Skip to main content
x

विखे-पाटील, एकनाथ विठ्ठल

बाळासाहेब विखे-पाटील

कनाथ विठ्ठलराव विखे-पाटील यांचा जन्म ‘लोणी’ या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे जनक कै. पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांचे सुपुत्र बाळासाहेब विखे-पाटील यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून जवळजवळ एक तप स्वत:ची शेती व्यवसाय अतिशय काळजीपूर्वक सांभाळला. घरातच सहकारी चळवळीचे बाळकडू मिळाल्याने सहकार चळवळीच्या माध्यमातून गरीब शेतकर्‍यांची आणि श्रमिकांची सावकारांच्या गुलामगिरीतून आणि दैन्य व दारिद्र्यातून मुक्तता करणे हाच त्यांचा ध्यास बनला.

सहकारी चळवळ हीच मुळी भारतीय मानसिकतेवर आधारलेली आहे. अहिंसक, शांततापूर्ण आणि सनदशीर मार्गाने खाजगी मालमत्तेचे स्वामित्व विसर्जन न करता उत्पादन साधनावर स्वत: मालकी ठेवून स्वावलंबी बनायचे, उत्पादन काढायचे आणि स्वत:ची पत आणि प्रतिष्ठा निर्माण करावयाची हे सहकाराचे मर्म आहे.

सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर यांना सहकारी चळवळीचे महत्त्व पटवून देऊन बाळासाहेबांनी त्यांना संघटित केले. सहकारी चळवळीच्या माध्यमातूनच हा वर्ग ताठ मानेने, स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण जीवन जगू शकतो. भौतिक प्रगती बरोबरच त्यांची सांस्कृतिक आणि वैचारिक प्रगती होऊ शकते. पण त्यासाठी सर्वप्रथम त्याला आर्थिक पत प्राप्त झाली पाहिजे. यासाठी बाळासाहेबांनी गावपातळीवर विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांची निर्मिती करण्याबरोबरच (दूध डेअरी, सूतगिरणी, मजूर सहकारी संस्था, कुक्कुटपालन, सहकारी बँका इ.) सहकारी संस्था निर्मितीला चालना दिली आणि लहान मोठ्या व्यावसायिकांना कर्जपुरवठा करण्यासाठी 1976 मध्ये प्रवरा सहकारी बँकेची स्थापना केली.

बाळासाहेबांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, पाथर्डी, संगमनेर, केज, इत्यादी सहकारी कारखान्यांच्या स्थापनेत पुढाकार घेतला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक, महाराष्ट्र साखर संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र मद्यार्क निर्मिती संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्याचप्रमाणे प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष कारभार पाहिला. प्रवरा सहकारी साखर कारखाना हा केवळ साखर उत्पादन करणारी यंत्रणा एवढ्यापुरताच मर्यादित न ठेवता, त्या माध्यमातून अनेक कृषी प्रकल्प, रस्ते, पाझरतलाव, शिक्षणोत्तेजक पतपेढ्या, शैक्षणिक व आरोग्य सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध केल्या. याशिवाय सभासद आणि लाभधारकांसाठी अनेक कल्याणकारी योजना त्यांनी राबविल्या. सहकारी चळवळ ही केवळ उपेक्षितांची भौतिक प्रगती साधणारी चळवळ न राहता ती एक संस्कृती बनावी असे त्यांचे ध्येय आहे.

सहकाराच्या माध्यमातून कृषी, औद्योगिक समाज निर्माण करणे एवढेच सिमित उद्दिष्ट त्यांचे नाही. तर वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ विज्ञाननिष्ठ, प्रयोगशील, नवविचारांचे आणि आचारांचे स्वागत करणारा, उदारमतवादी आणि सहिष्णु समाज निर्माण करणे हे त्यांचे स्वप्न आहे व ते पूर्ण करण्यासाठी हे सातत्याने प्रयत्नशील असतात. जवळजवळ तीन तपे भारतीय संसदेचे सदस्य, विविध संसदीय समित्यांचे सदस्य/अध्यक्ष, अर्थराज्यमंत्री, केंद्रिय अवजड उद्योग मंत्री आणि असंख्य राज्य व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील समितींवर कार्य करताना ते सदैव जिज्ञासू वृत्तीने पहात राहिले, शिकत राहिले आणि या अनुभवाचा आपल्या समाजासाठी उपयोग केला.

प्रवरानगर ही सहकारी चळवळीची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. इंग्रजी माध्यमांचे पब्लिक स्कूल, मुलींच्या शाळा, कला व विज्ञान महाविद्यालये, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध उपशाखा अशा ज्ञानाच्या विविध शाखांची उभारणी करून त्यांना जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी ते सदैव शिक्षण, प्राध्यापक व प्राचार्यांना प्रोत्साहन देत असतात.

आपला शेतकरी, कामगार, कार्यकर्ता, विद्यार्थी आणि शिक्षकाने कालसुसंगत ज्ञान प्राप्त केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. त्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रे, कार्यशाळा, परिषदा आयोजित करण्यावर त्यांचा विशेष कटाक्ष असतो. कला, साहित्य, खेळ या क्षेत्रातील विविध स्पर्धा, संम्मेलने, व्याख्यानमाला, चर्चासत्रे यांचे आयोजन येथे नेहमीच केले जाते. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ राज्य पातळीवरील साहित्य पुरस्कार, कला क्षेत्रात दिला जाणारा पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळांच्या स्पर्धा म्हणजे प्रवरेच्या सहकाराच्या कर्मभूमीत समाजातील बहुरंगी आणि बहुढंगी घटकांची घेतलेली नोंद होय.

बाळासाहेब विखे-पाटलांनी सहकारी चळवळीला केवळ आर्थिक विकासाचे साधन न मानता, ‘नाही रे वर्गाच्या’ सर्वांगीण परिवर्तनाचे साधन बनविले. त्यामुळे प्रवरानगर हे सहकारी चळवळीचे विकास मॉडेल (प्रारुप) म्हणून देशभर स्वीकारले गेले आहे. याचे श्रेय पद्मभूषण बाळासाहेब विखे-पाटलांना जाते.

- प्रा. सुधाकर तुकाराम निकम

विखे-पाटील, एकनाथ विठ्ठल