वर्दे, वामन पांडुरंग
वामन पांडुरंग वर्दे यांचा जन्म दत्तजयंतीच्या दिवशी कोकणातील वेंगुर्ले या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण रत्नागिरीला झाले. ते 1913 मध्ये मॅट्रिकची परीक्षा रत्नागिरी येथेच उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मुंबईला आले. त्यांनी 1918 मध्ये मुंबई येथील सिडनेहॅम महाविद्यालयातून बँकिंग या विषयात बी. कॉम. ची पदवी मिळवली. नंतर त्यांनी टाटा इंडस्ट्रियल बँकेत दोन वर्षे नोकरी केली व त्यानंतर ते युनियन बँकेत काम करू लागले. ते 1922 मध्ये राज्य सहकारी बँकेत रुजू झाले. त्यावेळेस वैकुंठभाई मेहता या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक होते. वर्दे या बँकेत 1934 पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर वर्दे यांनी शेअर ब्रोकर आर. आर. नाबर यांच्या कंपनीत भागीदार म्हणून प्रवेश केला व 1937 मध्ये कंपनीची सर्व सूत्रे वर्दे यांच्या हातात आली. सारस्वत सहकारी बँक व बँक ऑफ महाराष्ट्र या दोन बँका वर्दे यांनी नावारूपाला आणल्या. त्यांची 1921 पासूनच सारस्वत बँकेशी संबंध होता व या बँकेचे ते सलग 30 वर्षे अध्यक्ष होते.
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्ताने केसरीच्या ‘औद्योगिक व व्यापारी महाराष्ट्र’ या 1 ऑगस्ट 1934 च्या अंकामध्ये वर्दे यांनी ‘महाराष्ट्राला खास बँक असावी व ती प्रामुख्याने महाराष्ट्रीयांची व्यापारी बँक असावी’ असे आपले मतप्रदर्शन केले. त्यांच्या या विचाराने प्रभावित होऊन ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ या बँकेच्या उभारणीस चालना मिळाली व 26 सप्टेंबर 1935 रोजी बँक स्थापन करण्यात आली. बँकेच्या नियमित कारभाराला 8 फेब्रुवारी 1936 रोजी सुरुवात झाली.
बँक व्यवसायाच्या गरजा भागवणे अपरिहार्य असले तरी ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याची दक्षता वर्दे यांनी आपल्या कार्यकाळात घेतली. तसेच भागीदार, ठेवीदार, कर्जदार व कर्मचारी यांच्यामध्ये आपलेपणाचे व विश्वासाचे नाते टिकवून ठेवण्यातही ते यशस्वी झाले. त्यांनी नवोदित तरुण पिढीला उद्योगधंद्याला प्रवृत्त करण्याचे मोलाचे कार्य केले. हे त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे.
वर्दे यांच्यातील सामुदायिक नेतृत्व गुणाचे दर्शन बँक ऑफ महाराष्ट्र, सारस्वत सहकारी बँक व मुंबई राज्य सहकारी बँक या तीन बँकांच्या यशाकडे पाहून होते. त्यांनी अनेक सहकारी कारखान्यांना जीवनदान देण्याचे मौलिक कार्यही केले.
- संपादित