Skip to main content
x

वैशंपायन, काशिनाथ रघुनाथ

     काशिनाथ रघुनाथ वैशंपायन यांचे प्राथमिक शिक्षण नाशिक नगरपालिकेच्या शाळेत झाले. नंतर काही वर्षे मुंबईत राहिल्याने दादरच्या किंग जॉर्ज विद्यालयामधून १९१८ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९२० मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवले गावातील राष्ट्रीय शाळेत त्यांच्या शैक्षणिक कार्याची सुरुवात झाली. ब्रिटिश राजवटीचा तो काळ होता. शाळेला सरकारची मान्यता नव्हती. वैशंपायन शाळेसाठी गावात रोज भिक्षा मागत. लोकांच्या मदतीवर शाळा चालत असे. शाळेत गणेशोत्सव साजरा होत असे. गणेशोत्सवात मेळे होत. या मेळ्यांसाठी ते स्वत: कवने रचीत, ती मुलांकडून गाऊन घेत, मुलांना क्रांतिकारकांच्या गोेष्टी सांगत. इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध ते सार्वजनिक सभांमधूनही व्याख्याने देत. त्यासाठी त्यांना दोन वर्षे कारावासही भोगावा लागला. १९३४ मध्ये ते जळगाव जिल्ह्यातील भालोद गावी गेले व तेथील शाळेत शिक्षक म्हणून काम करू लागले. ते मराठी व संस्कृत विषय शिकवीत. त्यांचा एक वेगळा उपक्रम म्हणजे ते संस्कृत भाषेत मुलांसाठी नाटुकली लिहीत व ती मुलांकडून बसवून घेत. त्या काळात एका खेडेगावात संस्कृत नाटके करणे ही कल्पनाच अभिनव होती.

       भालोदच्या शाळेत वैशंपायन यांनी एस.टी.सी. परीक्षा दिली. याच काळात त्यांनी ‘काव्यतीर्थ’ व ‘पुराणतीर्थ’ या पदव्या मिळविल्या. या शाळेत त्यांनी ‘गीताजयंती’ साजरी करण्यास सुरुवात केली. मुलांकडून गीतेचे अध्याय पाठ करून घेतले. ते ‘केसरी’ वर्तमानपत्राचे अधिकृत वार्ताहर म्हणूनही काम करीत होते. ‘फैजपूर’ काँग्रेसची वार्तापत्रे ते केसरीमध्ये देत होते.

      भालोदमध्ये काही वर्षे नोकरी केल्यानंतर एक वर्ष तळेगावच्या समर्थ विद्यालयात त्यांनी काम केले व ते पुन्हा येवल्यात आले व तेथील मॉडर्न इंग्लिश शाळेमध्ये दाखल झाले. तेथे असताना ते हिंदीचेही अध्यापन करू लागले. त्यांनी ‘राष्ट्रभाषारत्न’ ही पदवी मिळविली. राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा या संस्थेचे काम ते करू लागले.

      शिक्षक म्हणून काम करीत असतानाच ‘छन्द शास्त्र प्रवेश’, ‘मोहन मंत्र’, ‘टिळकसूत्रे’, ‘काव्यमय टिळक’ ही स्वतंत्र पुस्तके लिहिली. ‘महिम्न स्तोत्र’, ‘सूर्यस्तोत्र’ अशी समश्लोकी भाषांतरे केली. निवृत्तीच्या काळातही त्यांचे लेखन सुरू होते. डॉ. वि. म. भट यांच्या ‘योगविद्या व ईश्वरी साक्षात्कार’ या पुस्तकाचा हिंदी भाषेत अनुवाद केला. बॅ. न. वि. गाडगीळ यांच्या ‘काही मोहोरा आणि काही मोती’ ह्या पुस्तकाचा ‘कुछ अशरफिया कुछ गौहर’ हा हिंदी अनुवाद केला.

- प्रा. सुहासिनी पटेल

वैशंपायन, काशिनाथ रघुनाथ