Skip to main content
x

बोकील, मिलिंद श्रीधर

     वंचित समाजघटकासाठी सामाजिक जाणिवेतून क्रियाशील असणारे समाजशास्त्राचे अभ्यासक मिलिंद श्रीधर बोकील यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण डोंबिवली येथे तर अकरावी-बारावीचे शिक्षण मुंबईच्या रुईया महाविद्यालयात झाले. नंतर त्यांनी मुंबईतील सेन्ट झेव्हिअर्स टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेतून डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड रेडिओ इंजिनिअरिंग ही पदविका मिळविली. पुढे त्यांचा वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांशी संबंध आला. आदिवासी विभागात कार्य करणार्‍या बोकील यांच्यावर विनोबा, गांधी, जयप्रकाश यांच्या विचारांचा बराच परिणाम झाला. १९७९पासून ते जयप्रकाशांच्या ‘संपूर्ण क्रांती आंदोलना’त सहभागी झाले व ‘छात्रयुवा संघर्ष वाहिनी’शी संबंधित कार्य करू लागले. काही काळाने आंतरिक प्रेरणेतूनच समाजशास्त्र या विषयातील बी.ए. (१९८४) व एम.ए. (१९८६) या पदव्या त्यांनी मुंबई विद्यापीठातून संपादन केल्या. १९९२मध्ये समाजशास्त्र या विषयातील पीएच.डी. या पदवीसाठीचे संशोधन त्यांनी पुणे विद्यापीठातून पुरे केले. ‘उदकाचिया आर्ती’ (१९९४), ‘झेन गार्डन’ (२०००) हे कथासंग्रह; ‘समुद्रापारचे समाज’ (२०००) हा विदेशी समाजचित्रण करणारा प्रवासलेखांचा संग्रह; ‘जनाचे अनुभव पुसतां’ हा समाजशास्त्रीय अभ्यासपर लेखांचा संग्रह, ‘कातकरी: विकास की विस्थापन’ हे मानवशास्त्रीय संशोधन; ‘शाळा’ (२००४), ‘एकम्’ (२००८) व ‘समुद्र’ (२००९) या कादंबर्‍या असे बोकील यांचे एकंदर लेखन आहे.

     सामाजिक कार्यात निमग्न असणार्‍या बोकिलांच्या सर्जनशील लेखनातून सामाजिक वास्तवाची, त्यातील पेचप्रसंगांची व समस्यांची समज प्रकट होते. त्यामुळेच त्यांच्या कथा व्यक्तींचे चित्रण करताना व माणसाच्या एकाकीपणाचा बोध घडविताना व्यक्ती व समाज आणि व्यक्ती व तिचा परिसर यांच्यातील आंतरक्रियांशी निगडित असतात. ‘उदकाचिया आर्ती’ या त्यांच्या गाजलेल्या कथेमधून समकालीन राजकीय-सामाजिक समस्यांचे साक्षात संदर्भ असले, तरी ती कथा केवळ विशिष्ट व्यक्ती व परिस्थिती यांपुरतीच मर्यादित राहत नाही. व्यक्तीला आयुष्यातील निर्णायक प्रसंगांना सामोरे जाताना निर्णय घ्यावे लागतात व तदुत्पन्न परिणामांचा स्वीकार करावा लागतो, याचे भान बोकील मर्मग्राही पद्धतीने उत्पन्न करतात. सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड असणार्‍या मिलिंद बोकील यांची तीव्र संवेदनशीलता समाजातील विविध समस्यांशी निगडित अनुभवांचा बारकाव्याने वेध घेते. माणूस आणि यंत्र यांच्यातील नाते स्पष्ट करणारी ‘यंत्र’, स्त्री-स्वातंत्र्याच्या संकल्पनेवर प्रकाश टाकणारी ‘अधिष्ठान’, जीवनाच्या अनाकलनीयतेचा बोध घडविणारी ‘झेन गार्डन’ यांसारख्या कथा बोकिलांची कथालेखनावरील पकड स्पष्ट करणार्‍या आहेत. व्यामिश्र जीवनानुभव साकार करणार्‍या व व्यंजनेने अनेक गोष्टी सुचविणार्‍या बोकिलांच्या कथालेखनात वाचनीयतेला ढळ पोचत नाही की त्यांत क्लिष्टता वा अकारण गूढता येत नाही. अनुभवाला अचूक शब्दरूप देण्याची त्यांची क्षमता उल्लेखनीय आहे.

