Skip to main content
x

फाटक, दत्तात्रेय शंकर

     दत्तात्रेय शंकर फाटक यांचा जन्म अलिबाग तालुक्यातील धोकवडे या गावी झाला. दत्तात्रेय चार वर्षांचे होताच त्यांच्या आई सरस्वतीचे प्लेगने निधन झाले. त्यामुळे त्यांचे बालपण आजी व आजोबा यांच्या सहवासात गेले. धोकवडे येथे एक शिक्षकी शाळेत तिसरी इयत्तापर्यंत नंतर अलिबागच्या नगरपालिकेच्या शाळेत चौथी व पाचवी करून तिथल्या मिशन स्कूल मधून १९२७ मध्ये ते मॅट्रिक झाले. संपूर्ण विद्यापीठात ते सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्याकाळी मॅट्रिकची परीक्षा मुंबई विद्यापीठ घेत असे व त्या विद्यापीठाची हद्द कराचीपासून धारवाडपर्यंत होती. शिष्यवृत्ती मिळाल्याने फाटक मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात दाखल झाले. तेथे वसतिगृहात राहून त्यांनी चिकाटीने, मन लावून अभ्यास केला. इंटरला द्वितीय श्रेणी मिळाली.

     नंतर संस्कृत विषय घेेऊन १९३१ मध्ये बी.ए. झाले. त्या विषयांत संपूर्ण विद्यापीठात ते पहिले आले व त्यांनी ‘भाऊ दाजी पारितोषिक’ पटकाविले. त्याच महाविद्यायात ‘दक्षिणा फेलो’ म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९३३ मध्ये संस्कृत व मराठी विषय घेेऊन ते द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

     विल्सन महाविद्यालयात प्रा. हरिभाऊ वेलणकर हे संस्कृतचे व प्रा. आर. डी. चोकसी हे इंग्रजीचे अध्यापक होते. या दोघांच्या व्यक्तिमत्वाचा व अध्यापन कौशल्याचा अप्रत्यक्षरित्या फाटक यांच्यावर परिणाम झाला. महाविद्यालयाच्या शिक्षणात त्यांचे वडीलबंधू लक्ष्मण शंकर फाटक यांनी कळकळीने आर्थिक मदत केली. अध्यापनाची आवड असल्याने त्यांनी गिरगावात युनियन विद्यालयामध्ये दोन वर्षे शिकवण्याचे काम केले (१९३३-३५). त्याच काळात मुंबईत महिला महाविद्यालयात तृतीय वर्ष बी.ए. (पूर्वीचे ज्युनिअर बी.ए.) वर्ग सुरू झाले. तेथील प्राध्यापक विनायक हरी कामत यांनी फाटकांना या अभ्यासक्रमात तिसऱ्या वर्षाचे संस्कृत शिकवायला दिले; म्हणजे योगायोगाने फाटक प्राध्यापक झाले.

     अण्णासाहेब कर्वे यांनी आरंभिलेले स्त्रीशिक्षणाचे कार्य म्हणजे आपले जीवनव्रत आहे असे मानून प्रा. फाटक यांना सरुवातीला दहा वर्षे दादर भागात घरोघर हिंडून महिला महाविद्यायाचे महत्त्व पालकांना पटवून द्यावे लागले. महिलांसाठी उपयुक्त व महत्वाचे शिक्षण प्रादेशिक भाषेतून देण्याची सोय इत्यादी माहिती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी दरवर्षी पाच हजार पुस्तके छापून फाटकांनी स्वतः ती वितरित केली व दहा वर्षे विद्यापीठ प्रवेश वर्ग विनामूल्य चालविला. पण १९४९ पासून हा वर्ग बंद केला कारण मॅट्रिकऐवजी एस.एस.सी. या नावाने या परीक्षेचे सरकारीकरण झाले व या विद्यापीठाकडे ती परीक्षा घेण्याचा अधिकार राहिला नाही.

