Skip to main content
x

लाजमी, ललिता गोपाळकृष्ण

      लिता गोपाळकृष्ण लाजमी या माहेरच्या ललिता पडुकोण. त्यांच्या वडिलांचे नाव शिवशंकर व आईचे नाव वासंती होते. ते मूळचे कर्नाटकातील पडुकोण गावचे; परंतु बर्माशेल कंपनीत नोकरीस असल्यामुळे ललिताजींच्या वडिलांची काही काळ कलकत्त्यास (कोलकाता) बदली झाली होती. ललिताजींचा जन्म कलकत्त्याला झाला. त्यांचे वडील कविता करीत, तर आई कानडी भाषेत लिखाण करीत असे. त्यांचे एक काका शिल्पकार होते, तर मामा व्ही.बी. बेनेगल (श्याम बेनेगलांचे काका) यांचा कलकत्त्यात सिनेमाच्या जाहिराती व पोस्टर्स तयार करण्याचा स्टुडीओ होता. ललिताजींच्या चार भावंडांपैकी सर्वांत मोठा भाऊ म्हणजे सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता गुरुदत्त होय. इतर तीन भाऊदेखील सिनेमाक्षेत्राशीच संबंधित होते. नृत्य शिकावे असे ललिताजींना वाटत असे; परंतु त्यांच्या आईने त्यांना चित्रकलेकडे वळण्यास प्रवृत्त केले.

दुसरे महायुद्ध सुरू असताना, जपान कलकत्त्यावर बाँबहल्ला करणार अशा वावड्या उठल्या व त्यामुळे ललिताजी, त्यांची भावंडे व आई यांनी कलकत्ता सोडले आणि मंगलोरजवळील रामदास आश्रम गाठला. काही महिन्यांनंतर त्यांच्या वडिलांची बदली मुंबईस झाली व हे कुटुंब मुंबईतील माटुंग्यास स्थिरावले. या वेळी ललिताजी १०-११ वर्षांच्या होत्या. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये (राजा शिवाजी विद्यालय) झाले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्याझाल्या त्यांचा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेत असलेल्या गोपाळकृष्ण लाजमी यांच्याशी विवाह ठरला. विवाहापूर्वी काही दिवस त्यांनी गजानन हळदणकर व मुरलीधर आचरेकर यांच्याकडे चित्रकलेचे धडे गिरविले; परंतु त्या अकॅडमिक चित्रकारितेत त्यांचे मन रमले नाही.

लग्न होऊन कुलाब्यास राहण्यास आल्यानंतर त्यांनी स्वत:च रेखाटन, निसर्गचित्रणाचा सराव सुरू केला. याच सुमारास चित्रकार के.एच. आरा यांच्याशी त्यांचा परिचय झाला. आरा यांनी ललिताजींना बरेच मार्गदर्शन केले व प्रोत्साहनही दिले. आरा यांच्या पुढाकाराने १९६१ मध्ये ललिताजींचे जहांगीर आर्ट गॅलरीत पहिले चित्रप्रदर्शन झाले. त्यानंतर ललिताजींनी आणखी काही प्रदर्शने भरविली; पण आता आपली म्हणून चित्रशैली किंवा चित्रभाषा असावी, असे त्यांना वाटू लागले. त्यासाठी त्यांनी ‘तंत्र आर्ट’ या कलाप्रकाराचा अभ्यास केला. याच कलाप्रकारावर आधारित ‘बीज’ या विषयावरील त्यांच्या चित्रांचे मॅक्समुल्लर भवन येथे प्रदर्शन झाले. त्यानंतर त्यांच्या काही अमूर्त चित्रांची प्रदर्शनेही झाली. मुद्राचित्रण (प्रिंट मेकिंग) माध्यमातील ‘एचिंग’ या प्रकाराचा, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील सायंकालीन वर्गात त्यांनी अभ्यास सुरू केला व त्यासाठी त्यांना शिक्षणमंत्रालयाकडून शिष्यवृत्तीही मिळाली.

याच सुमारास काही कारणांनी घरात आर्थिक चणचण जाणवू लागली व त्यांना चित्रकलेचे साहित्य विकत घेणेही अवघड होऊ लागले. जे.जे.मधील मुद्राचित्रण विभागातील शिक्षक वसंत परब यांच्या सल्ल्यानुसार ललिताजींनी ‘आर्ट मास्टर’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला व त्या आधारे त्यांना दोन शाळांमध्ये अर्धवेळ चित्रकला शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. संसारातील ओढाताण व आर्थिक चणचण यांमुळे त्यांचे चित्रकलेकडे दुर्लक्ष होऊ लागले, तसेच  त्यांना चित्रकलेतील स्वत्व सापडेना व त्यामुळे त्यांना नैराश्य आले. पण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, अंतर्मुख होऊन त्यांनी पुढे व्यक्तिप्रतिमा असलेली अभिव्यक्तिप्रधान चित्रेच रंगवायची असे मनोमन ठरविले.

याच सुमारास अमोल पालेकर यांच्या नाटकासाठी वेशभूषा संकल्पनेचे (कॉस्ट्युम्स डिझाइन) काम करण्याची त्यांना संधी मिळाली. या नाटकासाठी त्यांनी विविध प्रकारचे मुखवटे बनविले आणि हे मुखवटेच पुढे त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य ठरले. मानवी भावभावना व परस्परसंबंध आणि व्यावहारिक जीवनात काही व्यक्तींकडून कळत नकळत वापरले जाणारे फसवे मुखवटे या विचारधारेवर आधारित व्यक्तिप्रतिमाप्रधान चित्रे त्या रंगवू लागल्या. चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या पुढाकाराने उदयास आलेल्या ‘अस्तित्व’ या गटात (ग्रुप) त्या सहभागी होत असत. या चित्रकारांच्या गटात चित्रकलेविषयी होणाऱ्या साधकबाधक चर्चांनी ललिताजींच्या कलेविषयीच्या जाणिवा प्रगल्भ होत गेल्या. मुंबईतील ‘स्टुडीओ सेव्हन’ या कलादालनाने त्यांची काही प्रदर्शने आयोजित करून त्यांच्या चित्रांना मान्यता मिळवून दिली व ललिताजींची चित्रे रसिकांच्या संग्रहात दाखल होऊ लागली.

आजवर त्यांची बरीच एकल प्रदर्शने झाली असून विविध प्रतिष्ठित सामूहिक प्रदर्शनांत त्यांचा सहभाग असतो. २००७ मध्ये ‘तहेलका’ या नियतकालिकातर्फे लंडन येथे झालेल्या प्रदर्शनात त्यांच्या चित्रांचा समावेश होता. मुंबई व दिल्ली येथील भारतीय आधुनिक कलेचे कलादालन, हैदराबाद व चंदिगड येथील म्युझियम , तसेच इंग्लंडमधील ब्रिटिश म्युझियम व ब्रॅडफोर्ड म्युझियम यांच्या संग्रहांत ललिताजींच्या ‘एचिंग’ तंत्रातील व इतरही कलाकृती आहेत. 

- डॉ. गोपाळ नेने

संदर्भ
संदर्भ : ललिता लाजमींची प्रत्यक्ष मुलाखत
लाजमी, ललिता गोपाळकृष्ण