Skip to main content
x

हळदणकर, सावळाराम लक्ष्मण

         लरंग व तैलरंग या दोन्ही माध्यमांवर अलौकिक प्रभुत्व असणारे सव्यसाची चित्रकार, उत्तम कलाशिक्षक व संगीताचे दर्दी म्हणून सा.ल. हळदणकर प्रसिद्ध होते. जलरंग व तैलरंग या दोन्ही माध्यमांची बलस्थाने व मर्यादा लक्षात घेऊन त्यांत ते तरलतेने काम करीत. त्यांच्या चित्रांतील साध्या विषयांतून व्यक्त होणारा व्यापक दृश्यानुभव व कल्पक कारागिरी या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे उच्च दर्जाच्या कलानिर्मितीचा प्रत्यय येतो.

         सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म सावंतवाडी येथे दैवज्ञ ब्राह्मण कुटुंबात झाला. हळदणकर घराण्याचे मूळ गावही सावंतवाडी. हे पूर्वी संस्थान होते. दैवज्ञ ब्राह्मण म्हणजे सोनार. सोन्याचांदीचे सौंदर्यपूर्ण दागिने व अन्य कारागिरीच्या वस्तू कल्पकतेने बनविणारी ज्ञाती. सा.ल. हळदणकरांमधील कल्पक कारागिरी, सौंदर्याची जाण हे कलागुण आनुवंशिक असावेत. दैववशात आलेली गरिबी व ते तीन वर्षांचे असताना वडिलांचे झालेले निधन यांमुळे त्यांचे लहानपण हलाखीचे व कष्टप्रद होते.

         त्यांचे शालान्त परीक्षेपर्यंतचे शिक्षण सावंतवाडीत झाले. त्यांचे चित्रकला शिक्षक एन.एस. मालणकर यांनी त्यांना ग्रेडच्या परीक्षेस बसण्यास प्रोत्साहन देऊन मार्गदर्शनही केले. ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या प्रत्येक विषयात ते पहिले आले. याच मालणकर शिक्षकांच्या कन्येबरोबर पुढे १९०२ मध्ये त्यांचा विवाह झाला. १९०३ मध्ये  सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यासाठी ते मुंबईत आले. प्रवेश परीक्षेच्या वेळी त्यांना उंदराचे चित्र काढण्यास सांगण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी उंदरांची सभाच चितारली. ते पाहून संबंधित शिक्षक चकित झाले.

         येथील शैक्षणिक काळात त्यांना गणपतराव केदारी, सेसील बर्न्स, आगासकर, त्रिंदाद, वॉल्टर रोबोथॅम आदी मातब्बर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. असे असले तरी, त्या सुमारास पाच-सात वर्षे जे.जे. स्कूलमधील कलाशिक्षणाच्या धोरणात गोंधळाचे वातावरण होते. भारतीय कलेचे पुनरुज्जीवन करावे असा विचार ब्रिटिश राज्यकर्त्यांकडून पुढे आला असला तरी ते नेमके कशा प्रकारे करायचे, याबाबत संभ्रमावस्था होती. तरीही त्या अवधीत सावळाराम हळदणकर, चुडेकर, परांडेकर इत्यादी विद्यार्थी स्व—गुणांच्या जोरावर व परिश्रमाने पुढे आले.

         विद्यार्थिदशेपासूनच हळदणकर विविध पारितोषिकांचे मानकरी ठरले. त्यांच्या नावाचा १९०७ पासून बोलबाला होऊ लागला. मुंबई, मद्रास, कलकत्ता, सिमला, अमृतसर, म्हैसूर येथील दसरा प्रदर्शने, दिल्ली येथील ऑल इंडिया फाइन आटर्स अ‍ॅण्ड क्राफ्ट सोसायटीच्या प्रदर्शनांत त्यांची चित्रे झळकू लागली व अशा चित्रांना पारितोषिकेही मिळाली. त्यांनी १९०६ पासून १९५८ पर्यंत मुंबईतील बॉम्बे आर्ट सोसायटी व आर्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या प्रदर्शनांत सातत्याने चित्रे पाठविली. त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदकही १९२५ मध्ये मिळाले होते.

         मुंबईच्या प्रदर्शनातील त्यांच्या चित्रांभोवती सर्वांची, विशेषत: चित्रकारांची गर्दी होत असे आणि ते सा.ल. हळदणकरांनी अमुकअमुक ‘इफेक्ट’ कसा आणला असेल, याची चर्चा करीत. त्यांच्या कीर्तीमुळे अनेक नामवंत व्यक्तींची चित्रे काढण्याची कामे त्यांच्याकडे येऊ लागली. राजे-राजवाड्यांच्या कलासंग्रहांसाठी त्यांची चित्रे मागविली जात.

