कोल्हापूरकर, लक्ष्मीबाई
महाराष्ट्रातील लावणी या पारंपरिक नृत्यशैलीस कथक या नृत्यशैलीतील अभिजाततेची, त्यातील तत्कार-तोडे-तुकडे यांची जोड देऊन अभिजाततेच्या पातळीवर नेणाऱ्या कुशल कलाकार म्हणून लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांचे योगदान मोठे आहे. लक्ष्मीबाईंचा जन्म कोल्हापूर येथे झाला. आई मंजुळाबाई व वडील सीताराम जावळकर हे दोघेही तमाशा कलावंत होते. त्यांना शंकर, हौसा, लक्ष्मी, सुशीला, हिराबाई अथवा बेबी व पांडुरंग ही सहा अपत्ये होती. लक्ष्मीबाईंच्या जन्मानंतर काही वर्षांनी ही मुलगी काळी, कुरूप आणि हडकुळी असल्याने बापाने एका ख्रिस्ती कुटुंबास तीनशे रुपयांसाठी तिला विकण्याचा घाट घातला. आईने त्याला विरोध केला व तरीही बाप जुमानत नाही हे लक्षात येताच आईने एका रात्री सर्व मुलांना घेऊन कोल्हापूर सोडले.
आईच्या गाण्याला लहानगी लक्ष्मी तुणतुण्यावर साथ देऊ लागली. पुढे चरितार्थासाठी यवतच्या बसस्थानकावर आईला गाणी गात भीक मागण्याचीही वेळ आली, तेव्हाही लक्ष्मी तिच्याबरोबर गाणी गात असे. एकदा यवतला लावणीच्या फडात मंजुळाबाई गात असताना त्यांचा आवाज बसल्याने प्रेक्षक हुल्लडबाजी करू लागले, तेव्हा मंजुळाबाईंनी आपल्या लेकीला झोपेतून उठवून गायला लावले व त्याबरहुकूम मंजुळाबाईंनी ओठ हलवत अदा सादर केली. बालवयीन लक्ष्मीबाईंनी आईवर आलेला हा प्रसंग निभावून नेला. चार्ली चॅप्लिनच्या जीवनातील घटनेशी साधर्म्य असणारा प्रसंग पुढे ‘एक होता विदूषक’ या चित्रपटात वापरला गेली.
नगरला ठुमरी, गझल गाणारी प्रेमाबाई नावाची पंजाबी नायकीण होती, तिच्याकडे लक्ष्मीबाई महिना आठ आणे पगारावर घरकाम, झाडलोट करत. संध्याकाळी नायकिणीकडे लोक गाणे ऐकण्यासाठी येत तेव्हा त्यांचे जोडे पुसणे, ते पायात चढवणे असेही काम त्या करत व त्यात थोडे वरकड पैसे मिळत. मात्र हे करतानाही लक्ष्मीबाईंचा कान सतत प्रेमाबाईच्या गाण्याकडेच असे. इथे त्यांच्यावर ठुमरी, गझलचे श्रवण-संस्कार झाले.
विसाव्या वर्षी लक्ष्मीबाईंनी १९५० च्या सुमारास यवत येथेच स्वत:चा लावणीचा फड सुरू केला. त्यात या चारही बहिणी गात-नाचत, शंकरराव पेटी वाजवे आणि पांडूभाऊ तबल्याची साथ देई. हळूहळू गावोगावी कार्यक्रम करत, थोडेफार नाव व पैसे कमवत त्यांनी मुंबई गाठली. मुंबईतील थिएटरमध्ये प्रथम त्यांचा कार्यक्रम ठेवण्यास नकार दिला गेला. मोठ्या मिनतवारीने त्यांनी एक खेळ केला व त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि इथून पुढे लक्ष्मीबाईंनी मुंबईतील पिला हाउस येथे अनेक वर्षे सातत्याने लावणी सादर करून लोकप्रियता मिळवली.
मुंबईच्या वास्तव्यात फकीर अहमद कुरेशी, गुलाम हुसेन खाँ, बिन्नी भय्या व गोविंदराव निकम यांच्याकडे लक्ष्मीबाईंनी लावणी व कथक नृत्याचे शिक्षण घेतले. पूर्वी बैठकीच्या लावणीत बसून अदा केली जायची व नृत्यप्रधान लावणी ही अधिकतर अभिनयाच्या अंगानेच पेश केली जायची. परंतु लक्ष्मीबाईंनी कथकमधील ‘नृत्त’ हा भाग, म्हणजे तत्कार, तोडे-तुकडे, तिहाया इ.चा लावणीच्या नृत्यात अधिक समावेश केला आणि या नृत्यात नवा बाज आणला, त्यास नवे रूप दिले. पंचबाई मुसाफिर, घोड्यावरची लावणी या त्यांच्या काही खास लावण्या होत्या, ज्यांत त्यांचे नृत्यकौशल्य विशेष रूपाने पुढे येई.
लक्ष्मीबाई लावणी गात, मात्र त्यांचा आवाज फारसा गायनानुकूल नव्हता. त्यामुळे लावणीतील स्वरांगापेक्षा भावांगाकडे त्यांनी जास्त लक्ष दिले, त्यामुळे लावणीतील काव्यात कोणत्या भावच्छटा आहेत, त्या कशा व्यक्त करायच्या, नृत्य करताना संचारीभाव दाखवण्यासाठी आवश्यक असणारा अवकाश गाताना कसा निर्माण करायचा, याचा फार चांगला व सखोल विचार त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांची प्रस्तुती म्हणजे अभिनयाचा गायनासहित नृत्यात्मक असा आविष्कार असायचा.
