Skip to main content
x

चित्रे, दिलीप पुरुषोत्तम

     दिलीप चित्रे यांचा जन्म बडोदा येथे अभिरुची नियतकालिक चालविणार्‍या  पुरुषोत्तम चित्र्यांच्या घराण्यात झाला.  प्राथमिक शिक्षण बडोदा येथे झाले. १९५१ पासून चित्र्यांचे वास्तव्य मुंबईत होते. पुढे रुईया महाविद्यालयामधून १९५८ मध्ये कला शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण केले. १९६० ते १९६३ ह्या काळात इथियोपियात नोकरी केली. १९६४ मध्ये मुंबईला परतल्यावर जाहिरात क्षेत्रात नोकरी आणि पत्रकारिता करीत, माध्यमांच्या विश्वात वावरले. ‘अ‍ॅन अ‍ॅन्थॉलॉजी ऑफ मराठी पोएट्री’ (१९६७), ‘आर्फियस’ (१९६८) हा कथा संग्रह; ‘शिबा राणीच्या शोधात’ (१९७१) आत्मचरित्रात्मक प्रवासवर्णन लिहिले. ‘आधुनिक कवितेला सात छेद’ या नावाने रॅम्बो, हॉपकिन्स, रिल्के, एझरा पाउंड, हार्ट क्रेन आदी कवींच्या काव्यविश्वाचा मराठी वाचकांना परिचय करून देणारी त्यांची लेखमाला सत्यकथेतून प्रसिद्ध झाली. क्वेस्ट, न्यू क्वेस्ट, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, थॉट, सेमिनार, इलस्ट्रेटेड वीकली अशा नियतकालिकांतून त्यांनी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर इंग्रजीत भरपूर स्फुट लेखन केले. ‘चाव्या’ (१९८२), ‘तिरकस आणि चौकस’ (१९९०), ‘शतकाचा संधिकाल’ ही चित्र्यांची सामाजिक आणि राजकीय स्थिती-गतीवरील भाष्ये आहेत. ‘मिठू मिठू पोपट’ (१९८९), ‘सुतक’ (१९८९) ही त्यांची नाटके आहे. ‘चतुरंग’ (१९९५) हे चार लघुकादंबर्‍यांचे संकलन आहे. चित्रकलेविषयी भरपूर लेखन आणि ‘गोदाम’ (१९७८) या चित्रपटाचे कथालेखन-दिग्दर्शन व संगीत दिग्दर्शनही त्यांनी केलेले आहे. चित्र्यांनी पुढील काळात ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाचा अनुवाद केला आणि ‘पुन्हा तुकाराम’ (१९९०) तसेच ‘सेज तुका’ असे मराठी-इंग्रजी भाषांतून त्यांनी तुकारामांच्या कवितेचे मर्म उलगडून दाखविले.

      घराण्यात वाङ्मयाचा वारसा असल्याने, बालवयातच काव्यलेखनाला प्रारंभ झाला. पहिली कविता ‘सत्यकथे’च्या १९५४ च्या दिवाळी अंकातून प्रकाशित झाली. सत्यकथा - मौजेचे कवी म्हणून लौकिक. १९५४ मध्येच त्यांनी ‘शब्द’ हे लघुनियतकालिक काढून लघुपत्रिका चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. नेमाडे-अशोक शहाणे आदी कवी-लेखकांसोबत लघुपत्रिका चळवळीला वाङ्मयीन निर्मितीचा सकस पाया देण्यात चित्र्यांचे मोठे योगदान राहिले. दिलीप चित्रे यांना बा.सी.मर्ढेकरांच्या नवकवितेचे पुढल्या काळातील वारसदार मानले जाते. मर्ढेकरांच्या आणि युरोपिअन कवींच्या प्रभावात त्यांचे काव्यलेखन झालेले असले, तरी पुढे मात्र संत तुकारामांच्या कवितेचा त्यांच्या काव्यलेखनावर प्रभाव जाणवतो. ह्या प्रभावाखाली त्यांनी संतपरंपरेशी नाळ जोडून काव्यनिर्मितीला देशीय काव्यपरंपरेचे भान दिले. ‘कविता’ (१९६१), ‘कवितेनंतरच्या कविता’ ( १९७८), ‘ट्रॅवलिंग इन अ क्रेज’ (१९८०), ‘दहा बाय दहा’ (१९८३), ‘एकूण कविता-१’ (१९९२), ‘एकूण कविता-२’ (१९९६) असे प्रचंड काव्यलेखन केलेले आहे.

