Skip to main content
x

घुले-पाटील, मारुतराव शंकर

     मारुतराव शंकर घुले-पाटील यांचा जन्म श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. बनकर-पाटील घराण्यात जन्मलेले मारुतराव शेवगाव तालुक्यातील दहिगावने या गावातील घुले-पाटील या समृद्ध शेतकरी कुटुंबात दत्तक गेले होते. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. घरचा पारंपरिक शेती व्यवसाय करत असतानाच त्यांना सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. म्हणूनच शिक्षणाचे महत्त्व जाणून त्यांनी दहिगावने गावात जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. तसेच बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी वसतिगृहासह नवजीवन विद्यालय सुरू केले.

     घुले-पाटील हे हाडाचे शेतकरी असल्यामुळे त्यांनी सर्वसामान्य शेतकर्‍यांचा विचार करून दहिगावने या गावात सोसायटीची स्थापना केली. तेव्हा ते गावचे पोलिस-पाटील म्हणून कार्यरत होते. याच काळात आपल्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांनी शेवगाव खरेदी-विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली व ते संचालक झाले. या पदावरून त्यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी आवश्यक असणारी कामे केली. शेतीमध्ये नव्या-नव्या तंत्रांचा वापर करून शेतीत उत्पादनवाढ शक्य आहे, हे त्यांनी प्रात्यक्षिकांसह दाखवून दिले. पाण्याशिवाय कृषी-औद्योगिक विकास अशक्य आहे, हे लक्षात आल्यामुळे त्यांनी ताजनापूर उपसा जलसिंचन योजना राबविली व तेथील शेतकर्‍यांचा आर्थिक कायापालट घडवून आणला.

     शेतकर्‍यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा म्हणून घुले-पाटील यांनी जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्थेची स्थापना शेवगाव येथे केली. सहकारी तत्त्वावर चालणारी महाराष्ट्रातील एकमेव आदर्श संस्था ठरली. तसेच शेवगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची स्थापना केली. प्राथमिक सेवा सहकारी सोसायटी व खरेदी-विक्री संघामार्फत मालतारणाचा व्यवहार करून त्यांनी शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य मिळवून दिले.

     आशिया खंडामधील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची 1959 मध्ये स्थापना झाली आणि तेव्हापासूनच घुले-पाटील यांची संस्थापक संचालक म्हणून नियुक्ती झाली. ते या बँकेचे 1977 ते 1979 या काळात अध्यक्ष होते. त्यांनी 1964 ते 1974 या काळात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षस्थान भूषविले. जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष बलवान करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांची 1962 व 1967 मध्ये शेवगाव-नेवासे विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर दोन वेळेस बहुमताने निवड झाली.

     घुले-पाटील यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व बाबासाहेब नरवडे-पाटील यांच्या सहकार्याने 1970 मध्ये नेवासा तालुक्यात भेंडा बुद्रुक येथे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यांनी कारखान्याला साखरेच्या उतार्‍यामध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळवून दिली.

     घुले-पाटील 1972 ते 1978 या काळात एकदा विधानपरिषदेवर निवडून आले. तेव्हा कायदे करताना शेतकर्‍यांचे हित साधण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असे. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा पगडा असल्यामुळे त्यांना आपल्या जीवनाला विधायक वळण देता आले. नगर जिल्ह्यातील नेवासा व शेवगाव तालुक्यात लोक त्यांना ‘मालक’ या नावाने ओळखतात.

     घुले-पाटील यांना महाराष्ट्र शासनाने इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार प्रदान करून गौरविले. सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन जिल्हा सहकारी बँकेमार्फत त्यांना ‘सहकारभूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

     घुले-पाटील यांना तीन पुत्र आहेत. त्यांचे थोरले चिरंजीव नरेंद्र हे राजकारणात सक्रिय असून 1999 ते 2009 या काळात विधानसभा सदस्य होते. तर दुसरे  चिरंजीव चंद्रशेखर हे ज्ञानेश्वर कारखान्याचे अध्यक्ष असून ते आमदार आहेत. तिसरे चिरंजीव राजेंद्र उच्चविद्याविभूषित असून परदेशात राहतात.

- संपादित

घुले-पाटील, मारुतराव शंकर