Skip to main content
x

कुलकर्णी, वसंत दिगंबर

संत दिगंबर कुलकर्णी यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील वडजी येथे झाला. शिक्षण बार्शी व पुणे येथे झाले. प्रथम बी. एससी. होण्याचा प्रयत्न होता. त्या दरम्यान महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मराठीच्या परीक्षा त्यांनी दिल्या. एस.पी.महाविद्यालयांमधून बी.ए. व एम.ए. झाले. या काळात प्रा.रा.श्री. जोग, प्रा.पु.ग. सहस्रबुद्धे, प्रा.गं.बा. सरदार, के.ना.वाटवे यांच्या संपर्कात आले. महानुभाव वाङ्मय, संतसाहित्य, समीक्षा, संशोधन, नाटक व रंगभूमी, नियतकालिकांचा अभ्यास या विविध विषयांमध्ये त्यांना रस राहिला.

प्रारंभी कौटुंबिक परिस्थितीमुळे रहितमपूर, पुणे, कराची, हैद्राबाद, माळीनगर अशा ठिकाणी त्यांनी माध्यमिक शाळांमधून अध्यापनाचे काम केले. १९५६ साली पुण्याच्या एस.पी.महाविद्यालयात मराठी-संस्कृतचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. विलेपार्ल्याच्या पार्ले महाविद्यालयामध्ये (आता साठे महाविद्यालय) यामध्ये ते मराठीचे प्राध्यापक म्हणून १९५९ साली नेमले गेले. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९७१च्या जूनमध्ये त्यांनी पदभार स्वीकारला. यथावकाश ते प्राध्यापक व विभाग प्रमुख झाले. १९८४च्या २०एप्रिलला ते निवृत्त झाले.

गॅलिलिओ’ (१९४८) हे त्यांचे पहिले पुस्तक, त्यानंतर लीळाचरित्र: एक अभ्यास’ (१९६७), ‘केशवसुतांचे अंतरंग’ (१९७३), ‘संगीत सौभद्र: घटना आणि स्वरूप’ (१९७४), ‘अर्वाचीन मराठी सारस्वतकार’ (१९७५), ‘साहित्य: रूप आणि गंध’ (१९७६), ‘ज्ञानेश्वर: काव्य आणि काव्यविचार’ (१९७७), ‘संत साहित्याची संकल्पना’ (१९८९), ‘पसायदान’ (१९९१), ‘श्रीज्ञानेश्वर: तत्त्वज्ञ, संत आणि कवी’ (१९९३), ‘ज्ञानेश्वरांचे काव्यशास्त्र’(१९९३), ‘संत सारस्वत: आकलन आणि आस्वाद’(१९९४), ‘मराठी साहित्य: विमर्श आणि विमर्शक’, ‘काव्य आणि काव्यास्वाद’, ‘गोदातटीचा अश्वत्थ,’ ‘पोएट बोरकर,’ ‘स्वातंत्र्यवीर सावरकर: एक चिंतन’(शेवटची पाच पुस्तके २००१ सालातली) ही पुस्तके प्रसिद्ध झाली. याशिवाय त्यांचे अन्य लेखनही आहे.

अभ्यासू वक्ता

अभ्यासू वक्ता म्हणून त्यांनी ख्याती संपादन केली होती. शिवाजी विद्यापीठ, गोवा येथील पदव्युत्तर मराठी विभागामध्ये त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम केले. ते विविध साहित्य संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रंथपुरस्कार समिती यांसारख्या सरकारी समित्यांवर त्यांची नेमणूक झाली होती. त्यांची दृष्टी उदार, मोकळी होती. त्यांना पाश्चात्त्य साहित्य सिद्धान्त समजून घेण्यातही रस असायचा. प्रा.गंगाधर पाटील यांच्यामुळे ते आपण समजून घेऊ शकलो, म्हणून त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे.

आलोचनामासिकातून संगीत सौभद्रविषयी त्यांनी लेखमाला लिहिली. पुढे त्याचे पुस्तक झाले. सदर पुस्तक संशोधन म्हणून त्यांनी मुंबई विद्यापीठाला सादर केले व त्यावर त्यांनी पीएच.डी. मिळवली.

