मजुमदार, रमेशचंद्र हलधर
रमेशचंद्र हलधर मजुमदार यांचा जन्म खंडारपाटा, जिल्हा फरीदपूर, बंगाल (आता बांगला देश) येथे सधन कुटुंबात झाला. रमेशचंद्र यांच्या आईचे नाव बिधुमुखी होते. प्राचीन इतिहास रमेशचंद्र यांच्या अध्ययनाचा प्रमुख विषय होता. त्यांनी मध्ययुगीन बृहत्तर व आधुनिक भारताचाही अभ्यास व संशोधन केले. भारतीय इतिहासाविषयीचे त्यांचे संशोधनकार्य आदर्श आणि प्रेरणादायी आहे.
कटक व रेवनशॉ महाविद्यालयात सुरुवातीचे शिक्षण झाल्यावर १९११मध्ये प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून कोलकाता विद्यापीठाची एम.ए. पदवी त्यांनी मिळवली. ते ढाका विद्यापीठात अधिव्याख्याते व प्राध्यापक असतानाच त्यांना प्रेमचंद रायचंद शिष्यवृत्ती मिळाली व त्यांनी कुशाण वंशाचे संशोधन केले. ‘कॉर्पोरेट लाइफ इन एन्शंट इंडिया’ या प्रबंधामुळे रमेशचंद्रांनी पीएच.डी. पदवीबरोबर ग्रिफिथ मेमोरिअल पारितोषिकही मिळवले. नंतर ते ढाका विद्यापीठात इतिहास विभागप्रमुख (१९२१) व कुलगुरू (१९३७-४२) आणि मग बनारस हिंदू विद्यापीठात इतिहास विभागप्रमुख (१९४२) झाले. पुढे १९५८-५९ या कालावधीमध्ये शिकागो व पेनसिल्व्हेनिया व अन्य परदेशी विद्यापीठांत ते अभ्यागत व्याख्याते म्हणून गेले होते. अध्यापनासाठी ते १९२८ साली युरोपातील विविध देशांत गेले होते. त्यांनी इजिप्त तसेच सुमात्रा, कंबोडिया, सयाम, मलाया येथील प्रवासात त्या देशांवरील भारतीय संस्कृतीचा प्रभाव व प्रसार याचा अभ्यास केला आणि ‘एन्शंट इंडियन कॉलनीज इन द फार ईस्ट’ (१९२७, ३ खंड) हा बृहद्भारतावरील ग्रंथ लिहिला.
रमेशचंद्रांनी ‘सिपाय म्युटिनी अॅन्ड द रिव्होल्ट ऑफ १८५७’ (१९५७) या पुस्तकात १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध नव्हते तर बंडच होते, असेच मांडले. ‘क्लासिकल अकौंट्स ऑफ इंडिया’ (१९६०) या ग्रंथात त्यांनी प्राचीन पाश्चिमात्य इतिहासकार व प्रवासी यांची भारताविषयीची मते संकलित केली आहेत. इतिहासातील त्यांचे प्रभुत्व लक्षात घेऊन कन्हैयालाल मुनशींनी त्यांना भारतीय विद्याभवनाचे इतिहासप्रमुख आणि ‘द हिस्टरी अॅन्ड कल्चर ऑफ द इंडियन पीपल’ (११ खंड, १९४४-७७) या इतिहास मालिकेचे संपादक म्हणून नेमले. रमेशचंद्रांनी ही ९,००० पृष्ठांची मालिका मोठ्या चिकाटीने पूर्ण केली.
रमेशचंद्र मजुमदार यांनी इतिहासाशी निगडित पुस्तकांना अभ्यासपूर्ण प्रस्तावनाही लिहिल्या. या प्रस्तावनांमधून त्यांची विद्वता व परखड, निर्भय वृत्ती प्रत्ययास येते. ‘ग्रेट वूमेन ऑफ इंडिया’ (१९५३), ‘एक्स्पान्शन ऑफ आर्यन कल्चर अॅन्ड ईस्टर्न इंडिया’ (१९६०), ‘ग्लिम्प्सेस ऑफ बेंगॉल इन द नाइन्टीन्थ सेंच्युरी’ (१९६०), ‘हिस्टरी ऑफ द फ्रीडम मूव्हमेंट इन इंडिया’ (१९६३, ३ खंड), ‘इंडियन रिलिजन्स’ (१९६३), ‘कॉलनीज इन द फार ईस्ट’ (१९७३) वगैरे त्यांचे महत्त्वाचे लोकप्रिय ग्रंथ आहेत. याशिवाय त्यांचे अनेक शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत. मृदू व लाघवी वाणीमुळे रमेशचंद्रांची इंग्लिश व्याख्याने मंत्रमुग्ध करणारी असत.
रमेशचंद्रांंना अनेक मानसन्मान लाभले होते. उदाहरणार्थ, अखिल भारतीय इतिहास परिषद, अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद व इस्तंबूलच्या प्राच्यविद्या परिषदेची एक शाखा यांचे अध्यक्षपद, एशियाटिक सोसायटी (कोलकाता व मुंबई) व रॉयल एशियाटिक सोसायटी (ग्रेट ब्रिटन-आयर्लंड) यांची सन्माननीय फेलोशिप, १९६७-६८मध्ये कोलकाताचे नगरपालपद, युनेस्को प्रसृत ‘द हिस्टरी ऑफ मॅनकाइंड’ या जागतिक लेखन समितीचे उपाध्यक्षपद, सर जॉर्ज कँबेल, बी.सी. लॉ आणि सर विल्यम जोन्स स्मृती सुवर्णपदके, तसेच कोलकाता, जादवपूर, रवींद्र भारती वगैरे विद्यापीठांच्या सन्माननीय डी.लिट. पदव्या इत्यादी. तसेच इतिहास संशोधक मंडळ व भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था (पुणे), फादर हेरास इन्स्टिट्यूट (मुंबई), वंगीय साहित्य परिषद (कोलकाता) वगैरे संस्थांशी रमेशचंद्रांचा निकटचा संबंध होता.
— संपादित
२. अर्वाचीन चरित्रकोश; संपादक, चित्राव सिद्धेश्वरशास्त्री