर व्याख्याने देऊन त्यांनी अभ्यासकांच्या मनांत जिज्ञासा उत्पन्न केली या प्रयत्नांमुळे कालांतराने महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांनी शैलीशास्त्र हा एक स्वतंत्र विषय म्हणून आपापल्या एम.ए.च्या अभ्यासक्रमांत समाविष्ट केला.

वा.के. लेले यांचा जन्म मुंबईत कुर्ला येथे झाला. केशव बाबूराव लेले हे त्यांचे वडील. ते नामवंत शिल्पकार व सुवर्णपदकांचे मानकरी होते. त्यांच्या शिल्पांची प्रदर्शने त्या काळात परदेशांतही भरत असत. चिकाटी आणि नेटक्या कामाचे संस्कार त्यांच्यावर वडिलांकडूनच झाले. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मी. कोकणातील मुटाट हे लेल्यांचे मूळ गाव. डॉ. वामनराव लेले यांचे प्राथमिक शिक्षण दादरला म्युनिसिपल शाळेत झाले आणि हायस्कूलचे शिक्षण पिंटो व्हिला हायस्कूल (हल्लीचे किंग जॉर्ज राजा शिवाजी विद्यालय) येथे झाले. त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांना मॅट्रिकनंतरचे संपूर्ण शिक्षण नोकरी सांभाळून करावे लागले. कारण, थोरला मुलगा या नात्याने आई आणि धाकटा भाऊ यांची जबाबदारी त्यांच्यावरच होती. मॅट्रिक झाल्यावर लगेचच ते एल.आय.सी.मध्ये नोकरी करू लागले. सकाळचे महाविद्यालय आणि पूर्ण वेळ नोकरी असा त्यांचा दिनक्रम असे. इतके कष्ट करूनही त्यांनी प्रथम श्रेणी मात्र सोडली नाही. एम.ए.ला मराठी विषय घेऊन मुंबई विद्यापीठात प्रथम श्रेणी प्रथम क्रमांकाने मिळवून त्यांनी न.चिं. केळकरसुवर्णपदक पटकावले आणि वडिलांचा वारसा राखला.

एम.ए. झाल्याबरोबर १९५७ मध्ये मुंबईला ना.दा. ठाकरसी महिला विद्यापीठात त्यांनी मराठी आणि संस्कृत शिकविण्यास प्रारंभ केला. चार वर्षांनंतर म्हणजे १९६१ मध्ये ते बनारस हिंदू विद्यापीठात मराठी विषयाचे विभागप्रमुख म्हणून गेले. हे स्थलांतर त्यांच्या संस्कृत साहित्यशास्त्राच्या सखोल अभ्यासाचा पाया ठरले. कारण, तेथील वास्तव्यात त्यांना अनेक शास्त्री-पंडितांचा सहवास लाभला. भारतीय काव्यशास्त्राची उत्क्रान्ती : प्रथम युगहा त्यांचा प्रबंध त्याच अभ्यासाचे फलित होते. या प्रबंधाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी स्वत: अभ्यास करून मार्गदर्शिका, शिवाय प्रबंधरचना करून, तो बनारसहून पुणे विद्यापीठात सादर केला. त्याकरिता त्यांना महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांची परवानगी मिळवावी लागली. त्यांच्या प्रबंधाचे परीक्षक होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व डॉ. रा.बा. आठवले. त्यांचा हा प्रबंध म्हणजे काव्यशास्त्राच्या प्रथम युगाचा धांडोळा चिकित्सक पद्धतीने घेणारा एक छोटा ज्ञानकोशच आहे. हा प्रबंध त्यांनी मुद्रित स्वरूपात विद्यापीठाला सादर केला व पुढे यथावकाश तो ग्रंथरूपात प्रसिद्ध झाला. पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट प्रबंधाबद्दल डॉ. य.वि. परांजपे पारितोषिक आणि न.चिं. केळकर पारितोषिक डॉ. वामनराव लेले यांना १९६९-१९७० मध्ये  मिळाले. १९७० मध्ये महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन या ग्रंथाचा यथार्थ गौरव केला. त्या वेळी ते बनारस येथेच होते. बनारस हिंदू विद्यापीठात मराठी विभागाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले.

महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये शैलीशास्त्र हा विषय सुरू करण्यास जसे ते कारणीभूत ठरले, त्याचप्रमाणे अतिशय जिद्दीने, अडचणींवर मात करून बनारस हिंदू विद्यापीठातही एम.ए.च्या अभ्यासक्रमात त्यांनी थशीींशीि डीूंश्रळीींळली रवि ळीीं अिश्रिळलरींळिि हा नवीन विषय सुरू केला आणि पुढे अनेक वर्षे शिकविला. बनारसला असतानाच स्वत:चा व्यासंग, अध्यापन, पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यांबरोबरच त्यांचे लेखनही सतत चालू होते. साहित्यशास्त्र, शैलीशास्त्र इत्यादी विषयांवर सखोल अभ्यास करून त्यांनी वीस ग्रंथ लिहिले. त्यांपैकी कविकण्ठाभरण’, ‘भारतीय काव्यशास्त्राची उत्क्रान्ती’, ‘काव्यशास्त्र व संस्कृती’, ‘ललितलेखन व शैली’, ‘ज्ञानेश्वरीचा शास्त्रीय अभ्यास’ (ढहश ऊलिीींळशि षि ींहश ढरिीींर्रूीज्ञींळी) कलेतिहास व रसग्रहण’, ‘औचित्य सिद्धान्तआणि औचित्यविचारचर्चाया ग्रंथांचा विशेषत्वाने उल्लेख करावयास हवा. १९९३ मध्ये सेवानिवृत्त होऊन ते पुण्याला स्थायिक झाले. त्यानंतर २००६ पर्यंत त्यांनी आणखी बारा ग्रंथांची निर्मिती केली. त्यांची ग्रंथरचना प्रामुख्याने मराठी, इंग्रजी व हिन्दी या भाषांमध्ये आहे. डॉ. वामनराव लेले यांनी लिहिलेल्या शोधनिबंधांपैकी १४० निबंध निरनिराळ्या ठिकाणी प्रकाशित झाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या एकूण बत्तीस ग्रंथांपैकी तेरा ग्रंथांना पुरस्कार प्राप्त झाले. त्यांत महाराष्ट्र शासनाने चार, तर केन्द्र सरकारचा विश्वविद्यालयस्तरीय मौलिक ग्रंथासाठीचा १९८१ मध्ये मिळालेला पुरस्कार यांचाही समावेश आहे. याखेरीज, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणेतर्फे, ‘अमृत महोत्सव विशेष पारितोषिक१९६९ मध्ये व नंतर १९७१ व १९७६ मध्ये पुन्हा दोन पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले. काशी हिन्दू विश्वविद्यालयाने (वाराणसी) ५ सप्टेंबर २००१ रोजी मानपत्र व विश्वविद्यालयाचे बोधचिन्ह देऊन निष्ठावान शिक्षक म्हणून त्यांचा सुयोग्य सन्मान केला. निरनिराळ्या सतरा देशी व विदेशी नियतकालिकांमध्ये त्यांचा अल्प वा विस्तृत परिचय प्रसिद्ध झालेला आहे.

२००१ ते २००६ या कालावधीत त्यांनी मराठी-इंग्रजी व्यावहारिक वाक्यकोशभाग १, , ३ यांची निर्मिती केली. वयाची सत्तरी ओलांडली तरी त्यांचे लेखन सातत्याने चालूच होते. राजहंस प्रकाशनाने त्यांचे तीन वाक्यकोश प्रकाशित केले. त्या वेळी लिहिलेल्या एका पत्रात दिलीप माजगावकरांनी असे म्हटले होते,

एक विषय अभ्यासासाठी निवडला, की त्याचा तळ गाठायचा आणि लेखन इतकं चिरेबंदी करायचं, की समीक्षकाला त्याची पसंतीची टाळी वाजवावीच लागेल, असं तुमचं काम असतं.आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते सतत अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि लेखन यांत मग्न होते. ते अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांचे सभासद होते. त्यांनी केलेले लेखन हे पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असेच आहे. सुंदर हस्ताक्षर, शिस्तबद्ध लेखन, चिकाटी, उत्तम वक्तृत्व आणि वैचारिक समीक्षण ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये होत. त्यांच्या अखेरच्या आजारपणातही त्यांनी प्राचीन भारतीय वाङ्मयीन संस्कृतीहा ग्रंथ लिहिला, पण तो प्रसिद्ध होऊ शकला नाही. त्यांचे पुण्यात निधन झाले.

डॉ. रोहिणी केतकर

लेले, वामन केशव