केळकर, दिनकर गंगाधर
राजा या आपल्या अकाली मृत्यू पावलेल्या मुलाच्या स्मृती जपण्यास उभ्या केलेल्या ‘राजा केळकर’ संग्रहालयासाठी स्वत:चे आयुष्य खर्ची घालणारे दिनकर गंगाधर केळकर यांचा जन्म पुण्यातील कामशेतजवळील करंजगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्यांचा गणित विषय कच्चा होता; पण त्यांना कवितेत मात्र विशेष रुची होती. दिनकर गंगाधर केळकरांना ‘काकासाहेब’ या नावाने ओळखत. काकासाहेबांना सुरुवातीला अडकित्ते, दिवे अशा पुरातन वस्तूंचे जतन करण्याचा छंद लागला. त्यामुळेच त्यांना अडकित्तेवाले, दिवेवाले केळकर म्हणून ओळखू लागले. या ऐतिहासिक वस्तू जमविण्यापायी श्रम, वेळ आणि पैसा किती खर्ची पडला हे सांगणे कठीण आहे.
पुण्यातील कॅम्प भागात असलेले चष्म्याचे दुकान हे काकासाहेबांच्या उपजीविकेचे मुख्य साधन होते. पुरातन वस्तू जमविण्याच्या छंदासाठी त्यांनी पत्नीचे दागिनेदेखील गहाण ठेवले होते. काकासाहेबांच्या पत्नी कमलाबाई यांचा पतीचा छंद जोपासण्यात मोठा वाटा होता. काकासाहेबांनी संपूर्ण भारतभर फिरून या दुर्मिळ वस्तू जमवल्या.
काकासाहेब केळकर हे कवी होते. ते ‘अज्ञातवासी’ या नावाने काव्यलेखन करीत. ‘अज्ञातनाद’ (१९२४) आणि ‘अज्ञातवासींची कविता’ हे त्यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. गोपीनाथ तळवलकर यांंनी संपादित केलेल्या ‘अज्ञातवासींची कविता’ या पुस्तकाचे दोन भाग प्रसिद्ध आहेत. अज्ञातवासींच्या कवितेमधून ‘वात्सल्यरस’ प्रतीत होतो. बालकांविषयीचे प्रेम आणि राष्ट्रीय विचार हे प्रामुख्याने त्यांच्या कवितांचे दोन विषय होते. ते इतिहासात रमत असल्याने त्यांना ऐतिहासिक वास्तू, पूर्वजांचे पराक्रम, गतवैभव यांविषयी विलक्षण अभिमान वाटे. त्यामुळेच हे विषय त्यांच्या काव्यलेखनात उतरले. काकांनी लिहिलेले ‘Lamps of India’ हे पुस्तक (इंग्रजी) भारत सरकारने १९६१ साली प्रकाशित केले. याची प्रस्तावना डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी लिहिली होती.
काकासाहेबांनी कवितालेखनाव्यतिरिक्त १९२३ मध्ये ‘महाराष्ट्र शारदा’ या पुस्तकाच्या पहिल्या भागाचे संपादन केले. तसेच, प्र. के. अत्रे यांच्या ‘झेंडूची फुले’ या संग्रहाचे देखील संपादन केले. परंतु, प्रामुख्याने काकासाहेबांनी स्वत:ला संग्रहालयासाठी वाहून घेतले.
घडलेल्या सांस्कृतिक इतिहासाची जपणूक करणे आणि हा ठेवा भावी पिढीस बघता यावा या दोन दृष्टिकोनांतूनच ‘राजा दिनकर केळकर’ वस्तुसंग्रहालयाची पुण्यात उभारणी झाली. हा अमूल्य संग्रह १९७५ मध्ये काकासाहेबांनी महाराष्ट्र शासनास भेट दिला. राष्ट्राची संपत्ती राष्ट्रास अर्पण करणे ही त्यामागील भावना होती. देश-विदेशांतील पर्यटक, अभ्यासू तज्ज्ञ अशा लोकांचा ओढा या संग्रहालयाकडे आजही आहे.
आज पैशांत किंमत करता येणार नाही असे हे संग्रहालय त्या काळी हैदराबादचे नवाब सालारजंग खरेदी करण्यास आले होते. त्या बदल्यात त्यांनी काकासाहेबांना कोरा धनादेश दिला व रक्कम भरण्यास सांगितली; पण त्यांनी तो नम्रतापूर्वक नाकारला. राजाच्या, म्हणजेच एकुलत्या एका मुलाच्या स्मरणार्थ उभे केलेले संग्रहालय याची तुलना पैशांत होणे अशक्य होते.
१९७६ मध्ये काकासाहेबांना फाय फाउण्डेशनचा पुरस्कार मिळाला. काकासाहेब केळकर यांच्या अभूतपूर्व कार्याची दखल घेऊन १९७८ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही पदवी प्रदान केली, तर १९८० मध्ये भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’ या किताबाने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे, त्यांना १९८८ मध्ये हैदराबादच्या सालारजंग संग्रहालयातर्फे सुवर्णपदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या पश्चात त्यांचे तीन नातू (प्रभा या त्यांच्या कन्येचे पुत्र) सुरेंद्र, सुधन्वा आणि सुदर्शन रानडे हे ‘राजा दिनकर केळकर’ या संग्रहालयाचे व्यवस्थापन उत्तम रितीने सांभाळत आहेत.