Skip to main content
x

कर्वे, चिंतामण गणेश

चिंतोपंत कर्वे यांचा जन्म बडोद्यास झाला. तथापि त्यांचे शिक्षण पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल व फर्गसन महाविद्यालयात झाले. १९१७ मध्ये ते गणित विषय घेऊन पदवीधर झाले. कर्वे यांच्या आप्तांची एक शाखा बेंगळुरू येथे होती व तिच्या संपर्कामुळे चिंतोपंतांना कानडी भाषा अवगत होती.

डॉ.श्री.व्यं.केतकर यांनी मराठी ज्ञानकोशाची योजना सिद्ध करण्यासाठी उभारलेल्या कंपनीत कर्वे दाखल झाले, तसेच य.रा.दाते हेही सहभागी झाले. केतकरांच्या हाताखाली कर्वे यांना ज्ञानाचे संकलन करण्याची कला अवगत झाली, भरपूर वाचन झाले व अभ्यास घडला. कोशविद्येचे मर्म हाती आले. नियमितपणे परिश्रम करण्याची सवय लागली. या जोडीने केतकरी खाक्यात काम करण्यास लागणारे धैर्य व चिकाटी दाखवली म्हणूनच नेटाने काम करून ते ‘कोशकार’ झाले. कर्वे यांचा प्रपंच कसाबसा चालला, परंतु त्यांनी कधी तोंड वेंगाडले नाही किंवा आपल्या कामात उणेपणा येऊ दिला नाही.

केतकरांच्या ज्ञानकोशात काम करून, अनुभवाची शिदोरी घेऊन कर्वे-दाते यांनी आणखी दोन सहकार्‍यांना घेऊन ‘महाराष्ट्र शब्दकोशा’ची एक योजना तयार केली व ‘महाराष्ट्र कोश मंडळ लि.’ नावाची कंपनी काढली. महाराष्ट्र शब्दकोश सिद्ध केल्यानंतर कर्वे-दाते जोडीने ‘मराठी वाक्संप्रदाय कोश’ हाती घेऊन पुरा केला. या तीन कोशांच्या कामात त्यांची २५ वर्षे खर्ची पडली. त्यानंतर ही जोडी वेगळी झाली. य. गो. जोशी यांनाही अशा प्रकारच्या कामाचा हव्यास व त्यासाठी लागणारी धडाडी होती. कर्वे यांच्या सहकार्याने त्यांनी ‘महाराष्ट्र परिचय’ या ग्रंथाची योजना केली. महाराष्ट्र संस्कृती संदर्भातील हा एक उत्कृष्ट व उपयुक्त ग्रंथ आहे. कोशकार्याखेरीज कर्वे यांनी ‘मानवी संस्कृतीचा इतिहास’ (१९३१), ‘प्राच्य आणि पाश्चात्त्य नीतिध्येये’ (१९३७), ‘आनंदीबाई पेशवे’ (१९४०), ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’ (१९५७), ‘कोशकार केतकर’ (य.रा.दाते ह्यांच्या सहकार्याने, १९५९) यांसारखी पुस्तके लिहिली. शिवाय निरनिराळ्या नियतकालिकांतून भाषा, वाङ्मय, इतिहास, संस्कृती आदी विषयांवर चारशेहून अधिक लेख लिहिले. कर्वे यांच्या लेखनात माहितीचा अचूकपणा, मांडणीचा नेटकेपणा जाणवतो. दुर्मिळ परंतु अभ्यासकांना उपयुक्त वाटणारा वा.शि.आपटे यांचा संस्कृत-इंग्रजी कोश पुनर्मुद्रित करण्याच्या कामी कर्वे-दाते यांनी डॉ. परशुरामपंत गोडे या संस्कृत पंडिताचे साहाय्य मिळविले. नवीन भर घालून हा कोश त्यांनी प्रकाशित केला. त्याप्रमाणे आपटे यांचाच इंग्रजी-संस्कृत कोश पुनर्मुद्रित करण्याचा कर्वे यांचा हेतू होता परंतु कर्वे यांच्या निधनामुळे तो संकल्प यशस्वी होऊ शकला नाही. ‘कोशकार्य सर्वसमावेशक दृष्टी ठेवून अनाग्रही बुद्धीने करावे लागते’ ही डॉ. केतकरांची भूमिका कर्वे यांच्या कार्यातून प्रत्ययास येते.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन उंचावणार्‍या अनेक कार्यांत कर्वे आपुलकीने लक्ष घालीत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची धुरा त्यांनी अनेक वर्षे संभाळली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिटणीस पदावरही ते होते. भारत इतिहास संशोधक मंडळाचे कर्वे हे दहा वर्षे चिटणीस होते. पुणे विद्यापीठाच्या सदस्य मंडळावर ते होते. ग्रंथ प्रकाशन आणि प्रकाशन अनुदान समितीत ते कार्यरत होते. सरकारच्या पेशवे दप्तर समितीचे सदस्यही ते होते. काम पत्करले की त्या-त्या संस्थांच्या सभांना नियमितपणे हजर राहून ते त्यात आपला वाटा उचलत. कर्वे यांनी अनेक लेखकांना मार्गदर्शन करून त्यांना उत्तेजन दिले. कित्येक ग्रंथांना त्यांनी प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. कर्वे यांच्यावर लिहिलेल्या ‘ओळख’वजा मृत्युलेखात म. म. दत्तो वामन पोतदार म्हणतात, ‘ते (कर्वे) सहसा आजारी पडत नसत आणि त्यांचे वय जरी ६५ च्या पलीकडे होते, तरी वृद्धत्वाची छाया त्यांच्यावर पडलेली दिसत नव्हती.... कर्वे फारसे बोलत नसत; पण बोलत, तेव्हा थोडेच परंतु मुद्द्याचे बोलत. त्यांना कामाचा उरक मोठा होता. स्वभावाने शांत, मनमिळाऊ आणि निगर्वी होते... आपल्या कोशांच्या रूपाने कर्वे महाराष्ट्रात सर्वत्र दिसत राहतील.’

- वि. ग. जोशी

 

कर्वे, चिंतामण गणेश