Skip to main content
x

आगाशे, मोहन महादेव

        त्यजित राय यांच्याकडून आपल्या अभिनयाच्या जोरावर भारतातील बुद्धिमान नटअसा गौरव मिळवलेले एक ज्येष्ठ अभिनेते म्हणजे डॉ. मोहन आगाशे. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भोर या गावी झाला. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी १९७० साली बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून मेडिसिन आणि सर्जरीया विषयात एम.बी.बी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण केली. १९७५ मध्ये त्यांनी मानसशास्त्रीय वैद्यकशास्त्रामध्ये डी.पी.एम. ही पदविका घेतली आणि १९७८ साली डॉक्टर ऑफ मेडिसिन इन सायकिअ‍ॅट्री (एम.डी.) ही पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी मनोविकृतिशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले, तसेच पुण्यातील ससून रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून आपल्या रुग्णांशी विश्‍वासाचे नाते निर्माण केलेले होते.

खरे तर त्यांनी लहानपणातच सई परांजपे यांच्या बालनाट्यांमधून कामे करायला सुरुवात केली होती, पण त्यांना अभिनयाची खरी ओळख झाली, ती महाविद्यालयीन जीवनात. याच काळात त्यांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभागी होत प्रार्थनासरहद्दया एकांकिका गाजवल्या. यातूनच त्यांना नाटकांमध्ये कामे करण्याची संधी मिळाली. १९५८ मध्ये त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेतील डाकघरया नाटकात काम केले, तर प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी १९६८ मध्ये धन्य मी कृतार्थ मीया नाटकात काम करायला सुरुवात केली. १९७० मध्ये अशी पाखरे येतीया नाटकाचा प्रयोग सुरू असताना त्यांच्या नाकावर पडलेला प्रकाशाचा किरण पाहून जब्बार पटेल यांनी विजय तेंडुलकर लिखित घाशीराम कोतवालमधला नाना फडणवीस मोहन आगाशे यांच्यामध्ये शोधला. जब्बार पटेल यांचा नाना फडणवीस या व्यक्तिरेखेचा हा शोध सार्थ होता, हे मोहन आगाशे यांनी बुद्धिचतुर व कामातुर वृत्तीचा नाना फडणवीस, आब राखत साकारून दाखवून दिले. इतिहातील व्यक्तिरेखा वर्तमानात साकार करताना लागणारी सजगता डॉ. मोहन आगाशे यांनी या नाटकात सातत्याने सांभाळलेली दिसते. तब्बल २० वर्षे त्यांनी हे नाटक प्रयोगशीलपणे केले. ८०० च्या आसपास प्रयोग झालेले हे नाटक परदेशात होण्यामागे डॉ. मोहन आगाशे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. या नाटकाच्या परदेशी झालेल्या सर्व प्रयोगांची आखणी, बांधणी व आयोजन डॉ. मोहन आगाशे यांनी फार आस्थेने व आत्मीयतेने केली. हे सगळे करण्यामागे आपल्याला परदेशात जायला मिळावे एवढा मर्यादित हेतू नव्हता, तर त्या निमित्ताने विविध देशांशी सांस्कृतिकसंबंध प्रस्थापित करण्याचा तो प्रयत्न होता. आपल्या एकूणच नाट्यसृष्टीच्या कालखंडात त्यांनी तीन चोक तेरा’ (१९६६), ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ (१९६८), ‘राजा नावाचा गुलाम’ (१९६९), ‘क्षण झाला वैरी’ (१९६९), ‘तीन पैशाचा तमाशा’ (१९७८), ‘बेगम बर्वे’ (१९७९) सावर रे’ (१९९९), ‘वासांसी जीर्णानी’ (२०००) या नाटकांमधूनही कामे केलेली आहेत, तर काटकोन त्रिकोण’ (२०१०) या नाटकाचे त्यांनी जवळपास २५० च्या आसपास प्रयोग यशस्वीपणे केले.