     त्यांची ‘शाळा’ ही कादंबरी नववीच्या वर्गात शिकणार्‍या जोशी या विद्यार्थ्याचे शाळेतील वेगवेगळे अनुभव चित्रित करते. कुमारवयीन मानसिकता आणि तरुण व प्रौढ मानसिकता यांना थेट भिडणार्‍या बहुविध प्रसंगांचे रेखाटन करणारी ही कादंबरी संबंधित अनुभवांतर्गत वास्तवाभिमुख नाट्यात्मता रंगवते. कुमारवयातील लैंगिकतेची स्फुरणे शालेय वातावरणात कोणता आकार धारण करतात, ते सूक्ष्मपणे सूचित करताना कादंबरीकाराने जोशी, चित्रे, सुर्‍या, केवडा, शिरोडकर इत्यादी मुलामुलींचे मनोव्यापार प्रभावीपणे शब्दांकित केले आहेत. अणीबाणीच्या काळाचा व तत्कालीन वातावरणाचा संदर्भ देऊन शालेय वातावरणाशी राजकीय घडामोडींचा संबंध जोडल्यामुळे या कादंबरीला एक सुदृढ परिमाण आपोआप प्राप्त होते. शालेय जीवनाला वाहिलेली मराठीतील ही पहिली कादंबरी आहे. कुमारवयातील मुले, त्यांची मानसिकता, लैंगिक अनुभवांसंबंधी त्यांना असणारी उत्सुकता व कुतूहल, मुलींबद्दल त्यांना वाटणारी ओढ, त्यांच्याशी घडणारे वर्तन, अल्पजीवी ठरणारे त्यांचे प्रेमजीवन, भावी आयुष्यासंबंधीच्या त्यांच्या अनिश्चित कल्पना, शिक्षकांविषयीच्या त्यांच्या उत्स्फूर्त व स्वाभाविक प्रतिक्रिया इत्यादींचे सूक्ष्म आकलन ‘शाळा’ या कादंबरीच्या यशास कारणीभूत ठरले आहे.

     आत्मसंवादाचा आकृतिबंध धारण करणारी ‘एकम्’ ही त्यांची दुसरी कादंबरी एका समर्थ, ताकदवान लेखिकेच्या अंतर्मनातील विविध गुंते उकलून दाखवते. आपल्या एकटेपणाच्या अवस्थेत लेखिकेने एकटेपणाशीच तटस्थपणे केलेला हा संवाद आहे. स्वत:ला स्वत:पासून वेगळे करत व स्वत:लाच न्याहाळत एकंदर आयुष्याचा, त्यात आलेल्या स्त्री-पुरुषांचा व लेखनासाठी निश्चयपूर्वक किंमत मोजणार्‍या स्त्रीच्या मनोरचनेचा वेध घेणारी ही कादंबरी आहे.

    नंदिनी व भास्कर या आनंदी दाम्पत्याच्या जीवनात नंदिनीला येऊन गेलेल्या परपुरुषसंबंधाच्या अनुभवामुळे उत्पन्न झालेली गुंतागुंत, तिचा संबंधित व्यक्तीच्या-भास्करच्या-भावविश्वावर झालेला परिणाम आणि घायाळ मनाची आंदोलने ‘समुद्र’ या कादंबरीत प्रत्ययकारी पद्धतीने व्यक्त झाली आहेत. भावनिक वादळानंतर स्वत:ला आवरून प्रगल्भ आंतरिक समजुतीच्या साहाय्याने आपले ढासळते भावविश्व सावरणारे बोकिलांनी निर्मिलेले हे जोडपे समकालीन स्त्री-पुरुषांच्या सहजीवनाला उपकारक अशी दिशा दर्शविते. बोकील सर्जनशील लेखनातून समूहजीवनाचे व्यक्तिमनावर होणारे परिणाम आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा स्वत:च्या निर्णयावर पडणारा प्रभाव, यांचा एकात्म असा सुमेळ साधताना पारंपरिक संचिताचे सातत्य कायम राखतात.

     ‘कातकरी: विकास की विस्थापन’ हे बोकील यांनी केलेले मानवशास्त्रीय संशोधन आहे. कातकरी समाज हा आदिम समाज असून त्याच्या आजवरच्या ससेहोलपटीचा आढावा त्यांनी प्रस्तुत ग्रंथातून घेतलेला आहे. खैराच्या झाडापासून कात तयार करणे हा व्यवसाय शेकडो वर्षे करणार्‍या  कातकरी समाजाचे भवितव्य; हा लेखकाच्या चिंतेचा विषय आहे. ब्रिटिश काळापासून जंगले शासनाच्या ताब्यात आली व जंगलांवरचे कातकर्‍यांचे पारंपरिक हक्क व अधिकार संपुष्टात आले. परिणामतः कंत्राटदार आले आणि स्वतंत्र उद्योग करणारे कातकरी बांधील मजूर झाले व त्यांचे शोषण सुरू झाले. तथाकथित वेगवेगळ्या विकास-योजना आखल्या जात असल्या, तरी कातकर्‍यांना उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन नसल्यामुळे हा समाज देशोधडीला लागण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये कातकरी समाजाचा विकास होणार की विस्थापन होणार, हा गंभीर प्रश्न विचारार्थ घेऊन, रायगड जिल्ह्यामधील कातकर्‍यांचा बारकाईने अभ्यास करून बोकिलांनी हा ग्रंथ लिहिला आहे.