     जुलै १९३३ पासून ते १९७४ पर्यंत त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयाची अखंड सेवा केली. १९५६ पूर्वी काही काळ त्यांनी प्रभारी प्राचार्य म्हणून काम सांभाळले व १ मे १९५६ ते १९७४ या काळात फाटक प्राचार्यपदी राहिले. कामाची वाटणी आणि खर्चाचे अंदाजपत्रक चार पाच महिने आधीच ते तयार ठेवीत. विभागाचे कामकाज, महत्वाच्या घडामोडी, परिपत्रकांचे तपशील अशा अनेक गोष्टींची नोंद ते करून ठेवीत. त्यामुळे महिला विद्यापीठाचा चालताबोलता ज्ञानकोश असे स्थान त्यांना प्राप्त झाले.

     जवळजवळ ४० वर्षे फाटक यांनी बी.ए. व एम.ए. च्या वर्गांना संस्कृत शिकवले. मुंबई विद्यापीठाने १९३७ मध्ये आयोजित केलेल्या ‘हिस्टॉरिकल इंटरप्रिटेशन ऑफ विष्णुपुराण’ या विषयावरील निबंधस्पर्धेत फाटकांना ‘व्ही.एन. मंडलिक पारितोषिक’ मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. कमला अभ्यंकर यांनी ‘राजशेखराची काव्यमीमांसा’ आणि प्रा. सुमती फडके यांनी ‘क्षेमेंद्राची उपहासकाव्ये’ या विषयांवर पीएच.डी. मिळवली. मराठी व गुजराती अशी सत्र आणि सकाळचे व दुपारचे अशी दोन अधिवेशने असा व्याप असल्याने फाटक सकाळी सात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत महाविद्यायातच असत.

     १९७२ मध्ये ‘आदर्श शिक्षक’ म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला. १९६९-१९७२ या काळात ते विद्यापीठाच्या कलाशाखेचे अधिष्ठाता नेमले गेले.अविरत कार्यरत असणाऱ्या प्रा. फाटकांनी आरंभी आपल्या कला् महाविद्यालयामध्येच इतर ज्ञानशाखांचे विभाग सुरू केले. गृहविज्ञान, गृह परिचर्या, प्रशिक्षण, ग्रंथपालन इत्यादी विभागांची जोपासना केली. त्यासाठी जाणत्या आणि ध्येयवादी अध्यापिका मिळविल्या. त्यांना भरपूर मदत केली, मार्गदर्शन केले.

     त्या विभागांची योग्य वेळी स्वतंत्र महाविद्यालये थाटून दिली. त्यांचे अभ्यासक्रम, जमाखर्च, वेळापत्रक, परीक्षापद्धती या गोष्टींची नीट व्यवस्था लावून दिली. महिला विद्यापीठाच्या आजच्या विकासाचे श्रेय मुख्यतः प्राचार्य फाटकांच्या नियोजनाला आहे.

     श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला महाविद्यालयाच्या शिक्षक वर्गाने १२ मार्च १९७४ रोजी मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला.

      १९७६ पासून चार वर्षे ते एम.ए.ला संस्कृत परीक्षेकरता परीक्षक म्हणून नियुक्त झाले होते. आकाशवाणीवर संस्कृत वाङ्मयातील बालकल्याण विचार, विश्‍वगुणादर्श चंपूचा परिचय, कालिदासाची बालसृष्टी, लोकमान्यांचे वैदिक संशोधन, संस्कृत सुभाषितातील स्त्रीदर्शन, छांदोग्य, तौत्तरिय, ऐतरेय, कठ, ईश या उपनिषदांचा परिचय प्रा. फाटकांनी करून दिला. त्यांनी आपला व्यासंगही सतत जोपासला.

- वि. ग. जोशी

संदर्भ
१.      एक सत्वस्थ व्यक्तीचे यशस्वी जीवन ; केसरी ,९ फेब्रुवारी १९६९.
२.      चौघुले वि. शं. ; ‘प्राचार्य द.शं.फाटक, एक कृतार्थ जीवन; धर्मभास्कर’सप्टेंबर ;१९९१.
४.      श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसीमहिला महाविद्यालय, मुंबईने १२ मार्च १९७४ रोजी दिलेले मानपत्र.
फाटक, दत्तात्रेय शंकर