     चित्रे हे लघुपत्रिका चळवळीतले सक्रिय कार्यकर्ता आणि सिद्धहस्त कवी होत. कविता, कथा, समीक्षा आणि इंग्रजी स्फुट तसेच अनुवाद असे लेखन त्यांनी केले. प्रचंड प्रतिभा-सामर्थ्य आणि लघुपत्रिकावाल्या कवींमध्ये वावरत, सर्वाधिक काव्यलेखन करणारा हा संवेदनशील आणि देशीय संस्कृतीचा सूक्ष्म विचार करणारा लेखक-कवी होय. जुन्या मराठी देशीय कवितेपासून तर आधुनिक युरोपिअन कवितेपर्यंतच्या विस्तृत काव्यविश्वाला गवसणी घालून सर्जनशील काव्यनिर्मिती करणारा हा संवेदनशील कवी आहे. खास शब्दकळा वापरून इंद्रियगम्य अनुभवांच्या आधारे संभोग-जन्ममृत्यू-काळ आणि जगणे- माणसाचे अस्तित्वभान-एकाकीपण-परात्मता- संस्कृतीचा शोध अशा अंगानी चित्र्यांच्या काव्यलेखनाचा आणि अनुवादाचाही प्रवास राहिलेला आहे.

     परखड आणि तिरकस अशी चिकित्सक दृष्टी लाभलेल्या ह्या लेखक-कवीने जगाकडे, जीवनाकडे सकारात्मक पाहत विविध प्रवाहांशी आपले नाते तपासत शेवटी संत तुकारामांच्या आणि संत ज्ञानेश्वरांच्या अस्सल देशीय काव्यपरंपरेशी आपल्याला जोडून घेतले. संत तुकारामांच्या काव्याभ्यासातून काव्यलेखनातील मुक्तीचा आनंद अनुभवत त्यांनी संत तुकारामांच्या कवितेचा इंग्रजी अनुवाद करून, तुकोबांच्या काव्याचा परिचय जगाला करून दिला.

     पुन्हा तुकाराम ही मराठी साहित्य व्यवहारात कोपर्निकन क्रांती करणारी कृती आहे. मराठी काव्यविश्वाच्या केंद्रस्थानी तुकाराम आणि इतर कवी परिघावर अशी एक प्रकारची उत्पाती उलटापालट दिलिप चित्रे यांनी घडवून आणली. ‘पुन्हा तुकाराम’मध्ये  चित्र्यांनी  तुकाराम हे मराठी वाङ्मयाच्या केंद्रस्थानी, असा सिद्धान्त मानून त्यानुसार आता मराठीचे स्वतंत्र पण वैश्विक संदर्भात मांडण्याजोगे काव्यशास्त्र दृग्गोचर करण्याचा प्रयत्न केला आहे, हे डॉ. सदानंद मोरे यांचे आकलन चित्र्यांच्या उत्तरार्धातील काव्याभ्यासाचे आणि काव्यलेखनाचे गमक मानता येईल.

     उत्तरार्धात जेव्हा त्यांनी संतकाव्य परंपरेचा शोध घेतला, तेव्हाच त्यांना विठ्ठलशरणता व्यक्त करीत, तुकारामांच्या भक्ति-परंपरेचा वारसा स्वीकारत ‘पुन्हा तुकाराम’ मांडून, आपल्या काव्य जाणिवांना संतकाव्याच्या देशीय मुळांशी जुळवून घेतल्यावरच मुक्ती आणि शक्तीचा अनुभव घेता-देता आला.

     साहित्य क्षेत्राच्या जोडीनेच चित्र यांनी चित्रकला या क्षेत्रातही विशेष कार्य केले आहे. त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भारतात तसेच भारताबाहेरही संपन्न झाली आहेत. 

         आपल्या कार्यासाठी मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कारही त्यांना लाभला आहे. 

    - डॉ. किशोर सानप

चित्रे, दिलीप पुरुषोत्तम