नाटकाशी एकनिष्ठपणे बांधले गेलेल्या डॉ. मोहन आगाशे यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले ते सामना’ (१९७५) या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटातून. यात त्यांनी मारुती कांबळेची छोटी पण प्रभावी भूमिका पार पाडली. पण त्यांच्या अभिनय कारकिर्दीला झळाली आली ती, ‘जैत रे जैत’ (१९७७) या चित्रपटातील आदिवासी नाग्यामुळे. देवत्व मिळवण्यासाठी स्वत:च्या विकारांवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात असणारा नाग्या त्यात यशस्वी झाल्यावर, साप चावलेल्या वडिलांचा मृत्यू आपल्या देवत्वामुळे टळेल अशी श्रद्धा बाळगतो. परंतु वडिलांच्या मृत्यूमुळे त्याच्या श्रद्धेचा अपेक्षाभंग होतो व देवत्व या संकल्पनेबरोबर त्याचा एक नवीन विरोधाभासात्मक संघर्ष सुरू होतो आणि श्रद्धाळू नाग्याचे ध्येयवेड्या वृत्तीच्या नाग्यात परावर्तन होते. श्रद्धाळूपणा, देवत्वाविषयी आत्मीयता व आपल्या वडिलांचा मृत्यू रोखण्यात अपयश आल्यामुळे देवाने केलेल्या अन्यायामुळे त्याला आपण शिक्षा दिली पाहिजे या भावनेने सतत जागरूक राहणे व त्याला आवश्यक असणारे वर्तन करणे हा नाग्या या व्यक्तिरेखेला अभिप्रेत असणारा प्रवास डॉ. मोहन आगाशे यांनी सक्षमपणे साकारला आहे, तो त्यातील भाषिक वैशिष्ट्यांसह. नाग्याच्या भूमिकेमुळे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या परिचयाच्या झालेल्या डॉ. मोहन आगाशे यांचा पुढचा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे सिंहासन’ (१९८०). बुधाजीराव या राजकीय नेत्याची त्यांनी साकारलेली भूमिकाही वैशिष्ट्यपूर्ण होती.

एक होता विदूषक’ (१९९२) या चित्रपटातील रगेल वृत्तीच्या हिम्मतराव इनामदाराची भूमिका त्यातील बारकाव्यांसह डॉ. मोहन आगाशे यांनी साकारली. या व्यक्तिरेखेच्या अंतर्गत वृत्तीतील रगेलपणा त्यांनी आपल्या डोळ्यांच्या हावभावातून व्यक्त केलेला आहे. पण हा रगेलपणा व्यक्त करणाऱ्या मोहन आगाशे यांनी कथा दोन गणपतरावांची’ (१९९६) या चित्रपटात मैत्रीच्या नात्यातील आपपरभावाचा आविष्कार आपल्या आंगिक अभिनयातून घडवला. आपल्या मित्रावर असणारे प्रेम भांडणातूनही व्यक्त करता येऊ शकते, असा मैत्रीचा गाभा सांगणारा हा चित्रपट डॉ. मोहन आगाशे आणि दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयामुळे कलात्मक उंची गाठतो. त्यातूनच या चित्रपटाला अभिजात सौंदर्यमूल्य प्राप्त होते.

व्यक्तिरेखेचे बारकावे, त्यांचा सूक्ष्म अभ्यास व तो करत करतच आपल्या अभिनयातून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ असणाऱ्या डॉ. मोहन आगाशे यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. त्यापैकी एक महत्त्वाची भूमिका म्हणजे देवराईमधील मानसोपचारतज्ज्ञाची. आपल्या वैयक्तिक आयुष्यात नेहमीच जी भूमिका डॉ. मोहन आगाशे पार पाडत आले, ती भूमिकाही या चित्रपटात त्यांनी यथोचितपणे पार पाडलेली आहे. तर काय द्याचं बोलाया चित्रपटात त्यांनी बजावलेली न्यायाधीशाची भूमिका साकारतानाही ते तितकेच तन्मय झालेले सहज दिसून येते. वळू’ (२००८)मधला सरपंच, ‘विहीर’ (२००९)मधील आजोबा, ‘देऊळ’ (२००९)मधला आमदार, ‘रीटा’ (२०११)मधील वडील, देऊळ बंद (२०१५) मधले डॉ.व्यास, लॉस्ट अँड फाऊंड (२०१६) मधले श्रीरंग अंकल, तर कासव(२०१७) मधले दत्ताभाऊ अशा व्यक्तिरेखा रंगवण्यातच डॉ. मोहन आगाशे यांच्यामधले अभिनयकौशल्य अधोरेखित होते.

डॉ. मोहन आगाशे यांनी निशांत’ (१९७५), ‘मंथन’ (१९७६), ‘भूमिका’ (१९७७), ‘आक्रोश’ (१९८०), ‘मशाल’ (१९८४), ‘मुसाफिर’, ‘महायात्रा’ (१९८७), ‘रिहाई’ (१९८८), ‘पतंग’ (१९९४), ‘मृत्युदंड’ (१९९७), ‘गुडीया’ (१९९७), ‘गज गामिनी’ (२०००), ‘गंगाजल’ (२००३), ‘पाप’ (२००३), ‘असंभव’ (२००४), ‘अपहरण’ (२००५), ‘रंग दे बसंती’ (२००६) अब तक छप्पन २, या हिंदी चित्रपटातून काम करून हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची मोहोर उमटवलेली आहे आणि आपला खास प्रेक्षकवर्गही निर्माण केलेला आहे. सत्यजीत राय यांच्या सद्गतीया भारतातील पहिल्या टेलिफिल्ममध्ये मोहन आगाशे यांनी स्मिता पाटील, ओम पुरी, गीता सिद्धार्थ या कलाकारांसोबत काम केले.

