Skip to main content
x

खळे, श्रीनिवास विनायक

संगीतकार

 

भावगीते, भक्तिगीते, बालगीते, नाट्यगीते, अभंग, लावणी आदी संगीतप्रकारांना नावीन्यपूर्ण चाली देणारे प्रयोगशील संगीतकार श्रीनिवास विनायक खळे यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांची प्रारंभीची पाच-सात वर्षे मुंबईतच गेली. पुढे वडिलांना नोकरीकरिता बडोद्याला जावे लागल्यामुळे खळे कुटुंब बडोद्यात स्थायिक झाले. त्यामुळे श्रीनिवास खळे यांचे बालपण व शिक्षण बडोद्यातच झाले. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई. त्यांच्या वडिलांना संगीताची आवड होती. ते बालगंधर्वांचे भक्त होते. श्रीनिवास खळे यांचा थोरला भाऊ काशीनाथ बासरी आणि बुलबुलतरंग वाजवायचा. पुढे त्यांनी हार्मोनिअममध्येही प्रगती केली. त्यांची बहीण शालिनी हीदेखील गायनात तयार होती. या सगळ्या भावंडांचे शिक्षण बडोद्यालाच झाले होते.

श्रीनिवास खळ्यांचे शालेय शिक्षण बडोद्याच्या महाराणी चिमणाबाई हायस्कूलमध्ये झाले. शालेय शिक्षणाबरोबरच बडोद्याच्या सयाजीराव महाराजांच्या पाठशाळेत संगीत शिक्षणही १९४० पासून, सुरुवातीला कंचनलाल नामक एका गुजराती शिक्षकाकडे सुरू झाले व त्यानंतर ते बन्सीलाल भारतीकडे शिकले. या विद्यालयात आग्रा घराण्याचे फैय्याज खाँ, गुलाम रसूल, अता हुसेन खाँ, मधुसूदन जोशी अशी संगीत क्षेत्रातील मोठी मंडळी होती. काही काळ गुलाम रसूल यांच्याकडूनही त्यांनी संगीताचे पाठ घेतले. नंतर फैय्याज खाँ साहेबांचे शिष्य मधुसूदन जोशी यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली. अधूनमधून अता हुसेनचेही मार्गदर्शन त्यांना लाभत असे. आग्रा घराण्याच्या संस्कारांमुळेच त्यांच्यामधील लयीची जाणीव समृद्ध झाली. त्यांच्या चालीतील बांधणीत हा घटक विशेषत्वाने वावरला.

त्यांच्या थोरल्या भावाचे म्हणजे काशीनाथ खळ्यांचे त्यांना नेहमीच प्रोत्साहन मिळे. ते १९३९ साली श्रीनिवासांना आवाजाच्या चाचणीकरिता यंग इंडिया कंपनीत घेऊन गेले होते. त्या वेळी मा. दीनानाथांनी श्रीनिवास खळे यांना गायला सांगितले व त्यांचे मनापासून कौतुक केले व त्यांना आशीर्वादही दिला. बडोदा येथील काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरम्म्हणण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले होते. अधिवेशनाचे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना शाबासकी दिली, ‘‘तू चांगला गातोस; मात्र गाण्याबरोबरच शरीर कमवायला शीक,’’ असा सल्लाही दिला.

श्रीनिवास खळ्यांच्या वडिलांना संगीताची आवड होती, तरी मुलांनी संगीत व्यवसाय करावा असे त्यांना मुळीच वाटत नव्हते. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वडिलांनी त्यांना लोकसेवा आयोगाच्या स्टेशन मास्तरच्या पदाच्या तयारीसाठी अजमेरला पाठविले. खळे ती परीक्षा उत्तीर्ण झाले; पण ते करारपत्र लिहून देण्यास नाराज होते. मात्र जबरदस्तीने त्यांना करारपत्र लिहून द्यायला लागले. खळे नोकरीत रमणारे नव्हतेच. त्यांनी थोड्याच दिवसांत राजीनामा दिला व ते बडोद्याला परतले. वडिलांचा प्रक्षोभ, संगीतात काहीतरी करावे ही ईर्षा व मित्र शांताराम रांगणेकरांचे मुंबईला येण्याचे निमंत्रण या सगळ्याचा परिपाक घर सोडून मुंबईला जाण्यात झाला. ते १९४८-५० च्या दरम्यान मुंबईला आले.

खरे तर बडोद्याला असतानाच खळे यांची संगीत दिग्दर्शक म्हणून वाटचाल सुरू झाली होती. त्यांनी  १९४५ साली मित्राच्या आग्रहावरून एका कवितेला चाल लावली. ती सुमन बाणावलीकर (वरेरकर) यांनी गायली व आकाशवाणीवरून ते गीत प्रसारितही झाले. याबरोबरच आकाशवाणीवर शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम देणे, मेळ्यांतून सुगम संगीत गाणे, नाटकांना व कवितांना चाली देणे वगैरे सुरू होतेच.