         मुख्यत्वे त्यांच्या निर्मितीत व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे व पौराणिक प्रसंगचित्रे यांचा समावेश होता. त्यांनी १९०३ ते १९०६ या काळात विद्यार्थी असताना काढलेले एक स्थिरचित्र अद्भुत आहे. त्यात एक पितळेची समई, एक लामणदिवा, तांब्याचा लोटा व मागे इरकल साडीचे वस्त्र आहे. हे चित्र जलरंगात रंगविले आहे. धातूच्या हुबेहूब आभासाबरोबरच तांब्याच्या लोट्यावरचा हिरवट पॅटिना आत्यंतिक कौशल्याने व बहारीने रंगविला आहे. त्यांचे सूक्ष्म अवलोकन व माध्यमावरचा ताबा यांचे उत्तम प्रत्यंतर या चित्रातून येते.

         त्यांच्या ‘ग्लो ऑफ होप’, ‘निरांजनी’, ‘अमिरी इन फकिरी’ यांसारख्या चित्रांत साध्या विषयांतून व्यापक दृश्यानुभव व्यक्त झाला आहे. ‘ग्लो ऑफ होप’ हे चित्र म्हैसूरच्या जयचामराजेंद्र आर्ट गॅलरीत आहे. त्यातील प्रकाशयोजना तत्कालीन  पद्धतीप्रमाणे प्रकाश एका बाजूने न घेता तो तेवणार्‍या समईद्वारे खालून स्त्रीच्या चेहर्‍यावर व शरीरावर पसरलेला दाखविला आहे. ज्योतीसमोर धरलेल्या हातांच्या बोटांतून उत्सर्जित होणार्‍या प्रकाशाचे चित्रण हा त्यांच्या प्रभुत्वाचा आगळावेगळा पैलू आहे.

         ‘अमिरी इन फकिरी’ हे आशयपूर्ण शीर्षक लाभलेले जलरंगातील दर्जेदार चित्र आहे. हुक्काओढणार्‍या इसमाचे व्यक्तिमत्त्व, मूड, शरीराकृतीतील अनेक तपशील, त्यातील सतरंजीच्या सुरकुत्या बारीक तपशिलांसह सहजतेने व्यक्त होतात. जलरंगातील पराकोटीचे कसब त्यातून व्यक्त होतेच; पण मानवी जीवन — व्यवहारातील एका वास्तव कोपर्‍याला त्यांचा अलगद स्पर्श होतो. अशी चित्रे केवळ त्या व्यक्तीशी व तंत्राशी न थांबता त्यातून अधिक व्यापक असा आशय संवेदनशीलतेने व्यक्त होतो.

         जे.जे.मध्ये व्यक्तिचित्रण एका विशिष्ट पद्धतीने शिकवले जात असे. त्यानुसार निरीक्षण करून रेखाटन करणे, रंगविताना एकावर एक थर देत हळूहळू छाया प्रकाशाचे परिणाम व्यक्त करणे तसेच त्वचा, केस, दागिने, कपडे इत्यादींचे पोत दर्शविणे अशी पाश्‍चात्त्य निओक्लासिझिम शैलीनुसार ही पद्धत होती. यात काळाच्या ओघात रोमँटिसिझम व इम्प्रेशनिझम या रंगलेपनपद्धतींची भर पडली. निओक्लासिझिम शैलीमधील चित्रांचे चित्रप्रतल हे सपाट व गुळगुळीत असत; पण रोमँटिसिझमच्या पद्धतीमुळे, विशेषत: प्रकाशाच्या भागात रंगांच्या विविध जाडीचे थर येऊ लागले. त्यामुळे चित्रांच्या प्रकाशाच्या भागात व छायेच्या भागात रंगलेपनाच्या फरकामुळे व ब्रश स्ट्रोक्समुळे रंगांची कमी — अधिक तयार झालेली जाडी यांमुळे फरक दिसू लागला. त्यात अनेक वेळा एकसंधपणा येत नसे. तसेच रविवर्मांच्या काळापासून रेम्ब्राँच्या व्यक्तिचित्रणाप्रमाणे अत्यंत गडद पार्श्‍वभूमीवर हळूहळू प्रकाशात येणारा चेहरा व शरीराच्या चित्रणाची पद्धतही हळूहळू दृढ होत गेली. या सर्व वैशिष्ट्यांचा त्यांच्या चित्रांत अत्यंत मर्यादित वापर दिसून येतो.

