Skip to main content
x

नातू, मनू गंगाधर

नूताई नातू यांचा जन्म वाशीम येथे झाला. मनूताईंच्या वडिलांची फिरतीची नोकरी असल्याने त्यांचे माध्यमिक शिक्षण वाई, परतवाडा अशा विविध ठिकाणी झाले. मराठी विषय घेऊन त्या नागपूर येथून एम. ए. झाल्या आणि १९४६ पासून १९७७ पर्यंत त्या अमरावती येथे विदर्भ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या.

बालवयात त्यांच्यावर झालेल्या उत्तम संस्कारांचा उत्कट परिचय ‘अमृत’ या मामा क्षीरसागर यांच्या ‘अमृत महोत्सवा’निमित्त प्रकाशित ग्रंथातील ‘जरि माह्येरे श्रीमंते होंति। तुम्हां ऐसी’ या लेखातून होतो. त्यांच्या जडण-घडणीत मामांची अविस्मरणीय भूमिका असल्याचा उल्लेख मनुताई कृतज्ञतापूर्वक करतात. ‘ज्ञानेश्वरीतील आक्षेप: एक चिंतन’ ह्या मनूताईंच्या लेखाचा पाठपुरावा मामांनी केला होता.

विदुषी व ख्यातनाम वक्त्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनूताईंच्या लेखनाचा शुभारंभ १९४७ साली ‘नवभारत’मधील लेखाने झाला. चिं.त्र्यं.खानोलकरांच्या प्रतिभेचे आगळेपण मनूताईंनी सहृदयतेने, संवेदनशीलतेने ‘वेदनेचा वेध: खानोलकरांची कादंबरी- एक आकलन’ या पुस्तकातून कुशलतेने प्रत्ययास आणून दिले आहे. लेखिकेने केलेले मार्मिक विश्लेषण अत्यंत प्रभावी आहे. आगरकरांच्या विचारांची व शैलीची छाप मनूताईंच्या ‘विवेकाची गोठी’ (१९७७) या निबंध संग्रहावर असल्याचे जाणवते. गोपाळ गणेश आगरकर यांच्या समग्र लेखनाचे तीन खंड प्रा.दि.य.देशपांडे यांच्या सहकार्याने मनूताईंनी प्रसिद्ध केले (१९७४-१९७६).

मनूताईंनी लेखनातून व व्याख्यानातून आगरकरांच्या विवेकवादी विचारसरणीचा पुरस्कार आयुष्यभर केला.

- वि. ग. जोशी

नातू, मनू गंगाधर