त्यांचा मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयया संस्थांशी निकटचा संबंध राहिला. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे, मुंबई मराठी साहित्य संघातर्फे त्यांनी अनेक परिसंवाद, चर्चासत्रे व कार्यशाळा आयोजित केल्या. ते आकाशवाणीच्या पु.मं.लाड स्मारक व्याख्यानमालेचे वक्ते होते. वेगवेगळ्या ठिकाणच्या नामवंत व्याख्यानमालांमधून त्यांनी आपली व्याख्याने दिली. ज्ञानेश्वर आणि त्यांचे लेखन हा प्रायः त्यांचा आवडीचा व जिव्हाळ्याचा विषय राहिल्याने त्यांतील एकेका विषयावर ते व्याख्यानमाला गुंफत असत आणि पुढे त्यातून त्यांची ग्रंथसिद्धी होत असे.

मुंबई विद्यापीठातून निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी तिथे वाङ्मयीन नियतकालिकांचा अभ्यासहा प्रकार विभागातील सहकारी व विद्यार्थी यांच्या साहाय्याने राबवला. त्यांनी साहित्यचिंतननावाचे संशोधनपर लेखांच्या पुस्तकाचे संपादनही केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेने मराठी वाङ्मयाच्या इतिहास लेखनाचे काम अंगीकारले होते. त्यातील खंड क्र.६च्या भाग १ व भाग २ ह्यांचे त्यांनी प्रा.गो.म.कुलकर्णी यांच्या सहकार्याने संपादन केले होते.

त्यांनी वीर सावरकरांच्या जीवनावर नाटिकाही लिहिली होती. निवृत्तीनंतर ते पुण्याला स्थलांतरित झाले. त्या काळात त्यांचा कल हळूहळू अहमदनगरच्या क्षीरसागर महाराजांकडे राहिला. प्रारंभापासूनच त्यांना अध्यात्मविषयक व संत साहित्यविषयक रुची राहिली. त्यानंतर बाबामहाराज आर्वीकर यांच्या दिव्यामृतधारामुळे त्यांची बैठक सिद्ध व्हायला मदतच झाली. पुण्याच्या रामकृष्ण मठातही त्यांनी त्या अनुषंगाने व्याख्याने दिली. क्षीरसागर महाराजांच्या सहवासात आल्यावर महाराजांच्या सूचनेवरून तिथल्या श्रीगुरुसेवाया त्रैमासिक पत्रिकेचे संपादन व लेखन ते करीतच राहिले.

कुलकर्णींनी मराठी कविता: प्राचीन कालखंड (११५० ते १८४०) (१९६९), ‘एकांकिका वाटचाल’ (सहकार्याने १९६९), ‘आख्यानक कविता’ (सहकार्याने १९९३), ‘अप्रकाशित तांबे’ (सहकार्याने १९७४), ‘विज्ञान: साहित्य आणि संकल्पना’ (सहकार्याने १९९०) व कथाविहार’(सहकार्याने), ‘कविता फुलते अशी’ (सहकार्याने १९५७), ‘अज्ञात लीला’ (सहकार्याने १९८६) अशी संपादने केली. उत्तमया दिवाळी वार्षिकाचे त्यांनी १९६९, १९७० व १९७१ अशी तीन वर्षे वा.रा.ढवळे यांच्याबरोबर संपादन केले.

मराठी साहित्य समीक्षाहा त्यांचा एक प्रिय विषय होता. त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. त्यांच्या मृत्यूनंतरही त्या विषयावरील त्यांचे लेखन ग्रंथरूपाने प्रकाशित होत राहिले. कलावाद, जीवनवाद असे समीक्षेत अटीतटीचे वाद होताना व त्यामध्ये त्यांचे पूर्वकालीन व समकलीन समीक्षक हिरिरीने सहभागी होताना, त्यांची भूमिका मात्र मध्यम क्रमवादी राहिली. साहित्यकृतीच्या रचना सौंदर्याचा विचार त्यांना जसा हवासा वाटत असे, तसाच तिच्यातून आविष्कृत होणार्‍या जीवनसमस्यांचे सूक्ष्म भान त्यांना अपेक्षित असे. साहित्यकृतीच्या वाचनाने वाचकाच्या जाणिवा विस्तारल्या पाहिजेत आणि त्यामुळे मानवी जीवन समजायला मदत व्हायला हवी, अशी त्यांची धारणा होती.

- सुखदा कोरडे

संदर्भ :
१. कुलकर्णी, व. दि.; ‘धुळाक्षरातून मुळाक्षराकडे माझे विद्याजीवन’; सोहम् प्रकाशन, पुणे; १९९४. २.कुलकर्णी, व. दि.;  ‘सुमित्रा-संवाद’; स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे; १९९५.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].