         चित्र जलरंगातील असो वा तैलरंगातील, त्यातील छाया-प्रकाशाचे परिणाम, त्यांच्या चित्रणासाठी वापरलेल्या कमी — अधिक जाडीच्या रंगछटा, रंगलेपन हे अगदी सहजपणे सामावलेले असते. कुठेही रंगलेपनातील जाडी नजरेला खटकत नाही. बघणार्‍यास  अत्यंत संयतपणे केलेले रंगकाम दिसते. ही संयतता दिएगो वेलास्क्वेझ या सतराव्या शतकातील स्पॅनिश चित्रकारासारखी आहे व तरीही भारतीयांच्या त्वचेचा विशिष्ट रंग, कपडे, त्यांचा पोत, व्यक्तींच्या चेहर्‍यावरील भाव व अत्यंत सूक्ष्म असा छाया-प्रकाशाचा परिणाम हळदणकर सहजतेने निर्माण करतात.

         त्यांची व्यावसायिक व्यक्तिचित्रणेही नावाजली गेली. नाना शंकर शेठ, मफतलाल गगलभाई, शिक्षणमहर्षी धोंडो केशव कर्वे इत्यादी प्रतिष्ठितांना समक्ष बसवून केलेली व्यक्तिचित्रे उत्तम दर्जाची आहेत. भारत सरकारसाठी केलेल्या पं. मदन मोहन मालवीयांच्या व्यक्तिचित्रणासाठी त्यांचा राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडून १९६४ मध्ये गौरव झाला होता. दिल्लीच्या ललित कला अकादमीने १९६२ मध्ये त्यांना ‘फेलोशिप’ देऊन सन्मानित केले होते. नव्या पिढीला चित्रकलेचे शिक्षण देण्यासाठी १९०८  मध्ये त्यांनी दादर येथेे एक वर्ग सुरू केला होता. दोन-तीन जागा बदलून अखेरीस १९४० मध्ये तो गिरगाव येथील फ्रेंच ब्रिज जवळील एका दुमजली घरात ‘हळदणकर फाइन आर्ट इन्स्टिट्यूट या नावाने स्थिरावला.

         नवोदितांच्या कलेला उत्तेजन देण्यासाठी व चित्रकला उपक्रमांसाठी त्यांनी १९१८ मध्ये त्यांचे स्नेही फर्नांडीस, परांडेकर, मिरगे इत्यादींच्या सहकार्याने ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना केली. आजही ही संस्था उत्तम प्रकारे कार्यरत आहे.

         सा.ल. हळदणकरांकडे नामवंत लेखक, कवी, गायक यांची उठबस असे. ते शास्त्रीय संगीताचे उत्तम जाणकार होते, तसेच उस्ताद विलायत हुसेन खाँ, अब्दुल करीम खाँ, मोगूबाई कुर्डीकर यांच्यासारख्या दिग्गज गायकांच्या मैफलींना ते आवर्जून जात.

         आपल्या चित्रकारितेचा त्यांना जाज्वल्य अभिमान होता. कोणी चित्रकार म्हणून कमी लेखले तर हजरजबाबीपणे व निर्भीडपणे ते समोरच्याला सुनावत. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कलेच्या दृष्टीने वातावरण खूप बदलले होते. कलेच्या क्षेत्रात नवे विचार, नवी कलामूल्ये प्रस्थापित होत होती. संस्थानिकांकडून कलावंतांची होणारी कदर व आश्रय संपुष्टात आला होता. ती जागा दुसर्‍या कोणी घेतली नव्हती. त्याचे पडसाद त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धावर साहजिकच उमटले. त्यातच त्यांची दृष्टी अधू होऊन स्वत:ची चित्रे दिसणेही दुरापास्त होत गेले.

         नागपूर येथे १९६१ मध्ये भरलेल्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या नागपूर येथील उद्घाटनप्रसंगीच्या आपल्या भाषणात ते म्हणाले, ‘‘... माझी दृष्टी परमेश्‍वर आता परत घेत आहे... कागदावर लावलेले रंग मला दिसत नाहीत... दृष्टीशिवाय जगणे ही केवढी शिक्षा...!’’ वयाच्या शाऐंशीव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. स्वगुणांवर पुढे येऊन चमकलेल्या सा.ल. हळदणकरांनी कलेच्या क्षेत्रात शिखरे ठरावीत अशा कलाकृती निर्माण केल्या. त्यांच्या कलाकृतींनी भारतीय कलैतिहासातील एका महत्त्वाच्या टप्प्याचे प्रतिनिधित्व केले.

- महेंद्र दामले

हळदणकर, सावळाराम लक्ष्मण