Skip to main content
x

देशपांडे, सत्यशील वामन

हिंदुस्थानी संगीत परंपरेचे गाढे अभ्यासक, सर्जनशील गायक, रचनाकार व लेखक अशा अनेक भूमिका समर्थपणे राबवणारे सत्यशील वामनराव देशपांडे एक बहुआयामी, बहुपेडी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. प्रसिद्ध संगीतज्ञ वामनराव देशपांडे यांचे ते सुपुत्र होत. त्यांच्या आईचे नाव वसुंधरा होते. सत्यशील यांचे शिक्षण मुंबई येथे, बी.कॉम.पर्यंत झाले. वडिलांचा ‘घरंदाज गायकी’ हा विविध घराण्यांच्या सौंदर्यशास्त्रीय मूल्यांचा शोध घेणारा ग्रंथ सिद्ध होत असताना, त्यात मांडलेल्या सिद्धान्तांचे व त्यावर वेगवेगळ्या घराण्यांच्या गायकांच्या गाऊन व्यक्त झालेल्या क्रिया-प्रतिक्रियांचे संस्कार लहानपणीच सत्यशीलना मिळत गेले व खोलवर रुजले.

पुढे १९७२ साली पं. कुमार गंधर्व यांच्या घरी, देवास येथे राहून सत्यशील यांनी सलग तीन वर्षे सर्वंकष तालीम घेतली. लहानपणी मिळालेला ‘घरंदाज गायकी’चा संस्कार आणखी दृढमूल करणारी, परंपरेच्या आधारावर स्वतःचे असे सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोन घडवण्यास उत्तेजित करणारी अशी ही तालीम होती.

‘कलेचे गूढरम्य प्रदेश हे शास्त्र-व्याकरणाच्या सीमेला चिकटून तिथेच असतात व या सीमेवर एकामागून एक येणार्‍या आवर्तनांची शृंखला गायक आपले संस्कार, आपली तत्काळ-स्फूर्तता व आपली कलाकारी वापरून आंदोलित करत राहतो’, हा गुरुमंत्र घेऊन सत्यशील देशपांडे मुंबईला परतले.

याच संगीतकलेच्या व्याकरणाच्या प्रदेशात मुशाफिरी करण्यासाठी, शास्त्रीय संगीताच्या अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध गायकांचे व अभ्यासकांचे गाणे त्यांच्या सांगीतिक विचारांसह ध्वनिमुद्रित करून जतन करण्याचा उपक्रम फोर्ड फाउण्डेेशनच्या साहाय्याने सत्यशील यांनी सुरू केला. त्यांनी मुंबई येथे १९८३ साली स्थापन केलेल्या ‘संवाद फाउण्डेेशन’ या संस्थेत आजतागायत हे त्यांचे कार्य अविरत चालू आहे.

आजमितीला सुमारे पाच हजार तासांच्यापेक्षा जास्त संकलित ध्वनिमुद्रण व अनेक बुजुर्ग गायकांकडून गोळा केलेल्या बंदिशींच्या अप्रकाशित अशा स्वरलेखनांचा मोठा संग्रह, असे या आर्काइव्ह्जचे स्वरूप आहे. अनेक तरुण गायक-अभ्यासकांना आज संवाद फाउण्डेशनमुळे आपली परंपरा पडताळून पाहण्याची संधी मिळत आहेच; पण या व्यासंगामुळे सत्यशील देशपांडे यांचे स्वतःचे बहुआयामी सांगीतिक व्यक्तिमत्त्वही घडत गेले आहे. एकाच रागाच्या अनेक छटा, वेगवेगळ्या बंदिशींच्या माध्यमांतून ते स्वतःही अनेक मैफलींतून, तसेच कार्यशाळांतून गाऊन श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असतात.

परंपरेत दडलेली व स्वतःच्या प्रतिभेतून निघणारी सौंदर्याची विविध रूपे दाखवणारी प्रगल्भ गायकी ते स्वतः उत्तम गातातच; परंतु स्वर-राग-लय-ताल-काल-भाव आणि साहित्याच्या माध्यमातून काहीतरी सांगायचे जे उरते, त्यासाठी उत्तम स्वररचनेबरोबरच बंंदिशीला पोषक अशी काव्यरचनाही ते उत्तमरीत्या करतात. कुठलाही सांगीतिक विषय असो अथवा एखादी नवीन बंदिश असो, त्यांचे हिंदी, उर्दू व मराठी या भाषांवरील प्रभुत्व जाणवल्याशिवाय राहत नाही. संगीतावर वेळोवेेळी मार्मिक लेखन व सप्रात्यक्षिक भाष्य करणारे संगीतज्ञ म्हणूनही ते ओळखले जातात.

एक चिंतनशील गायक ते चिंतनशील नायक असा गूढरम्य प्रवास म्हणजे पं. सत्यशील देशपांडे. देश-विदेशांत अनेक मैफली गाजवणारे पं.सत्यशील देशपांडे यांची आणखी एक ओळख म्हणजे ‘लेकिन’ या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्याबरोबर त्यांनी गायलेले युगलगीत, ज्यासाठी त्यांना ‘सर्वोत्तम पार्श्वगायका’चा पुरस्कार (१९९२) प्राप्त झाला. तसेच ‘कहन’ हा पारंपरिक, तसेच स्वरचित बंदिशींचा त्यांचा ध्वनिमुद्रित संग्रह भारतरत्न लतादीदींच्या हस्ते लोकार्पण झाला व त्यात मांडलेल्या विविधांगी सौंदर्यमूल्यांसाठी तो अतिशय लोकप्रिय ठरला.

पं.सत्यशील देशपांडे हे १९९६ साली ‘होमी भाभा’ फेलोशिप, १९९९ साली ‘कुमार गंधर्व’ फेलोशिप, ‘सूरसिंगार संसद-तानसेन पुरस्कार’ आणि ‘विमला देवी’ पुरस्कार जो संवाद फाउण्डेशनला सांगीतिक समाजसेवेसाठी दिला गेला आहे,  तसेच २००७मध्ये रझा पुरस्कार आणि २०१८ साली गोदावरी गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.

         — भूपाल पणशीकर, सृजन देशपांडे

देशपांडे, सत्यशील वामन