Skip to main content
x

विचारे, केशव विश्राम

केशव विश्राम विचारे यांचा जन्म चिपळूण तालुक्यातील आडूर या गावी उच्चकुलीन मराठा कुटुंबात झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मुंबई येथील रात्रशाळेत झाले. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांची रेल्वेत स्टेशनमास्तर म्हणून बदली झाली. सनातनी घरात वाढलेले केशवराव विचारे वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत कर्मकांड, पूजाअर्चा व धार्मिक जीवनात मग्न होते. परंतु भास्करराव जाधव यांच्या भाषणाने प्रभावित झालेल्या विचारे यांच्या जीवनाला विधायक वळण लागले. भास्करराव जाधव यांच्या सत्यशोधक विचारसरणीने प्रभावित झालेल्या विचारे यांनी वयाच्या 31 व्या वर्षी रेल्वेतली सरकारी अधिकाराची नोकरी सोडली व सहकाराच्या क्षेत्रात काम करण्याचा निश्चय केला. 1919 ते 1957 या 38 वर्षांमध्ये त्यांनी मूलभूत स्वरूपाचे काम केले. ब्राह्मणेतर पक्षाच्या माध्यमातून केशवराव विचारे यांनी शैक्षणिक चळवळ हाती घेतली. सामाजिक न्यायाचा लढा देताना त्यांनी सहकारच्या विधायक कार्याच्या उभारणीला महत्त्व दिले व असे काम केले तरच शेतकरी वर्ग स्वबळावर ठामपणे उभा राहू शकेल असे आपले मत प्रकट केले. त्यांनी सहकार चळवळीचा संपूर्ण अभ्यास केला. सहकारी कायदा आणि त्या कायद्याने शेतकर्‍यांना मिळालेल्या सवलती, तसेच सहकाराची मूलतत्त्वे, कार्यपद्धती यांचे प्रशिक्षण शेतकर्‍यांना देण्यासाठी त्यांनी सोपा सुटसुटीत व नेमका अभ्यासक्रम तयार केला. हे काम पहिल्यांदा केशवराव विचारे यांनीच केलेले आहे. ‘दि बॉम्बे को-ऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून त्यांनी सातारा जिल्ह्यातील इस्लामपूर शाखेतर्फे हा अभ्यासक्रम प्रकाशित केला व सदर शिक्षणाची मोहिम हाती घेतली.

‘सहकार म्हणजे मिळून काम करणे’ अशी सहकारची व्याख्या केशवराव विचारे यांनी केली. या कामामध्ये त्यांनी शेतकर्‍यांच्या कामातील अडचणी दूर करण्यावर भर दिला. तसेच ‘स्वावलंबन, समता, बंधुभाव, काटकसर, परस्पर सामंजस्य, लोकशाही, स्वातंत्र्य आणि बिन नफेखोरीचे अर्थशास्त्र यातून सहकार जन्मतो, असे विचारे यांनी म्हटले आहे.

सहकारची व्याख्या देणार्‍या, सहकारचे स्वरूप स्पष्ट करणार्‍या केशवराव विचारे यांनी सहकारचे तात्त्विक रूप प्रत्यक्षात आणण्यासाठी 23 जानेवारी 1934 रोजी जांभूळवाडी सहकारी औद्योगिक वसाहत (जांभूळवाडी को-ऑप. इंडस्ट्रिअल कॉलनी) हा प्रकल्प सुरू केला. स्वत:च्या मालकीच्या 47 एकरात सातारा रोड येथे उभारलेल्या या प्रकल्पात 12 सुशिक्षित शेतकरी कारागिरांना एकत्र आणले. या शेतकरी-कारागिरांच्या कार्य कौशल्यातून आधुनिक शेतीला पूरक असणारे सूतकताई, दोरखंड वळणे, दुग्ध व्यवसाय, शिलाईकाम, कातडे कमावणे व त्याची पादत्राणे बनविणे, ती विकणे, कुक्कुटपालन करणे असले सहकारी तत्त्वांवर चालणारे व्यवसाय प्रकल्पांतर्गत सुरू केले. या प्रकल्पातून त्यांनी एकत्रित श्रमशक्तीचे महत्त्व पटवून दिले. तसेच एकत्रित काम करण्याच्या संकल्पनेत कामाचा अभिप्रेत असलेला वेग लक्षात आणून दिला. तसेच, मानवामध्ये असणार्‍या आत्मकेंद्री व स्वार्थी वृत्तीवर मात करून समूहाच्या हिताचे महत्त्व अधोरेखित केले.

केशवराव विचारे यांनी जांभूळवाडीच्या पथदर्शक प्रकल्पाबरोबरीनेच भक्तवडी सामुदायिक शेती सहकारी सोसायटी मर्यादित, भक्तवडी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, वसना डेअरी सोसायटी मर्यादित असे महत्त्वपूर्ण प्रकल्प उभारले व यशस्वीपणे चालवले. सहकार क्षेत्रातील त्यांच्या मौलिक कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांची कोल्हापूरच्या डायरेक्टर ऑफ रूरल क्रेडिट व को-ऑपरेटिव्ह रजिस्ट्रार या पदांवर नेमणूक करण्यात आली. कोल्हापूर येथे शेतकी संघाची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. 1921 ते 1945 या कालखंडात केशवराव विचारे सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य होते. तेव्हा त्यांनी कोरेगाव तालुक्यात दहा माध्यमिक शाळा सुरू केल्या. तसेच प्रत्येक गावी प्राथमिक शाळा स्थापन करायला लावल्या. त्याच बरोबरीने कोरेगाव तालुका शेतकी सुधारणा संघ स्थापन करून शासनाच्या योजनांचा लाभ शेतकर्‍यांना घेता यावा यासाठी जनजागृती केली. मुंबई राज्याच्या सहकारी बँकेचे संचालकपद त्यांनी 1937 ते 1954 या काळात समर्थपणे सांभाळले.

केशवराव विचारे यांनी 14 जानेवारी 1937 रोजी सहकाराची मूलतत्त्वे, कार्यपद्धती, कायदे व सवलती यांची शास्त्रशुद्ध माहिती महाराष्ट्रातल्या सर्व सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘पोस्टल क्लास’ हा उपक्रम सुरू केला. 1942 साली त्यांनी 18 विषयांचा एक अभ्यासक्रम तयार केला आणि सत्यशोधक विद्यार्थी संघाची स्थापना केली. त्याद्वारे त्यांनी कायमस्वरूपी कार्यकर्ता प्रशिक्षणाची व्यवस्था केली. 1945 साली या अभ्यासक्रमाचे सत्यसंशोधन भाग-1 हे पुस्तक प्रकाशित झाले. त्या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या निघाल्या. 1940 साली ते अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष तर 1950 साली महाध्यक्ष झाले.

विचारे यांच्या निधनानंतर 43 वर्षांनी ‘सत्यशोधक केशवराव विचारे समग्र’ हा हरि नरके संपादित ग्रंथ पद्मगंधा प्रकाशनने 2000 साली प्रकाशित केला.

- संपादित

विचारे, केशव विश्राम