मुंबईला आल्यावर श्रीनिवास खळे यांनी अनेकांचे दरवाजे ठोठावले; पण सगळीकडून नकारघंटाच मिळाली. त्यांना दत्ता कोरगावकर ऊर्फ के. दत्ता यांनी राजा बढे यांच्या संगीतिकेला संगीत द्यायला सांगितले. त्यांच्या संगीताला कोरगावकरांची मान्यता मिळाली आणि श्रीनिवास खळे संगीत दिग्दर्शक झाले. पुढे कोरगावकरांबरोबर त्यांनी दामन’, ‘गुमास्ताआणि कलगीतुराया चित्रपटांकरिता साहाय्यक म्हणून काम केले. पार्श्वनाथ आळतेकरांच्या कलापथकातही खळे काही दिवस पगारी नोकर म्हणून होते. त्यांनी १९५२ साली वसुमती प्रधान यांच्याशी विवाह केला.

कोरगावकरांच्या निधनानंतर खळ्यांनी मुंबई आकाशवाणीसाठी काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ते कंत्राटी पद्धतीने काम करीत. नंतर म्हणजे १९६०-६१ पासून १९६८ पर्यंत ते मुंबई आकाशवाणीवर नोकरी करत होते. त्याच वेळी ते अधूनमधून एच.एम.व्ही.साठीही स्वररचना करीत. पुढे १९६८ नंतर ते एच.एम.व्ही.त रेकॉर्डिंग ऑफिसर म्हणून काम करू लागले. प्रथम त्यांच्याकडे मराठी आणि गुजराती संगीताची जबाबदारी होती व पुढे शास्त्रीय संगीताचा विभागही त्यांच्याकडे आला.

मुंबईत खळे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली १९५० साली तलत महमूद या गायकाच्या आवाजात गुजराती भाषेतील गाण्यांची पहिली ध्वनिमुद्रिका निघाली. खळे यांनी १९५६ ते १९६०-६१ च्या काळात अनेक गीतांना सुरेख स्वरसाज चढवला, त्यांतील काही आकाशवाणीवर, तर काही एच.एम.व्हीत ध्वनिमुद्रित झाली : कळीदार कपुरी पान’, ‘कशी रे तुला भेटू’, ‘कशी ही लाज घडे मुलखाची’ (राजा बढे), ‘सहज सख्या एकटाच’ (सूर्यकांत खांडेकर), ‘निळासावळा नाथ’ (गंगाधर महांबरे), तसेच योगेश्वर अभ्यंकरांच्या तव भगिनीचा धावा ऐकूनी’, ‘एकतारी गाते’, ‘रुसला मजवरती कान्हाइत्यादी.

खळे यांनी मुंबई केंद्राच्या गंमत जंमतया मुलांच्या कार्यक्रमासाठी मंगेश पाडगावकरांच्या टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुलेया गीताला चाल दिली. भावसरगमया कार्यक्रमातून १९६३ साली अरुण दाते आणि सुधा मल्होत्रांच्या आवाजातील खळ्यांचे संगीत असलेले मंगेश पाडगावकरांचे शुक्र तारा मंद वाराहे द्वंद्वगीत प्रसारित झाले. याबरोबरच, ‘हात तुझा हातातच’ (१९६४), ‘सर्व सर्व विसरू देही द्वंद्वगीतेही प्रसारित झाली. अरुण दाते हे गझल गात; खळ्यांनीच त्यांना मराठी भावगीतसृष्टीत आणले. याबरोबरच, ‘जादू अशी घडे ही’, ‘झुळझुळता हा पहाटवारा’, ‘दूर सूर चौघड्यातअशी अनेक गाणी प्रसारित झाली व अजूनही या गाण्यांची लोकप्रियता ढळलेली नाही.

श्रीनिवास खळे यांनी अवघ्या सहा चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी १९५२ साली लक्ष्मीपूजनया चित्रपटाचे  संगीत दिग्दर्शन केले; पण हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. यातील आशा भोसल्यांच्या स्वरात ध्वनिमुद्रित झालेल्या गोरी गोरी पानएका तळ्यात होतीया दोन गाण्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. याशिवाय यंदा कर्तव्य आहे’ (१९५६), ‘बोलकी बाहुली’ (१९६१), ‘पळसाला पाने तीन’, ‘जिव्हाळा’ (१९६८), ‘पोरकी’ (१९७०), ‘सोबती’ (१९७१) या सर्वच चित्रपटांतील गाणी गाजली.

देवा दया तुझी’, ‘सांग मला रे, सांग मला’ (बोलकी बाहुली), ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ (लता मंगेशकर) आणि लळा जिव्हाळा शब्दच खोटे’ (सुधीर फडके) ही जिव्हाळाया चित्रपटातील दोन गाणी त्यांच्या चित्रपटातील संगीताच्या उच्च दर्जाची साक्ष देतात.

