वीर, किसन महादेव
किसन महादेव वीर यांचा जन्म गोकुळाष्टमीच्या दिवशी पुणे-बंगळूर महामार्गावरील कवठे या गावी झाला. या दिवशी जन्म झाल्यामुळे त्यांचे नाव ‘किसन’ ठेवण्यात आले. त्यांच्या आईचे नाव हिराबाई होते. किसनबाळ वीर सहा महिन्यांचा असतानाच प्लेगच्या साथीत आईचे निधन झाले. त्यानंतर त्याचे पालनपोषण त्यांंचे थोेरले बंधू व त्यांच्या पत्नी भागिरथीबाईंनी केले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे प्राथमिक शिक्षणास कवठे गावातच सुरुवात झाली व तेथेच त्यांचे सहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यांचा वयाच्या 14 व्या वर्षी पाचगणीतील कापड व्यापारी हरिभाऊ गाडेकर यांची कन्या राधाबाई हिच्याशी विवाह झाला. किसन वीरांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांना तालीम व व्यायामाचीही आवड होती. त्यांचा 1926 मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी कवठ्याचे एकनाथ धोकटे यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी दुसरा विवाह झाला.
वीर यांनी 1927 ते 1930 या काळात जंगल सत्याग्रह केला. बेलमाची, लोहारे व महाबळेश्वर जवळील रांजणी येथे केलेल्या सत्याग्रहामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना 11 महिने सक्तमजुरी व 25 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या घटनेपासूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. वीर यांनी आपले गाव आदर्श होण्यासाठी खूप परिश्रम घेतले. त्यांची 1939 साली तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांना 1942 च्या चलेजाव आंदोलनात 18 सप्टेंबर रोजी अटक झाली. पण 31 ऑक्टोबर रोजी ते येरवड्याच्या तुरुंगातून निसटले. त्यांनी 1942-44 या काळात भूमिगत राहून काम केले. वीर यांची 1944 मध्ये अच्युतराव पटवर्धन यांनी जुन्या सातारा जिल्ह्यातील भूमिगतांच्या नेतेपदी निवड केली.
किसन वीर यांची 1948 मध्ये जिल्हा काँग्रेसच्या सचिवपदी निवड झाली. या जिल्ह्यातील लहान मोठ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सुमारे पावणे दोन लाख रुपयांच्या भांडवलावर उत्तर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोंदणी झाली. पुसेगाव येथे 29 डिसेंबर 1952 रोजी झालेल्या जिल्हा काँग्रेस सभेत किसन वीर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. किसन वीर यांना सातारा मतदारसंघातून लोकसभेवर पाठवायचे, असे 1962 च्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरात एकमताने ठरले आणि निवडणुकीत त्यांचा विजयही झाला.
किसन वीर यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व प्राज्ञ पाठशाळा मंडळामार्फत वाई येथे महाविद्यालय सुरू केले. त्यांनी सातारा सहकारी साखर कारखानाही स्थापन केला.
- दत्ता मर्ढेकर