Skip to main content
x

भट, सुरेश श्रीधर

     गझलकार सुरेश भटांचा जन्म अमरावती येथे रामनवमीच्या दिवशी झाला. त्यांचे मूळ घराणे मध्य प्रदेशातील जबलपूरचे होय. सुरेश भटांचे वडील श्रीधरपंत भट हे कान-नाक-घसा तज्ज्ञ होते. ते विदर्भातील अमरावती शहरात ज्या भागात राहत, तो भाग विविध जातिधर्माच्या लोकांचा होता. शिवाय श्रीधरपंताना मराठीपेक्षा हिंदी व इंग्रजी ह्या भाषाच जास्त जमत. कारण त्यांच्या वर्तुळात मुस्लीम, पारशी, ख्रिश्चन अशा अ-मराठी लोकांचाच भरणा अधिक असे. सुरेश भटांच्या मातोश्री शांताबाई ह्या गृहिणी व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांना लेखनाची आवड होती. वयाच्या आठव्या वर्षी सुरेश भटांचा डावा पाय पोलिओमुळे अधू झाला. त्यामुळे पुढे आयुष्यभर त्यांना चालताना काठी किंवा साहाय्यक ह्यांचा आधार घ्यावा लागला.

     भटांनी वयाच्या बाराव्या वर्षी, १९४४मध्ये काव्यलेखनास प्रारंभ केला. १९४६-१९४७च्या दरम्यान आपल्या सुमारे ५०-६० कवितांची वही त्यांनी एका वैतागलेल्या मनःस्थितीत विहिरीत टाकून दिली. १९४९-१९५० साली मॅट्रिक झाल्यानंतर ते सकसपणे काव्यलेखन करू लागले. अमरावती येथे विदर्भ महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी महाविद्यालयातील मराठी विषयाचे एक शिक्षक व नामवंत कवी भ.श्री.पंडित ह्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. १९५०नंतरच्या त्यांच्या ५०-६० कवितांची वही महाविद्यालयातील एका कविसंमेलनात गहाळ झाली होती. उमेदवारीच्या काळात त्यांच्यावर केशवसुत, तांबे व कुसुमाग्रज अशा तीन कवींचा प्रभाव होता.

     मराठी काव्यलेखन चालू असतानाच भटांना उर्दू गझलाचे आकर्षण वाटू लागले व पुढे ते वाढतच गेले. त्यातून ते गझल म्हणजे काय, तो कसा लिहायचा असतो वगैरे गोष्टी शिकत गेले. उर्दू भाषा व उर्दू गझल ह्या गोष्टी सुरेश भट पुस्तकांचा अभ्यास करून जितके शिकले, त्याहून अधिक प्रमाणात ते उर्दू भाषकांच्या सहवासातून, त्यांच्याशी संभाषण करण्यातून व रात्ररात्र जागून ऐकलेल्या मुशायर्‍यांमधून शिकले. अधूनमधून त्यांच्या मराठी कविता प्रकाशित होत होत्या. परंतु हळूहळू नकळतच ते नेहमीच्या मराठी कवितेऐवजी मराठीतून गझल लिहिण्याकडे वळले. अशा प्रकारची गझलाच्या बंधामधील भटांची पहिली कविता ‘का मैफलीत गाऊ?’ (१९५४) ही आहे.

     अभ्यासापेक्षा अवांतर वाचनाकडे भटांचा विलक्षण ओढा होता. त्यामुळे दोन-दोन वेळा नापास होऊन शेवटी ते १९५५ साली कसेबसे बी.ए.झाले. नंतरच्या काळात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्यात त्यांना तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. ह्या सर्व घडामोडींमुळे त्यांचे सरकारी नोकरीचे वय उलटून गेले. त्यामुळे मग त्यांची पुढील सात-आठ वर्षे खासगी नोकरी धरणे व सोडणे ह्यांत व त्या निमित्ताने गावे फिरण्यात, भटकण्यात गेली.

     भटांनी १९५४पासून मराठी गझल लिहिण्याचा प्रयत्न चालवला असला, तरी त्यांच्या दृष्टीने खरा व बरा असा ‘शेवटी’ गझल त्यांच्या हातून २० मे १९५७ रोजी लिहिला गेला. पुढे त्यांनी ७२ कवितांचा ‘रूपगंधा’ हा आपला पहिला कवितासंग्रह १५ मार्च १९६१ रोजी स्वतः च प्रकाशित केला. ह्या संग्रहाला महाराष्ट्र शासनातर्फे दुसरे पारितोषिक विभागून देण्यात आले. १९६४मध्ये मूळच्या पुण्याच्या, परंतु माधान (जि.अमरावती) ह्या गावी शिक्षिका म्हणून नोकरी करीत असलेल्या कु. पुष्पा मेहेंदळे ह्यांच्याशी ते विवाहबद्ध झाले.

     भटांनी जाणिवेच्या पातळीवरील गझल-लेखनास साधारणपणे १९६३-१९६४पासून प्रारंभ केला. १९६७ साली भोपाळला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी आपले गझल सादर केले आणि ते उपस्थित रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. हे पाहून संमेलनाला उपस्थित असलेले ‘सत्यकथा’चे संपादक श्री.पु.भागवत ह्यांनी भटांना ‘सत्यकथे’साठी कविता पाठविण्याचा आग्रह केला व त्याचबरोबर ‘मौज’ प्रकाशनामार्फत कवितासंग्रहही प्रकाशित करण्याची तयारी दर्शविली. पुढे सप्टेंबर १९७०च्या अंकापासून भटांच्या कविता, विशेषतः गझल ‘सत्यकथे’तून सातत्याने प्रकाशित होऊ लागले. पुढे श्री.पुं.नी मार्च १९७४मध्ये भटांचा ‘रंग माझा वेगळा’ हा ९२ कवितांचा दुसरा संग्रह मौज प्रकाशनामार्फत प्रकाशित केला. ह्या संग्रहाला महाराष्ट्र शासनाचे ‘केशवसुत पारितोषिक’ मिळाले. हा कवितासंग्रह आजपर्यंत अनेक विद्यापीठांनी विविध वर्गांसाठी अभ्यासक्रमात नेमलेला असून त्याच्या अनेक आवृत्त्याही निघालेल्या आहेत.