विविध आशय-विषय असणाऱ्या जुन्या-नव्या लावण्यांसह त्या तराणाही उत्तम सादर करीत. लक्ष्मीबाई चणीने लहानखुऱ्या, सावळ्याशा; मात्र अत्यंत चपळ, लवचीक असल्याने पूर्ण रंगमंचावर त्यांचा अत्यंत सहज व गतिमान वावर असे. रंगमंचीय अवकाश त्या सहजपणे व्यापून टाकत.
बतावणीच्या प्रवेशात त्या गवळण बनून येत. मग सोंगाड्या व त्यांच्यात चटकदार संवादांची चकमक उडे. ती फार बहारदार असे. ढोलकीवादक पांडुरंग घोटकर यांच्यासह लक्ष्मीबाई बतावणीचा भाग फार रंगवत. त्यांचे अभिनयकौशल्यही वाखाणण्याजोगे होते. विनोदी, चुरचुरीत बोलून लोकांना गुंगवून ठेवण्याचे कसब त्यांच्यात होते. एकदा फडातील सोंगाड्याने आयत्या वेळी पळ काढल्याने लक्ष्मीबाईंनी पुरुषवेषात सोंगाड्या बनून प्रेक्षकांना पाच तास खिळवून ठेवले होते. ‘चांदगडचा किल्ला’, ‘येड्या बाळ्याचा फार्स’, ‘चिंचणीचा देशमुख’ अशी वगनाट्येही त्यांच्या फडाने सादर करून लोकप्रियता मिळवली होती.
संगीतबारीपासून तंबूचा धंदा आणि मग फड अथवा पार्टी असा प्रवास करत लक्ष्मीबाईंनी बरेच नाव कमवले व पुढे उतरत्या वयात १९८४ च्या सुमारास त्यांनी फड बंद केला. महाराष्ट्र शासनाच्या अनेक महोत्सवांत, तसेच देशभरातील अनेक ठिकाणी सरकारी व अन्य संस्थांसाठी त्यांनी लावण्या सादर केल्या. दिल्लीत १९६६ साली त्यांचा खास कार्यक्रम झाला व दूरदर्शननेही त्याचे चित्रीकरण केले. तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींनीही त्यांचा तमाशा वाखाणला व त्यांच्या फडाला प्रवासासाठी एक बस दिली. त्यांना १९८४ साली संगीत नाटक अकादमी व कथक केंद्र या दिल्लीतील संस्थांनी लावणी नृत्याच्या पेशकशीसाठी निमंत्रित केले होते. बिहारमधील रांची, पटना, दरभंगा, बिलासपूर इ. ठिकाणी त्यांचे कार्यक्रम व आकाशवाणीसाठी ध्वनिमुद्रण झाले. जम्मू येथे सैन्यदलासाठी त्यांनी लोककला सादरीकरण केले.
‘सुधारलेल्या बायका’ (१९६५), ‘ही नार रूपसुंदरी’ (१९६६), ‘मानाचा मुजरा’ (१९६९) या चित्रपटांत लक्ष्मीबाईंनी लहानशा नृत्यप्रधान भूमिका व नृत्यदिग्दर्शन केले होते, मात्र ‘एक होता विदूषक’ (१९९२) या जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटाच्या वेळी त्यांच्या नृत्यकौशल्याचा खरा उपयोग केला गेला. या चित्रपटातील लावण्यांचे त्यांनी नृत्यदिग्दर्शन केले. या कामगिरीसाठी चाळिसाव्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते लक्ष्मीबाईंना १९९३ सालचा ‘सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शना’चा पुरस्कार मिळाला व या कामाचे चीज झाले ! त्यानंतर ‘सुगंध आला मातीला’, ‘रावसाहेब’, ‘बेलभंडार’ इ. चित्रपटांसाठीही त्यांनी नृत्यदिग्दर्शन केले.
मधू कांबीकर यांना लक्ष्मीबाईंचे मार्गदर्शन मिळाले व मधूबाईंच्या अदाकारीतून लक्ष्मीबाईंच्या नृत्यकौशल्याचा पुन:प्रत्यय येतो. ‘सखी माझी लावणी’ (१९९९), तसेच ‘बेलभंडार’, ‘काटा रुते कुणाला’ या रंगमंचीय कार्यक्रमांसाठी मधूबाईंकडून लक्ष्मीबाईंनी अनेक पारंपरिक व काही नव्याही लावण्या बसवून घेतल्या. कथकशी संयोग करून बनवलेला लावणी नृत्याचा वेगळा बाज रुजवण्यासाठी लक्ष्मीबाईंनी महाराष्ट्र शासनाच्या तमाशा शिबिरांमध्ये अनेकांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाचा पुरस्कार (१९९४), अखिल भारतीय नाट्य परिषदेचा सत्कार (१९९५), ‘शंकरराव मोहिते पाटील’ पुरस्कार (अकलूज, १९९८), पुणे महानगरपालिकेचा ‘पठ्ठे बापूराव’ पुरस्कार (२०००), अमरावती येथे पंजाबराव देशमुख यांच्या हस्ते सन्मानपत्र इ. पुरस्कार लक्ष्मीबाईंना लाभले. अत्यंत बोलक्या, विनोदी, दिलखुलास, मनमिळाऊ तरीही शिस्तप्रिय असणार्या लक्ष्मीबाईंचा विवाह बाबूराव यांच्याशी झाला होता, मात्र मूलबाळ नसल्याने त्यांनी मधूबाईंनाच मुलगी मानले होते.
या कलावतीचे श्रीरामपूर येथे हृदयविकारामुळे निधन झाले. लक्ष्मीबाईंच्या स्मृतीनिमित्त मधू कांबीकर यांनी ‘लावणीसम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर कला प्रतिष्ठान’ ही संस्था सुरू केली असून त्याद्वारे दरवर्षी लोककलाकारांना पुरस्कार दिला जातो.