जोशी रघुनाथ कृष्ण
एक महान दूरदर्शी, बहुआयामी, संवेदनशील अक्षरयोगी रघुनाथ कृष्ण जोशी ऊर्फ र.कृ. यांचा जन्म सांगली येथे झाला. र.कृ. जोशींचे शालेय शिक्षण सांगली येथे झाले. सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबई येथून त्यांनी जी.डी. आर्ट (अप्लाइड) १९५६ साली पूर्ण केले. टपाल खात्याच्या निवड (सॉर्टिंग) खात्यात कायम रात्रपाळी करून त्यांनी दुपारी जे.जे.मध्ये शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयाच्या अंतिम वर्षात ‘नो दाय कॅरेक्टर’ नावाचे मुद्राक्षरकलेवर आधारित एका प्रदर्शनाचे आयोजन करून र.कृं.नी त्यांच्या संवेदनशील मनाच्या अभिव्यक्तीचे बीज त्या विषयाच्या मातीत रुजविले. त्याचा पुढे मोठा वृक्ष झाला. या अतिशय दुर्लक्षित विषयाकडे त्यांनी विद्यार्थिदशेपासूनच जाणीवपूर्वक लक्ष दिले होते.
प्रत्येक अक्षराला त्याचे स्वत:चे असे व्यक्तिमत्त्व असते, भावना असतात, त्या अक्षरातून प्रकट होतात. अक्षरांना त्यांचे स्वत:चे ध्वनी असतात, त्यांना कंपने असतात, या सार्यांची एकात्मिक अनुभूती व दृष्टी मन:पटलावर उत्सर्जित होत असते. या ऊर्जेलाच जनमानसात जागृत करण्याचे कार्य र.कृं.च्या निरनिराळ्या कामांतून निदर्शनास येते.
मुंबईतील एशियाटिक सोसायटीमधील अनेकविध हस्तलिखित पोथ्या अभ्यासून स्वयंशिस्तीने व स्वयंस्फूर्तीने भारतीय सुलेखनाचा (कॅलिग्रफी), तसेच विविध सुलेखन शैलींचा अभ्यास र.कृं.नी १९६०च्या दशकात सुरू केला. भारतातील सर्व भाषांच्या लिप्यांचा सखोल अभ्यास तर त्यांनी केलाच; पण त्याचे उपयोजनही त्यांनी त्यांच्या विविध कामांतून केले हे विशेष. भारतात, भारतीय सुलेखन व अक्षररचनेसंदर्भात त्यांनी एक उच्च दर्जाचा आदर्श उभा केला.
र.कृं.नी ‘बोमास लिमिटेड’ या जाहिरात संस्थेत सुरुवातीस उमेदवारी केली व १९५६ साली ते ‘डी.जे. केमर’ (आताची ओ अँड एम) या जाहिरात संस्थेत रुजू झाले. बाळ मुंडकुर, नौशेर चापगर यांच्यासमवेत ‘उल्का अॅडव्हर्टायझिंग’ या संस्थेची त्यांनी १९६१ साली मुहूर्तमेढ रोवली आणि ती नावारूपास आणली.
चिमणलाल पेपर्स, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, एशियन पेंट्स, नेरोलॅक पेंट्स इत्यादी कंपन्यांच्या जाहिरातींबरोबरच दृक्माध्यमांच्या विविध विभागांत, भारतीय जाहिरातींचा स्तर सर्जनशील, कलात्मक व अभिरुचिसंपन्न करण्यात र.कृं.चा सिंहाचा वाटा होता. जाहिरातींचे संकल्पन आणि उपयोजन हे भारतीय भाषांमधूनच करण्याचे श्रेय र.कृं.कडे जाते. कॉर्पोरेट आयडेंटिटी या प्रकारात पंजाब नॅशनल बँक, वेलकम ग्रूप ऑफ हॉटेल्स, भारतीय डाक सेवा यांसारख्या बोधचिन्हांमधून र.कृं.नी भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली.