     १९७५ ते १९७९ ह्या कालावधीत भटांनी नागपूर येथे राहून ‘बहुमत’ नावाचे साप्ताहिक चालवले. नंतर ते बंद करून ३ सप्टेंबर १९८०पासून ते ‘रंग माझा वेगळा’ हा स्वतःच्या गझलांचे वाचन-पठण-गायन असा जाहीर कार्यक्रम तिकीट लावून महाराष्ट्रभर करू लागले. डिसेंबर १९८३ मध्ये त्यांचा ‘एल्गार’ हा ९६ कवितांचा तिसरा संग्रह त्यांनी स्वतःच प्रकाशित केला. ह्या संग्रहाला सोलापूरचा दमाणी पुरस्कार लाभला. २६ डिसेंबर १९८६ रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथे ३९वे विदर्भ साहित्य संमेलन पार पडले. गझलाच्या माध्यमातून त्यांनी उर्दू व मराठी ह्या दोन भाषांना जवळ आणल्याबद्दल त्यांचा ‘महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमी’ने एप्रिल १९८७मध्ये पारितोषिक देऊन गौरव केला. १९८९मध्ये अमरावती येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. २००३मध्ये विदर्भ साहित्य संघाने ‘जीवनव्रती माडखोलकर’ पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव केला. ‘झंझावात’ (१९९४), ‘सप्तरंग’ (२००२) व ‘रसवंतीचा मुजरा’ (२००७) हे त्यांचे शेवटचे तीन कवितासंग्रह होत. ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै ह्यांनी ‘सुरेश भट ह्यांची निवडक कविता’ (१९९७) हा त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह संपादित केलेला आहे. ‘काफला’ (१९९०) हा त्यांनी व मराठी गझल अभ्यासक डॉ.अविनाश कांबळे (सांगोलेकर) ह्यांनी मिळून संपादित केलेला मराठीतील पहिला प्रातिनिधिक गझलसंग्रह आहे.‘गझलेची बाराखडी’ ही पुस्तिकाही त्यांच्या नावावर आढळते. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून २००३मध्ये त्यांच्या जन्मतिथीला म्हणजे रामनवमीला त्यांच्या चाहत्यांनी ‘सुरेश भटः एक झंझावात’ हा त्यांच्यावरील स्मृतिग्रंथ प्रकाशित केला.

     भटांचे अनेक गझल व अनेक गीते ह्यांचे गायन लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, सुमन कल्याणपूरकर, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, सुधाकर कदम, भीमराव पांचाळे अशा अनेक नामवंत गायक-गायिकांनी केले आहे. पैकी काही गझलांचा व गीतांचा अंतर्भाव ‘निवडुंग’, ‘घरकुल’, ‘उंबरठा’ इत्यादी मराठी चित्रपटांमध्ये करण्यात आलेला आहे. ‘मलमली तारुण्य माझे’, ‘पूर्तता माझ्या व्यथेची’, ‘समजावुनी व्यथेला’, ‘रंगुनी रंगात सार्‍या’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’ हे त्यांचे गझल व ‘मेंदीच्या पानावर’, ‘सखि, मी मज हरपून बसले गं’, ‘हासताना प्राण गेला’, ‘उषःकाल होता होता’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’, ‘मालवून टाक दीप’, ‘पहाटे पहाटे’, ‘रंग माझा तुला’ ही गीते विलक्षण लोकप्रिय आहेत.

     भट हे गझलकार व गीतकार म्हणून मराठी जनमानसाला सुपरिचित असले, तरी त्यांनी काही गद्यलेखनही केले आहे. त्यांचे हे गद्यलेखन सदरांच्या स्वरूपाचे असून ही सदरे त्यांनी ‘बहुमत’, ‘लोकमत’, ‘केसरी’, ‘मेनका’ अशा नियतकालिकांमधून चालवली होती. पैकी ‘गझलिस्तान’ (मेनका), ‘भटकंती’ (केसरी) ही त्यांची सदरे विशेष लोकप्रिय ठरली.

     अनेक गझलकार, गझलगायक, गझलअभ्यासक ह्यांच्या जडणघडणीत भटांचा मोलाचा वाटा आढळतो. भीमराव पांचाळे ह्यांच्या नेतृत्वाखालील ‘गजल सागर प्रतिष्ठान’ ही संस्था गझललेखन व गझलगायन ह्या उपक्रमांसाठी समर्पित असून तिचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक सुरेश भट हे राहिलेले आहेत. मराठी गझलच्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये अमृतराय-मोरोपंत, माधव जूलियन व सुरेश भट असे तीन प्रमुख टप्पे असून त्यातील भटांचा तिसरा टप्पा  हा अनेक कारणांनी आजपर्यंतचा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल. भटांनी मराठीत तंत्रशुद्ध गझल रुजवला, वाढवला आणि लोकप्रियही केला. त्यांच्या गझलाइतकेच त्यांचे हे गझल-कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे, ह्यात शंका नाही.

     - डॉ. अविनाश सांगोलेकर

भट, सुरेश श्रीधर