Skip to main content
x

नगरकर, चिदानंद दत्तात्रेय

चिदानंद दत्तात्रेय नगरकर यांचा जन्म बंगळूर येथे मल्लेश्वरम गावात, एका सुविद्य कुटुंबात झाला. चिदानंद यांना सहा भाऊ व तीन बहिणी होत्या.  बाल्यावस्थेतच चिदानंदांवर संगीताचे योग्य संस्कार होत गेले. वयाच्या सातव्या वर्षापासून चिदानंद उत्तम भजने गात असत. त्यांचे वडील कीर्तनाच्या वेळी भजन मंडळींबरोबर मृदंग, तबला वाजवीत असत.

त्यांनी १९३३ मध्ये शालेय शिक्षण अर्धवट सोडले आणि गांधर्व महाविद्यालयात गोविंद विठ्ठल भावे यांच्याकडे स्वरज्ञान व काही रागांचे प्राथमिक शिक्षण सुरू केले. चिदानंदांनी उच्चशिक्षण घ्यावे अशी त्यांच्या वडिलांची तीव्र इच्छा होती. म्हणून वडीलबंधू पांडुरंग यांच्या सल्ल्याने ते संगीत व शिक्षण, दोन्हींकडे लक्ष देऊ लागले.

त्यांच्या वडिलांचे १९३४ मध्ये निधन झाले. त्यानंतर चिदानंदांचे पालनपोषण त्यांच्या वडीलबंधूंनी केले. त्यांनी चिदानंद यांना संगीताचे नियमित शिक्षण घेण्यासाठी १९३५ मध्ये लखनौ येथे पं. विष्णू नारायण भातखंडे यांनी स्थापन केलेल्या ‘मॉरिस कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्युझिक’चे प्राचार्य पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्या स्वाधीन केले आणि गुरु-शिष्य परंपरेला अनुसरून चिदानंद नगरकरांचे संगीताचे नियमित शिक्षण सुरू झाले. पुढे चिदानंदांनी प्रसिद्ध नृत्यकार पं. शंभू महाराज यांच्याकडे कथक नृत्याची तालीम घेतली. त्यांची नृत्यातील प्रगती पाहून शंभू महाराजांनी त्यांना गंडाबंध शिष्य करून घेतले. ‘संगीत विशारद’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर संगीतात संशोधन करण्याचा चिदानंदांचा विचार होता; परंतु घरची आर्थिक परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे त्यांना तो विचार सोडावा लागला.

त्यानंतर जवळजवळ एक वर्ष त्यांनी आपल्या गावी जाऊन संगीत शिक्षक म्हणून काम केले आणि पुन्हा लखनौ येथे जाऊन अण्णासाहेब रातंजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नित्य, नियमित साधना सुरू केली.  त्यांनी वेदान्ताचाही व्यासंग केला होता.

चिदानंदांचा १२ मार्च १९४२ रोजी माविन्कुर्वे या सारस्वत कुटुंबातील दुर्गाबाईंशी राणेबेन्नर (तत्कालीन म्हैसूर राज्यात) येथे विवाह झाला. त्यांनी आपल्या चिरस्मरणीय मैफलींनी १९४२ ते १९४५ या कालावधीत देशातील विविध संगीत समारंभांत रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ते तबला व हार्मोनियअम उत्तम वाजवीत असत. 

पं. रातंजनकर यांच्या सल्ल्यानुसार कन्हैयालाल मुन्शी यांनी १९४६ मध्ये भारतीय विद्या भवनच्या अंतर्गत भारतीय संगीत व नर्तन शिक्षापीठाची स्थापना केली. चिदानंद नगरकर यांची वयाच्या सव्विसाव्या वर्षी प्राचार्य म्हणून तेथे नेमणूक झाली. या पदावर असताना  त्यांनी भातखंडे संगीत शिक्षण पद्धतीनुसार विद्यालयाचा पाठ्यक्रम निश्चित केला.

‘चित्-आनंद’ या टोपणनावाने त्यांनी विविध रागांमध्ये पन्नासपेक्षा अधिक बंदिशी केल्या आहेत. पं. एस.सी.आर. भट, पं. के.जी. गिंडे, पं. सी.आर. व्यास, पं. दिनकर कायकिणी, श्रीमती मालिनी राजूरकर अशा अनेक प्रसिद्ध गायकांनी त्यांच्या बंदिशी मैफलीत गाऊन त्यांचा खूप प्रचार केला. त्याचबरोबर चिदानंद यांनी ‘कौशिक  रंजनी’,  ‘जनरंजनी’, ‘अंबिका सारंग’, ‘सुजन सारंग’, ‘योगेश्री’ या नवीन रागांची रचनाही केली. 

त्यांच्या शिष्यपरिवारात शशिकला कायकिणी, सुशीला नाडकर्णी, दुर्गेश चंदावरकर, सुमन सवूर, वसंत पणशीकर, रामदास भटकळ व गुरुदत्त हेबळेकर यांचा समावेश आहे. नगरकरांनी सत्यसाईबाबांच्या चरित्राचा हिंदी अनुवाद करून नोव्हेंबर १९६६ मध्ये प्रकाशित केला होता.

त्यांना भातखंडे विद्यापीठाचे सुवर्णपदक (१९०४),  म्हैसूर महाराजाद्वारे सिल्व्हर प्लेट (१९५१), महाराष्ट्र शासनाचा गौरव पुरस्कार (१९५६) आणि भारतीय विद्या भवनचा गौरव पुरस्कार (१९६०) असे पुरस्कार लाभले.

प्रा. यशवंत महाले

नगरकर, चिदानंद दत्तात्रेय