डॉ. मोहन आगाशे यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. त्यांनी पिंपळपानया मराठीतील कथा-कादंबऱ्यांवर आधारित असणाऱ्या कार्यक्रमातील ऑक्टोपसया श्री. ना. पेंडसेलिखित कादंबरीतील लालजीसहीसही रंगवला होता, तर अग्निहोत्र’, ‘गुंतता हृदय हे रुद्रम या मालिकांमध्येही त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिल्या.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत व्यग्र असतानाही डॉ. मोहन आगाशे यांनी बालरंगभूमीसाठी मॅक्समुल्लर भवनआणि ग्रीप्स थिएटरयांच्या संयुक्त विद्यमाने अनेक कार्यशाळांचे आयोजन केले. बालरंगभूमीकडे अभिनव दृष्टीने पाहणाऱ्या व वेगळ्या पद्धतीने मुलांची नाटके सादर करणार्‍या ग्रीप्सचळवळीचा परिचय त्यांनी भारतीय रंगभूमीला करून दिला. या चळवळीचे अग्रगण्य दिग्दर्शक वोल्फगांग कोल्नेडर यांना डॉ. आगाशे यांनी भारतात आणले. या चळवळीमुळेच श्रीरंग गोडबोले व विभावरी देशपांडे या तरुण नाटककारांनी मुलांसाठी आणि तरुणांसाठी आपल्या मातीशी नाते सांगणारी नाटके दिली. ही नाटके मुले, शिक्षक आणि पालक यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न डॉ. आगाशे यांनी या कार्यशाळांच्या माध्यमातून केला.

डॉ. मोहन आगाशे यांना सांस्कृतिक प्रकल्पांसाठी जर्मन सरकारने २००२ मध्ये क्रॉस ऑफ ऑर्डरर मेरीटआणि मार्च २००४ मध्ये गटेपदकाने सन्मानित करण्यात आले. १९९० च्या जानेवारी महिन्यात त्यांना भारतीय सरकारतर्फे पद्मश्रीदेऊन गौरवण्यात आले. याशिवाय १९९१ मध्ये नंदीकर पुरस्कार, १९९६ मध्ये संगीत नाटक अकादमी, १९९८ साली पुणे प्राईडअसे विशेष पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आजही नाट्य, चित्रपट क्षेत्रातील अनेक सन्माननीय पदे भूषवत अभिनयक्षेत्रात त्यांचे काम सुरू आहे. बारामती येथे झालेल्या ९३व्या (२०१२) अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. वैद्यकीय क्षेत्रातही मोहन आगाशे यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. राज्यातील मानसिक आरोग्य शिक्षण व सेवा यातील दयनीय परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी त्यातील त्रुटी लक्षात आणून देणारा प्रकल्प अहवाल शासनाला १९८८ मध्ये सादर केला. त्यावर विचार होऊन शासनाने नवीन मानसिक आरोग्य धोरण स्वीकारले आणि त्यासाठी त्यांनी पुण्यात महाराष्ट्र राज्य मानसिक आरोग्य संस्था स्थापन केली. सुरुवातीपासून २००५ पर्यंत ते या संस्थचे संस्थापक संचालक म्हणून कार्यरत होते. २००५ मध्ये ते या पदावरून सेवानिवृत्त झाले, काही काळ त्यांनी महाराष्ट्र सरकारचा सल्लागार म्हणूनही काम केलेले आहे. तसेच ते एप्रिल १९९७ ते एप्रिल २००२ या काळात फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाया संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते.

वैद्यकीय सेवा, चित्रपट-नाटक या क्षेत्राशी जवळून संबंध असणार्‍या डॉ. मोहन आगाशे यांनी १९९३ मध्ये झालेल्या लातूरच्या भूकंपग्रस्तांसाठी राबवलेला ५ वर्षांचा प्रकल्प त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव व्यक्त करणारा आहे. या प्रकल्पांतर्गत त्यांनी १००० कुटुंबांचे पुनर्वसन केलेले आहे. नैसर्गिक आघाताने मानसिक खच्चीकरण झालेल्या व्यक्तीचे मानसिक पुनर्वसन करण्यात डॉ. मोहन आगाशे यांचे मोलाचे योगदान आहे.

आपल्या अभिनयाने, त्यातील बारकाव्यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे एक उमदे आणि सगळ्यांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. मोहन आगाशे चित्रपट रसिकांना परिचित आहेत, तर त्यांनीही आपल्या अभिनयाने मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत, तसेच नाट्यसृष्टीत आपले दखल घेण्याजोगे नाव निश्‍चित निर्माण केलेले आहे.

        - डॉ. अर्चना कुडतरकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].