गोरेगावकर, नानाभाई कृष्णराव
आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात शिल्पकलेच्या क्षेत्रात दोघा शिल्पकार बंधूंनी एकत्र येऊन स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात व्यवसाय केल्याचे एकमेव उदाहरण म्हणजे मुंबईच्या गावदेवी परिसरातील ‘गोरेगावकर ब्रदर्स आर्ट स्टूडिओ’ हे आहे. हा स्टूडिओ १९३३ ते १९७० अशी तब्बल सदतीस वर्षे कार्यरत होता. हा स्टूडिओ चालविणारे हे दोन भाऊ बी.के. गोरेगावकर व एन.के. गोरेगावकर या नावांनी प्रसिद्ध होते. या स्टूडिओमध्ये स्मारकशिल्पांची व्यावसायिक कामे एकत्रितपणे करत असतानाच ते स्वतंत्रपणे स्वान्तसुखाय शिल्पनिर्मितीही करीत असत व त्यांची अशी शिल्पे पारितोषिकप्राप्त ठरली होती.
मूर्तिकलेच्या कामात मूर्ती घडविण्यापूर्वी बरीच तयारी करावी लागते. त्यात सांगाडा तयार करणे, त्यावर माती लिंपणे, मुख्य पुतळा आकारास आणणे, त्याचे मोल्डिंग, कास्टिंग व फिनिशिंग अशा अनेक कामांचा समावेश असतो. एन.के. गोरेगावकर हे पूर्ण वेळ स्टूडिओची जबाबदारी सांभाळत. बी.के. गोरेगावकर आपली जे.जे. स्कूलमधील विभाग प्रमुखाची जबाबदारी सांभाळून उर्वरित वेळात व शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ही कामे करीत.
असे असूनही या भावंडांत व्यवसाय सांभाळत असताना मतभेद निर्माण झाले नाहीत. दोघे मिळून आलेले काम पार पाडीत असत. उपलब्ध असलेल्या या दोघा बंधूंच्या स्वतंत्र कामावरून असे दिसते, की बी.के. गोरेगावकर हे मातीकामात अधिक निष्णात होते, तर एन.के. गोरेगावकर हे तांत्रिक बाबतीत जास्त निपुण व कार्यक्षम असावेत. दोघांनीही एकमेकांची बलस्थाने ओळखून सहकार्याने आयुष्यभर व्यावसायिक कामे केली.
शिल्पकार म्हात्रे यांच्यापासून प्रेरणा घेऊन चित्रकार हळदणकर यांच्या मार्गदर्शनाने शालेय वयातच कलागुण व्यक्त करणार्या एन.के. गोरेगावकर यांनी आपले वडील बंधू बी.के. गोरेगावकर यांच्या सोबत ‘गोरेगावकर ब्रदर्स आर्ट स्टूडिओ’ ही शिल्पशाळा यशस्विरीत्या सांभाळून स्मारकशिल्पांसोबतच स्वान्तसुखाय धार्मिक, पौराणिक व सर्वसामान्यांचीही व्यक्तिशिल्पे साकारली.
नानाभाई कृष्णराव गोरेगावकर यांचा जन्म सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञातीत झाला. वडील सॉलिसिटर कृष्णराव हरिश्चंद्र गोरेगावकर हे ज्ञातीतील प्रतिष्ठित गृहस्थ होते. शालेय शिक्षणाच्या काळातच हळदणकर व शिल्पकार म्हात्रे यांच्या सहवासातून त्यांना कलेची आवड निर्माण झाली. नानाभाईंनी शालेय शिक्षणानंतर १९२४ मध्ये जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या शिल्पकला विभागात प्रवेश घेतला. शिक्षणाच्या काळात तांत्रिक गोष्टींसोबतच शिल्प घडविण्याच्या शास्त्रात त्यांनी प्रावीण्य मिळवले व १९२९ मध्ये गव्हर्न्मेन्ट डिप्लोमा इन मॉडेलिंग ही पदविका प्राप्त केली. शैक्षणिक काळात त्यांनी अनेक पारितोषिके व सातत्य दाखविणार्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रतिष्ठेचे ‘लॉर्ड मेयो’ पदकही प्राप्त केले. त्यांच्या १९२९ मधील शिल्पास बॉम्बे आर्ट सोसायटीचे रौप्यपदक आणि १९२९ व १९३० मध्ये ‘हायली कमांडेड’ प्रमाणपत्रही मिळाले.
शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांची धाकटी मुलगी रेवती हिच्याशी १९२९ मध्ये त्यांचा विवाह झाला. म्हात्र्यांच्या मार्गदर्शनाने पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी नानाभाईंनी युरोपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला व थोरले बंधू बी.के. गोरेगावकर यांच्यासह त्यांनी १९३० मध्ये युरोपला प्रयाण केले. त्या वेळी त्यांच्या लग्नाला अवघे चार महिने झाले होते. युरोपमधील दोन वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी पॅरिस, रोम व लंडन येथील अकॅडमीत छोटे अभ्यासक्रम पूर्ण केले. प्रो. व्हॉनेर यांच्या स्टूडिओत १९३१ मध्ये ते दगडी पुतळ्याच्या खोदकामाची व ज्युलिस लॅमी फाउण्ड्रीत ब्रॉन्झ धातूच्या ओतकामाची पद्धत शिकले.
रोममधील शिल्पकला प्रदर्शनात १९३२ मध्ये एन.के. गोरेगावकर यांच्या शिल्पाला प्रशस्तिपत्र मिळाले. ते पॅरिसमध्ये ज्या घरात राहत होते, त्या घरमालकिणीचे त्यांच्यावर पुत्रवत प्रेम होते. तिचा नवरा व सात मुले पहिल्या महायुद्धात मारली गेली होती व एन.के. गोरेगावकरांचे त्यांतील एका मुलाशी साम्य होते. त्यामुळे तिने त्यांना पॅरिसमध्ये स्थायिक होण्याचा आग्रह केला व सर्व मालमत्ता त्यांच्या नावावर करण्याची तयारीही दाखवली व सॉलिसिटर असलेल्या कृष्णराव गोरेगावकर यांना तसे पत्रही लिहिले. परंतु या दोघा बंधूंनी युरोपात जाण्यापूर्वीच, परतल्यानंतर मुंबईत स्टूडिओ स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले होते व ते साकार करण्यासाठी एन.के. गोरेगावकर मुंबईत परतले. ते आपले बंधू बी.के. गोरेगावकर यांच्यासह १९३२ च्या अखेरीस परतले व दोघा भावांनी ‘गोरेगावकर ब्रदर्स आर्ट स्टूडिओ’ सुरू केला.
सुरुवातीच्या काळात गोरेगावकर ब्रदर्स आर्ट स्टूडिओमार्फत त्यांच्या ज्ञातीच्या संस्था व मुंबईतील उद्योगपतींच्या व्यावसायिक शिल्पांची कामे करण्यात आली. याशिवाय अर्थार्जनासाठी एन.के. गोरेगावकर गणपतीच्या मूर्तीही करत असत. हळूहळू गोरेगावकर ब्रदर्स आर्ट स्टूडिओची कीर्ती वाढू लागली. पुढील काळात अनेक अर्धपुतळे, पूर्णाकृती पुतळे त्यांनी संगमरवर व ब्रॉन्झ धातूत तयार केले. अशा पुतळ्यांत शेठ वालचंद हिराचंद, शेठ सुरजी वल्लभदास, शेठ चतुुर्भुज नेमजी, बडोद्याचे संस्थानिक प्रतापसिंह गायकवाड, गुरुदेव रानडे, पंडिता रमाबाई अशी अनेक व्यक्तिमत्त्वे होती.
