Skip to main content
x

बागूल, देवीदास तुकाराम

     देवीदास बागूल यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील सटाणे तालुक्यात झाला. शिक्षण नाशिक येथे झाले. एच.पी.टी. महाविद्यालयातून त्यांनी १९५८ साली एम.ए.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुण्याच्या फर्गसन व बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजात त्यांनी मराठीचे अध्यापन केले. पुढे अध्यापन सोडून त्यांनी पत्रकारितेत प्रवेश केला. ‘साधना’ साप्ताहिकात काही काळ उपसंपादक म्हणून काम पाहिले. पुस्तकाची मांडणी करण्यातील तज्ज्ञ व उत्तम छायाचित्रकार म्हणून त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. पॉप्युलर, ओरिएन्ट लाँगमन्स या प्रकाशन संस्थांत त्यांनी डिझायनर म्हणून काम केले.

     ‘आस्तिक नास्तिक’ (१९७२), ‘लौकिक ज्ञानेश्वरी’ (१९७७), ‘नवे बालसंगोपन’ (१९८९), ‘माझी छायाचित्रकला’ (१९८५) अशा विविध विषयांवरील त्यांची वीस-एक पुस्तके आहेत. बालवाङ्मयाचा आढावा घेणारे त्यांचे ‘बालवाङ्मय’ (१९६०) हे पुस्तक महत्त्वाचे म्हणता येईल. देवीदास बागूल यांनी लिहिलेली ‘शैशवदूत’ (१९४९), ‘मोहोरणारी झाडे’ (१९६०) ही बालवाङ्मयाची पुस्तके शैलीच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहेत.

     - संपादक मंडळ

बागूल, देवीदास तुकाराम