Skip to main content
x

वाघ, देवराम सयाजी

काकासाहेब वाघ

देवराम सयाजी वाघ यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. बहुजन समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला व येथूनच त्यांच्या समाजकार्याला प्रारंभ झाला. त्यांनी शेतकरी, कामगार समाजातीलदुबळ्याघटकांवर आपले लक्ष केंद्रित केले. सर्वसामान्यजनतेचेजीवनमान सुधारण्यासाठीराजकीयसत्तेचे पद गौण मानून सहकार, शिक्षण, शेती व बहुजन समाजाच्या विकासासाठी त्यांनी स्वत:चे सर्वस्व पणाला लावले. वाघ यांनी सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेत अतुलनीय योगदान दिले. मुंबई प्रांताच्या मध्यवर्ती सहकारी बँकेने नाशिक विभागातील परिसराचा आढावा घेऊन या भागातील शेतकरी सहकारी तत्त्वावर कारखाना चालवू शकतात असा निर्वाळा दिल्यानंतर 17 डिसेंबर 1945 रोजी अर्थतज्ज्ञ व सहकारी चळवळीचे आद्य प्रणेते डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अथक परिश्रमातून साखर कारखान्याची नोंदणी करण्यात आली. शेतकर्‍यांचे स्वत:चे साखर कारखाने असावेत असे काकासाहेबांचे मत होते. गिरणा कालव्याच्या परिसरात ऊसाचे भरपूर उत्पादन होत असल्यामुळे या परिसरात सहकारी साखर कारखाना असावा या धारणेतून त्यांनी भाऊसाहेब हिरेंच्या पुढाकाराने 6 एप्रिल 1955 रोजी कारखान्याची नोंदणी केली.

त्यानंतर लवकरच गिरणा सहकारी साखर कारखान्याची स्थापना होऊन बागलाण, मालेगाव तालुक्यातील ते मोठे कृषी औद्योगिक केंद्र म्हणून नावारूपास आले. दाभाडी कारखान्याचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर काकासाहेब वाघ यांनी भाऊसाहेब हिरेंच्या सहकार्याने निफाड परिसरातील सहकारी कार्यकर्त्यांची व ऊस उत्पादकांची सभा भरवून निफाड सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेचा निर्णय घेतला. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात  त्यांनी अवघ्या 14 दिवसांत 11 लाख 50 हजाराचे भांडवल जमा केले.

काकासाहेब वाघ यांनी सहकारी तत्त्वावरील आसवणी, किसान बेकरी असे अनेक पूरक उद्योग सुरू केले. तसेच कारखाने स्थापन झाल्यानंतर कारखानदारांच्या समस्या संयुक्तपणे सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना नावाची मध्यवर्ती संस्था स्थापन केली. त्यांनी 1969 ते 1971 या काळात संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी   सांभाळली. त्यानंतरच्या काळात रानवड सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून त्याचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.

शेतकर्‍यांच्या भाताला रास्त भाव मिळावा म्हणून 1948 मध्ये काकासाहेब वाघ यांनी सत्याग्रह व असहकार पुकारला. तत्कालीन जहागिरदार व हितसंबंधी लोकांविरुद्ध लढून त्यांनी चांदवड तालुक्यातील केंद्राई धरणाचे पाणी खडकमाळे गावाला मिळवून दिले. त्यांनी पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाच्या उभारणीसाठी काकासाहेब वाघ यांनी अथक परिश्रम घेतले व पैसा उभा केला, इमारतीची सोय केली व विद्यार्थीही जमविले. पुणे विद्यापीठाने ग्रामीण भागातील महाविद्यालयाची परवानगी नाकारली तरीही नाउमेद न होता कुलगुरूंच्या सहाय्याने त्यांनी ती मिळवली. त्याचबरोबरीने त्यांना नेवासा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालय व पाथर्डीच्या महाविद्यालयांनाही परवानगी मिळाली. जनसामान्यांची मानवंदना म्हणून या महाविद्यालयाला ‘कर्मवीर काकासाहेब वाघ’ असे नाव देण्यात आले.

वाघ यांनी महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या प्रयत्नाने व जिद्दीने उपसा जलसिंचन योजना मंजूर करून घेतली. ही योजना पुढील काळात कर्मवीर काकासाहेब वाघ उपसा जलसिंचन म्हणून नावारूपाला आली. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना योग्य न्याय मिळावा, ऊसाचा योग्य वापर होऊन साखर उत्पादनात देश स्वयंपूर्ण व्हावा या उद्देशाने त्यांनी रानवड, नाशिक व कादवा सहकारी साखर कारखान्यास केंद्र शासनाकडून मंजुरी मिळवून दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या साखर कारखान्यांना शासनाने सबल करण्यासाठी प्रसंगी कायदे व नियम शिथिल करून मदत करावी ही भूमिका त्यांनी ठामपणे घेतली. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारी व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना नावारूपास आले.

वाघ यांनी शिक्षणक्षेत्र, समाजकारण आणि राजकारण यांसोबत बांधकाम ठेकेदाराचा व्यवसायही केला. कामाच्या गुणवत्तेबाबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. त्यांनी 1935 मध्ये नाशिक नगरपालिकेच्या इमारतीच्या बांधकामाचा ठेका घेऊन 1937 मध्ये ते पूर्ण केले.

रावसाहेब थोरात, भाऊसाहेब हिरे, अण्णासाहेब मुरकुटे यांच्याबरोबर नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारकाच्या शिक्षण विस्ताराची व आर्थिक बाबींची जबाबदारी काकासाहेब वाघ यांनी सांभाळली व जिद्दीने, कळकळीने आणि संघटित वृत्तीने मराठा विद्या प्रसारक समाजाचे धुरिणत्व पत्करले. सिन्नर महाविद्यालयाच्या उभारणीच्या वेळेस आर्थिक प्रश्नामुळे अडचण निर्माण झाली. त्यावेळेस त्यांनी आपल्या सत्कार निधीतून 2 लाख 10 हजार रुपये मराठा विद्या प्रसारक समाजास दिले. आणि सिन्नरचे महाविद्यालय आकारास आले. मराठा विद्या प्रसारक समाजाची जबाबदारी त्यांच्याकडे असतानाच पिंपळगाव, सटाणा, सिन्नर व नाशिक येथील महाविद्यालये आकाराला आली. त्यांनी अखिल भारतीय स्तरावर पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव आण्णा पाटील, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या खांद्याशी खांदा लावून शैक्षणिक कार्य केले.

वाघ यांचा निस्सीम त्याग, सामाजिक, सहकार व शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान पाहून भारत सरकारने त्यांना 26जानेवारी1970 रोजी पद्मश्री पुरस्कार किताब देऊन गौरविले. बहुजनांसाठी अहोरात्र राबलेल्या लोकनेत्यास नाशिक जिल्ह्यातील जनतेने कर्मवीर ही पदवी बहाल करून त्यांच्या नि:स्पृह कार्याचा यथोचित सन्मान केला.

- संजीव शंकर अहिरे

वाघ, देवराम सयाजी