१९३६ मध्ये पोलीस आयुक्त सर पेट्रिक केली यांचा पूर्णाकृती संगमरवरी पुतळा मुंबईतील पोलीस मुख्यालयात लागला. त्यामुळे गोरेगावकर बंधूंची प्रसिद्धी झाली. याशिवाय त्यांनी नागपूर येथील डॉ. हेडगेवार व डॉ. मुंजे यांचे पूर्णाकृती पुतळे तयार केले. त्यांना १९५५ मध्ये पुण्यातील झाशीच्या राणीच्या पुतळ्याच्या कामासाठी इतर शिल्पकारांसोबत आमंत्रित करण्यात आले. यासाठी गोरेगावकर बंधूंनी दोन वेगवेगळी मॉडेल्स स्वतंत्रपणे तयार केली व ती समितीस दाखवली. त्यांतील एक मॉडेल निवडले गेले व ज्येष्ठ शिल्पकार करमरकरांच्या मार्गदर्शनाखाली बी.के. व एन.के. गोरेगावकर यांनी तेे शिल्प साकार केले.
याशिवाय एन.के. गोरेगावकर यांच्या स्केचवरून त्यांनी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार केला व तो पंढरपूर येथे लागला. या दोघा बंधूंपैकी बी.केे. गोरेगावकर हे जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये नोकरी करीत असल्यामुळे स्टूडिओची संपूर्ण जबाबदारी एन.के. गोरेगावकर हेच सांभाळत असत. शिल्पकामासोबतच त्यांना तांत्रिक गोष्टीत गती होती. बडोद्यातील कीर्ती मंदिराचे काम करताना त्यांना बडोद्यातच स्टूडिओ दिला होता व तिथेच राहून ते काम करीत असत. त्यांचे वडीलबंधू शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवशी मुंबईहून येत व काम करीत. परंतु या दोघा बंधूंमध्ये असा काही एकोपा होता, की त्यांनी याबद्दल कधीच तक्रार केली नाही व अखेरपर्यंत दोघे एकाच घरात एकत्र राहिले व त्यांनी स्टूडिओतही एकत्र काम केले.
एन.के. गोरेगावकर यांनी आपल्या वडीलबंधूंप्रमाणेच स्वान्तसुखाय अनेक शिल्पे घडविली. त्यांत पौराणिक विषयांसोबतच सर्वसामान्यांचीही शिल्पे होती. यांतील देवकीच्या तान्हुल्याला मारणार्या क्रूर कंसाचे शिल्प व त्याला थांबविणारी देवकी हे शिल्प या प्रसंगातील कारुण्य व क्रौर्य व्यक्त करते. गाढवाच्या पाठीवर सामान लादून निघालेली स्त्री व गाढवाच्या पाठीवर बसलेल्या तिच्या मुलाचे शिल्प गरिबीतही असलेले मातृप्रेम व अशा छोट्या प्रसंगातील आनंद दर्शविणारे आहे. याशिवाय केशवपन केलेल्या आजीचे व घरातील माळ्याचे शिल्प त्यांचा शिल्पकलेचा व मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास व्यक्त करणारे आहे.
गोरेगावकर ब्रदर्स आर्ट स्टूडिओ हा दोघा शिल्पकार बंधूंंनी दीर्घकाळ एकत्र राहून चालविलेला त्या काळातील एकमेव स्टूडिओ असावा. या घराण्याचा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जवळचा संबंध होेता. त्यामुळे गोरेगावकर बंधूंनी नागपूर येथील डॉ. हेडगेवार यांच्या समाधिस्थानावरील पूर्णाकृती पुतळ्यासकट त्यांची अनेक शिल्पे तयार केली असून ती भारतभर लागली आहेत. त्यांच्या एकत्र कुटुंबात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोळवलकर गुरुजींसकट अनेक उच्चपदस्थ मुंबईत असताना मुक्कामाला उतरत असत व १९३४ मध्ये बांधलेल्या राधा-निवास या घरातील एक खोली अशा मान्यवरांसाठी राखून ठेवलेली असे. याच इमारतीत तळमजल्यावर १९३४ नंतर गोरेगावकर ब्रदर्स आर्ट स्टूडिओ हा १९७० पर्यंत सुरू होता.