Skip to main content
x

जगदाळे, निवृत्ती गोविंद

जगदाळे मामासाहेब

          निवृत्ती गोविंदराव जगदाळे यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी नजीकच्या भिकार सारोळे या गावी झाला. बार्शी तालुक्यातील चारे हे त्यांचे मूळ गाव. कर्मवीर मामासाहेबांच्या घरी विठ्ठलभक्तीची पंरपरा होती. पंढरीच्या वारीची परंपरा भक्तिभावाने आणि निष्ठेने त्यांच्या घरी जपली जात होती. गोविंदराव व मुक्ताबाई या विठ्ठलभक्त दांपत्याच्या पोटी मामासाहेबांचा जन्म झाला.

कर्मवीर मामासाहेबांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. त्यांचे तिसरीपर्यंतचे शिक्षण बार्शी नगरपालिकेच्या मराठी मुलांची शाळा क्र. १ मध्ये झाले तर १९२२-२३ मध्ये सातवीची व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा ते नगरपालिका इंग्लिश शाळा (सध्याचे सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल) बार्शी येथून उत्तीर्ण झाले. बार्शी येथे शिकत असताना त्यांच्यावर सामाजिक जाणिवेचे व शिक्षणाच्या महनीयतेचे संस्कार झाले. सोलापुरातील नॉर्थकोट हायस्कूलमध्ये त्यांचे इंग्रजी सातवी म्हणजे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण (१९३०) पूर्ण झाले. मानेगावच्या देशमुखांच्या पार्वती (लक्ष्मी) या मुलीशी त्यांचा विवाह झाला. बार्शी नगरपालिकेत कारकून म्हणून त्यांनी नोकरी केली. समायोजन निरीक्षक (कलेक्शन इन्स्पेक्टर)पदावरही काम केले.

राजर्षी शाहू महाराजांनी वसतिगृहे सुरू करून शैक्षणिक कार्याला जो वेग मिळवून दिला होता तो आदर्श मामासाहेबांसमोर होता. नगरपालिकेच्या मदतीने बहुजन समाजाच्या शिक्षणाचे कार्य करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. कर्मवीर मामासाहेबांनी मराठा समाजातील एकवीस मान्यवरांना बरोबर घेऊन श्री शिवाजी मराठा वसतिगृहाची स्थापना केली. वसतिगृहामधील मुलांना स्वतःची मुले मानून त्यांनी त्यांच्या योगक्षेमाची आणि शिक्षणाची चिंता वाहिली. वसतिगृहाच्या व्यवस्थापनाबरोबरच छोटी-मोठी कामे मामासाहेब स्वतः करीत. या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना जे जेवण मिळत असे तेच जेवण ते स्वतःही घेत. स्वावलंबन व नीतिमान जीवनाच्या संस्काराचे धडे त्यांच्या बोर्डिंगमधील मुलांना मिळत असत. छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम हे जगदाळेमामांचे आदर्श होते. त्यांनी बार्शी शहरात शिवजयंती उत्सव सुरू केला. ज्ञान, रंजन आणि प्रबोधन ही त्रिसूत्री त्यांनी समाजापुढे आणली. देवालयांची त्यांनी ज्ञानालये बनविली. १९४० मध्ये स्थापन झालेल्या साक्षरता प्रसारक मंडळया संस्थेच्या स्थापनेत जगदाळे यांचा सिंहाचा वाटा होता. सुरुवातीच्या अवघ्या पंधरा वर्षात बार्शी तालुक्यातील लहानमोठ्या ५५ खेड्यांमधून प्राथमिक शाळा सुरू करून त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे महान कार्य केले. शिक्षण प्रसाराच्या ध्येयाने भारलेल्या जगदाळे यांनी प्रत्यक्ष स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही. परंतु वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देऊन स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरित केले.

शिवाजी मराठा वसतिगृहाचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळअसे नामकरण करून या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अविरत शिक्षण प्रसाराचे कार्य केले. ग्रामीण आणि दुष्काळी भागातील त्यांच्या या कार्याचे महत्त्व असाधारण असे आहे.

शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मामांनी तरुण शेतकरी संघाची स्थापना केली. अशा सामाजिक जाणिवेच्या विविध पैलूंनी त्यांचे जीवन उजळून निघाले होते. हरिजन सेवक संघया संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले.

मुलींची वसतिगृहामध्ये राहण्याची व मोफत शिक्षणाची सोय त्यांनी केली. लग्ने साधेपणाने केली जावीत, असे लोकशिक्षण देणारे विचार ते समाजासमोर ठेवीत.

येडशी, श्रीपत पिंपरी, काटेगाव, उपळे (दुमाला), बार्शी, उस्मानाबाद, वाशी (ता. भूम), आगळगाव (ता. बार्शी), ठोंग्याची उपळाई (ता. बार्शी), तेर (ता. उस्मानाबाद), भातंबरे (ता. बार्शी), पानगाव (ता. बार्शी) चारे (ता. बार्शी) इ. ठिकाणी त्यांनी वसतिगृहे व शाळा सुरू केल्या व बार्शी येथे शिवाजी महाविद्यालयाची पायाभरणी करून त्यांनी ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली. बी. पी. सुलाखे वाणिज्य महाविद्यालय त्यांनी सुरू केले व वाणिज्य विद्येच्या शिक्षणाची सोय केली. दुष्काळाच्या भीषण पार्श्‍वभूमीवर १९७२ मध्ये राजर्षी शाहू सायम् विधी महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. अशा विविध विद्याशाखांच्या शिक्षणाची सोय केली आणि समाजाला पुढे घेऊन धेनू संवर्धन केंद्र, सहकार क्षेत्रास उत्तेजन अशा विविध मार्गाने स्वावलंबी व विकासोन्मुख जीवनाचे दर्शन त्यांनी आपल्या प्रदेशातील लोकांना घडवले. आदर्श शिक्षकांचे, मजुरांचे व वीरपत्नींचे सत्कार करून त्यांनी समाजासमोर नवे आदर्श उभे केले. त्यांनी बार्शी येथे शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा  उभारला. ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा पुरवण्याकरिता त्यांनी १९७५ मध्ये आरोग्य मंदिराची उभारणी केली. पुढे हे आरोग्य मंदिर जगदाळेमामांचे रूग्णालय म्हणून ओळखले जाऊ लागले. अत्याधुनिक आरोग्य सुविधांनी युक्त असे हे रूग्णालय सर्वसामान्य जनतेसाठी दिलासा देणारे ठरले.

बार्शी येथे १९८० मध्ये झालेल्या अ. भा. म. साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळाचे जगदाळे हे अध्यक्ष होते. शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात त्यांनी केलेल्या असाधारण कार्याची नोंद घेत मराठवाडा विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही सन्माननीय पदवी प्रदान केली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानेही त्यांना डॉक्टर ऑफ सायन्सया पदवीने सन्मानित केले.

- प्रा. डॉ. सुहास गोविंदराव पुजारी

जगदाळे, निवृत्ती गोविंद