Skip to main content
x

टिपणीस, अनिल यशवंत

          निल यशवंत टिपणीस यांचा जन्म नाशिकजवळील देवळाली येथे झाला. देवळाली येथील बार्न्स विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण पार पडले. जानेवारी १९५६मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एन.डी.ए.) पंधराव्या तुकडीमध्ये त्यांची निवड झाली. त्यांचे वडीलही सैन्याधिकारी होते. त्यामुळे घरातूनही सैन्यातल्या प्रवेशाला  कायमच पाठिंबा होता. लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून १९५९च्या जानेवारीमध्ये उड्डाण प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांनी एअर फोर्स फ्लाइंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते गोल्फमध्ये निष्णात असून मैदानी खेळांची त्यांना आवड आहे.

टिपणीस यांना लढाऊ वैमानिक म्हणून २८ मे १९६० रोजी नियुक्ती मिळाली. वैमानिकी प्रशिक्षणात सर्वोत्कृष्ट ठरल्याने त्यांना मजूमदार ट्रॉफीमिळाली. त्यानंतर टिपणीस विविध लढाऊ स्क्वॉड्रन्समध्ये लढाऊ  वैमानिक म्हणून अग्रिम हवाई मोर्च्यांवर कार्यरत होते. त्यांची पहिली नियुक्ती हंटरस्क्वॉड्रनमध्ये झाली.

१९६३मध्ये भारतात मिग-२१ विमाने आणून  पहिली सुपरसॉनिक स्क्वॉड्रनम्हणून अठ्ठाविसावी स्क्वॉड्रन निर्माण करणार्‍या पहिल्या वैमानिकांपैकी ते एक होते. याच स्क्वॉड्रनमध्ये १९६५च्या भारत-पाक युद्धात मिग-२१चे लढाऊ वैमानिक म्हणून त्यांचा सक्रिय सहभाग होता.

पायलट-अटॅक इन्स्ट्रक्टरहोण्याच्या प्रशिक्षणात पुन्हा सर्वोत्तम ठरल्याने, त्यांना १९६६मध्ये नरोन्हा ट्रॉफीमिळाली. भारत सरकारतर्फे इराकी वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी, ‘पायलट-अटॅक इन्स्ट्रक्टरम्हणून ते जानेवारी १९७०मध्ये इराकला गेले.

इराकहून परतल्यावर मिग-२१ विमानांच्या पंचेचाळिसाव्या स्क्वॉड्रनमध्ये ते फ्लाइट कमांडर म्हणून रुजू झाले.

१९७३मध्ये भारतीय वायुसेनेच्या टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटच्या (टॅकडे)  उड्डाण प्रशिक्षण अभ्यासक्रमात सर्वोत्तम ठरल्याने त्यांना स्वॉर्ड ऑफ ऑनर’ (मानाची तलवार) मिळाली व ते त्या संस्थेत फ्लाइट कमांडर म्हणून नियुक्त झाले. त्यांनी हवाई युद्धाची योजना व लढाऊ वैमानिकी रणनीती ह्या विषयांवर अध्ययन व संशोधन केले.

वेलिंग्टन येथे १९७५मध्ये डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये त्यांनी सैनिकी प्रशासनाचे प्रशिक्षण पूर्ण केले. जुलै १९७७मध्ये सुधारित मिग-२१ बिझविमानांच्या तेविसाव्या स्क्वॉड्रनचे ते विंग कमांडर दर्जाचे कमांडिंग ऑफिसर झाले. इंडो-सोव्हिएट जॉइंट स्पेस मिशनसाठी निवड झालेल्या चार अधिकार्‍यांपैकी ते एक होते. त्यांनी सर्व प्रशिक्षण यशस्विरीत्या पूर्णही केले, त्यांची अंतिम निवडही झाली; पण त्यांना राखीव दलात ठेवण्यात आले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एन.डी.ए.) टिपणीस हे चीफ इन्स्ट्रक्टर (एअर) आणि बटालियन कमांडर होते. १९८३मध्ये ग्रूप कॅप्टन असताना मिराज-२००० प्रकल्पाचे गटप्रमुख म्हणून त्यांची नेमणूक फ्रान्समध्ये झाली. मिराज-२००० विमाने भारतात आणण्यात त्यांचा सर्वांगीण सहभाग व पुढाकार होता.

तीन वर्षांनी भारतात परतल्यावर त्यांची एअर कमोडोरम्हणून बढती झाली व ते मिराज-२००० विमानांची दोन स्क्वॉड्रन्स असणार्‍या, ग्वाल्हेरच्या वायुसेना तळाचे एअर ऑफिसर कमांडिंगझाले. १९८९मध्ये त्यांनी दिल्लीच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमधील प्रशिक्षण पूर्ण केले. 

एअर व्हाइस मार्शल म्हणून जून १९९२मध्ये टिपणीस यांना पदोन्नती मिळाली. वायुसेना मुख्यालयात, ‘असिस्टंट चीफ ऑफ दि एअर स्टाफम्हणून त्यांची नियुक्ती झाली. जम्मू आणि काश्मीर विभागाचे एअर ऑफिसर कमांडिंगम्हणून त्यांनी जून १९९३मध्ये पदभार स्वीकारला. प्रत्येक पदावर कार्यरत असताना त्यांनी कौशल्य व क्षमता यांचे मापदंड  स्थापन केले. सप्टेंबर १९९४मध्ये पदोन्नती होऊन ते एअर मार्शलझाले. प्रथम वायुसेनेच्या पूर्व विभागाचे व फेब्रुवारी १९९५मध्ये ते पश्चिम विभागाचे सीनियर एअर स्टाफ ऑफिसरझाले. ऑगस्ट १९९५मध्ये ते वायुसेनेच्या अग्रिम व महत्त्वपूर्ण पश्चिम विभागाचे  एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफझाले. एप्रिल १९९७मध्ये ते वायुसेना उपाध्यक्ष व दि.३१ डिसेंबर १९९८रोजी एअर चीफ मार्शलझाले.

वायुसेनाध्यक्ष असतानाही ते सर्वत्र सतत स्वत: उड्डाण करीत. १९९९च्या कारगिल युद्धात त्यांनी मिग-२७ व मिराज-२००० विमानांमध्ये स्वत: उड्डाणे करून गौरवशाली इतिहास रचला. पदावर असलेल्या वायुसेनाध्यक्षाने, स्वत: प्रत्यक्ष हवाईयुद्धात उतरून, वैमानिक म्हणून सक्रिय होऊन भाग घेतला. टिपणीस यांच्या नेतृत्वाखाली मिराज-२०००च्या वैमानिकांनी शत्रूची दाणादाण उडवून दिली. शत्रूची सर्वांत मोठी मंथो ढालोयेथील छावणी अगदी जमीनदोस्त करून टाकली. शत्रूचे रसदीचे सर्व मार्ग नष्ट केले. येथूनच कारगिल युद्धाला, आपल्या दृष्टीने विधायक वळण लागले व पाकिस्तानचा पराभवची निश्चिती झाली.

अनिल टिपणीस यांनी उत्तम व उत्कृष्ट नेतृत्व केले. तसेच त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाचा गौरव म्हणून त्यांना वायुसेना पदक’, ‘अतिविशिष्ट सेवा पदकपरमविशिष्ट सेवा पदकहे सन्मान प्राप्त झाले. ते राष्ट्रपतींचे मानद एडीसीही होते. ते एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुविख्यात रक्षा विशेषज्ञ आहेत. 

- विंग कमांडर (निवृत्त) अशोक मोटे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].