चित्रपटाप्रमाणेच काही नाटकांनाही त्यांनी संगीत दिले. पाणिग्रहण’ (आचार्य अत्रे), ‘विदूषक’ (वि.वा. शिरवाडकर), ‘देवाचे पाय’ (चिं.त्र्यं. खानोलकर) या तिन्ही नाटकांतील गीतांना चाली, त्या नाटकांच्या आशयांप्रमाणे भिन्न आहेत. पाणिग्रहणया नाटकातील उगवला चंद्र पुनवेचाप्रीती सुरी दुधारी’ (बकुलपंडित) विदूषकया नाटकातील कुसुमाग्रजांच्या काव्य-गीताला भावगीताचा साज चढवून केलेली, ‘स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या राजस राजकुमारा’, ‘चांद भरली रात आहे’ (आशालता वाबगावकर) ही गाणीही लोकप्रिय झाली. याशिवाय आकाशवाणीसाठी काही संगीतिका आणि नाटकांनाही त्यांनी संगीत दिले.

श्रीनिवास खळे यांनी भक्तिगीते, अभंगांच्या चालींतूनही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. लता मंगेशकर यांनी गायलेल्या संत तुकारामांच्या अभंगांची अभंग तुकयाचेही ध्वनिमुद्रिका १९७१ साली निघाली. अभंग गायनाच्या पारंपरिक चालींपेक्षा या चाली वेगळ्या असूनदेखील त्या जनमानसात रुजल्या, तसेच प्रख्यात गायक पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील अभंगवाणीच्या ध्वनिफितीही गाजल्या. याबरोबरच रामगुणश्यामही ऐतिहासिक म्हणावी अशी ध्वनिफीत. पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर या दोन भारतरत्न सन्मानित दिग्गज कलाकारांच्या आवाजातील १९८४ साली निघालेली ही ध्वनिफीत महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतातच गाजली. नाथ माझा मी नाथांचाहा त्यांचा शेवटचा अल्बम २००९ साली निघाला. याशिवाय अनेक भक्तिगीते, अभंगांना त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण व नाविन्यपूर्ण चाली लावलेल्या दिसतात. श्रीनिवास खळ्यांच्या भक्तिगीतांतील स्वरयोेजनेतून एक सात्त्विक आर्तता नेहमीच प्रतीत होते.

श्रीनिवास खळे यांची संगीत प्रतिभा चौफेर व बहुप्रसवा आहे. आजवर त्यांनी १४१ काव्यरचनांना संगीत दिले असून यांत मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, संस्कृत या भाषांतील विविध गीतप्रकारांचाही समावेश आहे. त्यांनी अनेक संगीतकारांना व तरुण नवोदित  गायकांना त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली अनेक बुजुर्ग ज्येष्ठ गायकांबरोबरच तरुण नवोदित गायक/गायिकांनीही गाणी गायली आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, सुधा मल्होत्रा, सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा, सुलोचना चव्हाण, शोभा गुर्टू, वीणा सहस्रबुद्धे, कविता कृष्णमूर्ती, पुष्पा पागधरे, कुंदा बोकील, कृष्णा कल्ले, देवकी पंडित यांबरोेबरच भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, रतिलाल भावसार, महेन्द्र कपूर, मन्ना डे, तलत महमूद अशा अनेक मराठी-अमराठीं कलाकारांनीही त्यांची गाणी गायली आहेत.

भावगीते, भक्तिगीते, चित्रपटगीते, अभंग, बालगीते, लावणी, गवळण, प्रेमगीते, युगुलगीते अशा अनेक गीतप्रकारांसाठी त्यांनी स्वरयोजना केल्या आहेत. रागदारी संगीताची पक्की तालीम, काव्याची उत्तम समज व नवनवीन स्वरसंगती हे त्यांच्या चालींचे वैशिष्ट्य. त्यांच्या रचनांत लयींचे सूक्ष्म-तरल आविष्कार असतात.

श्रीनिवास खळे यांना श्रीमती लता मंगेशकरपुरस्कार (१९९३), ‘दादासाहेब फाळकेपुरस्कार (२००३), ‘पद्मभूषण’ (२०१०) . अनेक मानसन्मान लाभले. त्यांच्या संगीत कारकिर्दीला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यावर श्रीनिवास खळे’ : एक संकलनही पुस्तिका भा.. शेरे यांनी १९७० साली काढली. दत्ता मारुलकर यांनी २००९ साली श्रीनिवास खळे यांचा जीवनपट व सांगीतिक कारकिर्दीचा वेध घेणारे अंतर्यामी सूर गवसलाहे पुस्तक लिहिले. श्रीनिवास खळ्यांच्या जीवनात आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींचा तोटा नव्हता. मात्र त्यांनी प्रसन्नता व संगीतविषयक उत्कटता हरवू दिली नाही. त्यांच्या संगीत प्रतिभेला नेहमीच नवे धुमारे फुटत राहिले. या प्रतिभावान संगीतकाराचे वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी मुंबईत निधन झाले.

माधव इमारते

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].