Skip to main content
x

हळबे, वसंत बळवंत

            वसंत बळवंत हळबे यांचा जन्म धुळे येथे झाला. आपली आई मनोरमा हिच्या हातातून साकारणारे विणकाम, भरतकाम यांची नजाकत आणि रंगसंगती, त्याचप्रमाणे वडिलांच्या तरल विनोद-बुद्धीचा त्यांच्या जडणघडणीवर प्रभाव पडला, असे ते म्हणत.

           दैनिकांसाठी पॉकेट कार्टून्स, साप्ताहिकांसाठी आणि दिवाळी अंकांसाठी सामाजिक, राजकीय टीकाचित्रे व चित्रमाला यांपासून ते फीचर सिंडिकेटसाठी सचित्र कथामाला, व्यवस्थापनशास्त्रावरील पुस्तकासाठी बोधचित्रे, अशा व्यापक क्षेत्रांसाठीच्या चित्रांतील आपल्या सुबक रेखाटन व नर्मविनोद शैलीमुळे वसंत हळबे यांचे काम लक्षवेधी झाले आहे.

           पुण्याच्या भावे स्कूलमधील चित्रकला शिक्षक      ज.पां. आपटे यांनी त्यांना चित्रकलेची गोडी लावली व त्यांच्या सहकार्यानेच ते अकरावीनंतर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकावयास गेले.

           जे.जे.मधून पदविका घेतल्यावर हळबे चेन्नई येथे जे. वॉल्टर थॉम्प्सन कंपनीत रुजू झाले. तेथे परिचय झालेल्या बापू या इलस्ट्रेटर व व्यंगचित्रकारामुळे ते व्यंगचित्रकलेकडे वळले.

           कालांतराने मुंबईला आल्यावर प्रेस सिंडिकेट या कंपनीत व्यंगचित्रांचे काम केल्यावर त्यांनी पूर्ण वेळ व्यंगचित्रकार म्हणून काम करण्याचे ठरवले. त्यानुसार ‘लोकसत्ता’च्या रविवारच्या अंकात त्यांची ‘इकडेतिकडे चोहीकडे’ ही साप्ताहिक व्यंगचित्रमालिका सुरू झाली व चित्रांतील बारीक तपशील, पात्रांच्या चेहर्‍यांवरचे हावभाव, चित्रांची रचना व चित्रांमधली टिप्पणी या वैशिष्ट्यांमुळे हे सदर लोकप्रिय झाले.

           त्यानंतर पुण्याच्या ‘तरुण भारत’मध्ये वसंत हळबे यांनी काढलेली राजकीय व सामाजिक घडामोडींवरील दैनंदिन पॉकेट कार्टून्स व अर्कचित्रांतील हातोटी व राजकीय समज यांमुळे मोठी राजकीय चित्रेही रसिकांची दाद मिळवून जात असत.

           याशिवाय त्यांनी ‘आवाज’सारख्या अनेक दिवाळी अंकांतूनही व्यंगचित्रमालिका रेखाटल्या. मीनू रुस्तमजी यांच्या व्यवस्थापन विषयांवरील पुस्तकांसाठी, अनेक नामवंत बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तयार केलेल्या, त्यांच्या मशिनरीच्या वापराबद्दल सूचना असलेल्या पुस्तिका यांसाठीची व्यंगचित्रात्मक रेखाटने; इंडिया बुक हाउसच्या ‘अमर चित्रकथा’ या सचित्र कथामालांकरिता तानाजी मालुसरे, पहिले बाजीराव वगैरेंच्या जीवनावर आधारित कथामालांसाठी वास्तववादी शैलीतील कथाचित्रे; अनेक सिंडिकेट्ससाठी विविध प्रकारच्या, तर ‘दामुअण्णा’, ‘शिकारी शंभू’ यांसारख्या व्यक्तिरेखा असलेल्या मालिका, असा हळबे यांच्या व्यंगचित्र रेखाटनाचा विस्तृत पट आहे.

           दर रविवारी मित्रांसमवेत मुंबईच्या परिसरातील समुद्र किनार्‍यावर जाऊन तेथे जलरंगात निसर्गचित्र रंगवणे हा  त्यांचा एक छंदच होता. मुंबईत त्यांच्या अशाच निवडक चित्रांचे प्रदर्शनही भरले होते. हळब्यांच्या निवडक व्यंगचित्रांचा संग्रह ‘चहा प्रकाशना’ने जयवंत दळवी यांच्या प्रस्तावनेसह ‘ब्रशच्या गुदगुल्या’ या नावाने प्रकाशित केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या संग्रहाचे प्रकाशन झाले.

           - प्रशांत कुळकर्णी

हळबे, वसंत बळवंत