Skip to main content
x

ठोकळ, प्रभाकर

               १९४० नंतरच्या अर्ध्या शतकातील मराठी मासिकांच्या ऊर्जितावस्थेने व्यंगचित्रांना मोठा वाव देणारी संधी उपलब्ध करून दिली. प्रामुख्याने शहरी, निमशहरी वाचक असलेल्या या मासिकांमुळे या समाजाच्या जीवनावर आधारित असलेल्या व्यंगचित्रनिर्मितीला उत्तेजन मिळून अनेक व्यंगचित्रकार उदयाला आले. प्रभाकर ठोकळ हे त्यांपैकी एक होत. तत्कालीन उपलब्ध साहित्यातील, तसेच साहित्यिकांच्या व कवींच्या व्यक्तिगत संदर्भांचा वापर करून त्या आधारे विडंबनात्मक विनोदी व्यंगचित्रण करणे हे ठोकळांचे खास वैशिष्ट्य होय.

              अकोला जिल्ह्यातील अकोट येथे जन्मलेल्या प्रभाकर ठोकळांची सुरुवातीची तेरा वर्षे पुसद येथे मामाकडे, आजोळी गेली. तिथल्या शाळेतच त्यांना चित्रकलेची आवड लागली. ‘आपल्याला विनोदाचा वारसा मामांच्याकडून मिळाला,’ असे ठोकळ म्हणत. नंतर ते अकोटच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाले. तेथील चित्रकलाशिक्षक एन.व्ही. कळीकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे धडे घेतले.

              ठोकळांना लहानपणापासून असलेली वाचनाची मनस्वी आवड मामांच्या घरी बाइंडिंग करून ठेवलेल्या ‘किर्लोस्कर’ व ‘स्त्री’च्या अंकांनी, तर नंतर अकोटच्या सार्वजनिक वाचनालयाने पुरवली. हरी नारायण आपटे यांच्यापासून फडके, खांडेकरांपर्यंतच्या लेखकांचे ललित साहित्य, तसेच कोल्हटकरांपासून गडकरी, बोकिलां-पर्यंतचे सर्व विनोदी साहित्य त्यांनी तेथेच वाचून काढले.

              शं.वा. किर्लोस्करांची ‘टाकाच्या फेकी’तील व्यंगचित्रे आणि हरिश्चंद्र लचके यांची हास्यचित्रे यामुळे ते स्वतः व्यंगचित्रे काढायला उद्युक्त झाले आणि चित्रकलेचे प्राथमिक धडे शाळेत असतानाच गिरवले असल्यामुळे, त्याच्या जोरावर त्यांनी व्यंगचित्रे रेखाटायला सुरुवात केली ती अखंडपणे चालू ठेवली. त्यामुळे ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’सारख्या प्रस्थापित मासिकांपासून ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘वसंत’, ‘वाङ्मयशोभा’, ‘आवाज’, इ. अनेक अंकांमधून त्यांची व्यंगचित्रे प्रकाशित होत राहिली.

              ठोकळांची व्यंगचित्रे मध्यमवर्गीयांच्या जीवनप्रसंगांवर असत. अशा परिचित प्रसंगांना ठोकळांच्या चित्रांतून दिलेली कलाटणी मराठीतील सामान्य वाचकालासुद्धा पाहताक्षणी समजेे आणि त्याची तत्काळ हसून दाद मिळे. याबरोबरीने त्यांच्या अनेक व्यंगचित्रांचे नायक-नायिका लेखक-कवी असत किंवा चित्रित केलेल्या प्रसंगाला साहित्यातील संदर्भ जोडून त्यामधून विनोद निर्माण केलेला असे. काव्यातील रोमँटिक पातळी व त्याच्या विरोधात प्रत्यक्ष वास्तवातील गद्य, रूक्ष, व्यावहारिक पातळी या दोन परस्परविरोधी गोष्टी एकत्र आणून वाचकाला एका अनपेक्षित अनुभवाची प्रचिती ठोकळ त्यांच्या व्यंगचित्रांतून देत, तेव्हा त्यांच्या कल्पकतेला रसिकांची मनापासून दाद मिळे. या प्रकारची ठोकळांची व्यंगचित्रे इतकी बहुसंख्य आहेत, की मराठीतील व्यंगचित्रकलेमधले त्यांचे ते एकमेव वैशिष्ट्य म्हणून गणले जावे.

              प्रभाकर ठोकळांच्या सर्वच व्यंगचित्रांमधले रेखाटन मोजक्या, पण बिनचूक रेषांतून केलेले, पर्स्पेक्टिव्ह शास्त्रानुसार निर्दोष असलेले असते. त्यामुळे चित्र म्हणून वाचकापर्यंत पाहताक्षणी पोहोचते. जवळजवळ सर्वच व्यंगचित्रांबरोबर मजकूर असल्यामुळे वाचकांसाठी त्यामधला अर्थ व अपेक्षित गंमत कळायला कठीण होत नाही. त्यांच्या व्यंगचित्रांच्या लोकप्रियतेचे हे एक प्रमुख कारण म्हणता येईल.

              ठोकळांनी एवढी विपुल निर्मिती शासनाच्या महसूल विभागात उपनिबंधक/निबंधक या पदांवर विदर्भात विविध ठिकाणी नोकरी करीत असताना केली हे लक्षात घेतले की, व्यंगचित्रकलेतील त्यांची बांधीलकी कौतुकास्पद वाटते. ते १९८६ मध्ये सेवेतून निवृत्त झाले.  त्यांच्या व्यंगचित्रांचा १९७१ मध्ये ‘ठोकळ चित्रे’ हा संग्रह ‘किस्त्रीम बुक क्लब’तर्फे प्रकाशित झाला आहे. ते १९९७ ते १९९९ या काळात ‘कार्टूनिस्ट कंबाइन’ या संस्थेचे अध्यक्ष होते.

- वसंत सरवटे

ठोकळ, प्रभाकर