     ‘समुद्रापारचे समाज’ या प्रवासलेखसंग्रहातून बोकील यांनी आशिया-युरोपपासून दक्षिण अमेरिकेपर्यंत पसरलेल्या विविध समाजांच्या जीवनपद्धती आणि समस्या स्पष्ट केल्या आहेत. हा प्रवास केवळ भौगोलिक स्वरूपाचा नसून आपल्या सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात संस्कृतिचक्राच्या प्रगती-अधोगतीचा, प्रकृति-विकृतीचा आणि शोषणाचा विविध पातळ्यांवरील वैचारिक शोध आहे. फिलिपिन्स,-थायलंड,-जपानपासून-बैराईट,-अ‍ॅमस्टरडॅम ते झिम्बाब्वे,-कोस्टारिकापर्यंत पसरलेल्या विविध समाजांच्या जीवनपद्धतींचे अवलोकन बोकील करतात. पाश्चात्त्य लोकांच्या संपर्कामुळे व प्रभावामुळे आदिवासी समाजातील निसर्गसन्मुख जीवनपद्धती लोप पावत चालल्याची भीती त्यांना वाटते. प्रगत देशांतील वाढत्या चंगळवादामुळे विकसनशील समाजाचे होत असणारे शोषण त्यांच्या चिंतेचा विषय ठरते. जागतिकीकरण आणि संस्कृतिसंवर्धन यांचे दार्शनिक विश्लेषण करणारे हे पुस्तक बोकील यांच्या प्रगल्भ वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा आणि संयतशील लेखनशैलीचा प्रत्यय आणून देते.

     ‘जनाचे अनुभव पुसतां’ (२००२) या लेखसंग्रहातून लेखकाने माणसे, त्यांच्या भोवतालची नैसर्गिक साधनसंपत्ती व तिचा ते करीत असलेला वापर या अनुषंगाने एका सामाजिक स्थित्यंतराचा समग्रतेने घेतलेला शोध मांडला आहे. ही मांडणी क्षेत्रीय पाहणी, स्वयंस्फूर्त संस्थांच्या कार्यपद्धतीचे अवलोकन व संबंधित विषयाचा ऐतिहासिक मागोवा अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनांतूनन केलेली आहे. शेतजमिनीचे प्रश्न, औद्योगिकीकरणाबरोबर येणार्‍या नागरीकरणातून निर्माण होणारे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न, जंगलखात्याच्या जमिनीचे प्रश्न, भारतीय शेतीचे प्रश्न असे विविध प्रश्न मुळात बोकील यांना त्यांच्या समाजकार्यातील सहभागामुळे पडलेले आहेत. आणि त्यांचा उलगडा करण्याच्या प्रयत्नातून त्यांनी केलेल्या समाजशास्त्रीय संशोधनाचे फलित म्हणजे हा लेखसंग्रह. बोकिलांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीमुळे व निर्मितिशील लेखनशैलीमुळे यातील प्रत्येक लेख चित्रदर्शी स्वरूपात प्रकटतो. या दृष्टीने ‘भूमिकन्यांचे भालप्रदेश’, ‘किनार्‍यावरचा कल्पवृक्ष’, ‘भरती आणि ओहोटी’, ‘प्राण्यांना अभय, माणसांना वनवास’ हे लेख विचारप्रवर्तक असूनही कोरडे झालेले नाहीत, तर रोचक बनले आहेत. एक समाजशास्त्रज्ञ म्हणून बोकिलांची सकारात्मक दृष्टी या लेखांमधून प्रकटते. नैसर्गिक साधनसंपत्ती टिकविण्याविषयी व ती अधिक उत्पादक करण्याविषयी त्यांनी मांडलेली भूमिका, विकासप्रक्रियेविषयीची त्यांची कल्पना यांमधून त्यांचा आशावादी दृष्टिकोन व्यक्त झाला आहे. तो त्यांना अपेक्षित परिवर्तन घडविण्यास साहाय्यकारी ठरणारा आहे.

    बोकिलांच्या ‘उदकाचिया आर्ती’ या कथेला १९९४ साली दिल्लीतील ‘कथा’ या संस्थेने विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे. शिवाय या कथासंग्रहास ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. ‘समुद्रापारचे समाज’ या पुस्तकास ‘केशवराव कोठावळे पारितोषिक’ लाभले आहे.

    - प्रा. डॉ. विलास खोले

बोकील, मिलिंद श्रीधर