भारतीयत्व त्यांच्या नसानसांत भिनलेले होते. त्याचे प्रत्यंतर र.कृं.च्या अनेक कलाकृतींमधून प्रकट होताना दिसते. ‘कॅग’ (कमर्शिअल आर्टिस्ट्स गिल्ड) तर्फे दरवर्षी भरणार्या प्रदर्शनात र.कृं.च्या अनेक कलाकृतींना ‘कॅग अवॉडर्स’ मिळाली आहेत. ‘हॉल ऑफ फेम’ या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या सर्वोच्च पुरस्काराने र.कृं.ना सन्मानित केले गेले आहे.
जे.जे.मध्ये १९६९ साली एक ‘हॅपनिंग’ घडले. एका प्रचंड अशा तयार केलेल्या कागदावर विविध भारतीय भाषांच्या लिप्यांतील अक्षरे अध्यापक व विद्यार्थी यांनी काढली. त्यानंतर ‘हॅपनिंग’ असे मोठ्याने ओरडून तो कागद सर्वांनी फाडला व परत त्याचे तुकडे गोळा करून ते जोडण्याचा प्रयोग केला. विविध भाषांनी, संस्कृतीने नटलेल्या या देशाचे अखंडत्व भंग होऊ नये यासाठी केलेला तो जाणीवपूर्वक प्रयत्न होता.
भारतीय एकात्मतेचे दर्शन घडविण्यासाठी व संवेदना जागृतीसाठी ‘हॅपनिंग’ ही संकल्पना त्यांनी लोकाभिमुख केली. प्रांतीयवाद, फुटीरतावादाने देश दुभंग पावू नये, सार्या विविधतेतले एकात्मरूप म्हणजे ‘भारत’, तीच एकसंघ देशाची ताकद असे यातून त्यांना दाखवायचे होते. नंतर अशी अनेक ‘हॅपनिंग्ज’ झाली. अगदी नाटकांमध्येही त्याचा वापर झाला.
र.कृं.नी १९७०च्या दशकात ‘मूर्त कविता’, ‘अक्षर कविता’, ‘दृक् कविता’ ही चळवळ सुरू केली. र.कृं.च्या कवितेची वैशिष्ट्ये म्हणजे, ‘रचनात्मक बांधा’. शब्द-अक्षर-चिन्हांच्या सूचक दृश्य मांडणीवर अथवा रचनेवर ती भर देेते. मुद्राक्षरातील व हस्ताक्षरांची विविध सौंदर्यपूर्ण अर्थगर्भित वळणे, संगीतातील ध्वनिरूपकत्व यांवर ती भर देते. तिला विविधांगी रूप मिळते, ते अक्षरांचे लहान-मोठे आकार व त्यांच्या अर्थपूर्ण वापराने. त्यामुळे र.कृं.ची कविता शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध-अवकाश-अनुभूती-जाणीव-नेणीव, अशा विविध उन्मेषांच्या ताण्या-बाण्याने बहरलेली आपल्याला दिसते. त्यांच्यातील चित्रकार ही जाण वाचकांच्या मनात रुजवतो, काव्यप्रदेशात नव्या दिशांची-क्षितिजांची ओळख करून देतो.
‘मौज’, ‘सत्यकथा’ या चोखंदळ नियतकालिकांतून त्यांनी केलेले अक्षरमांडणीचे प्रयोग पथदर्शी ठरले. ‘कविता दशकाची’मध्ये र.कृं.च्या कविता आपल्याला बघावयास मिळतात. शासकीय मुद्रणालयाचे उपसंचालक बापूराव नाईक, लिपिकार लक्ष्मण श्रीधर वाकणकर, आर. सुब्बू (टाटा प्रेसचे महाव्यवस्थापक), र.कृ. जोशी यांचे ‘अक्षर संशोधन मंडळ’ १९६० च्या दशकात कार्यरत होते. भारतीय भाषांच्या लिप्यांचे यंत्रारोहण, यांत्रिक व संगणकीय दृष्टीने कसे करता येईल, त्यासाठी हे सर्व जण प्रयोगशील होते.
लिप्यांचा तुलनात्मक अभ्यास, विचारमंथन येथे चालत असे. लिपिकार वाकणकरांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील, ‘नॅशनल सेंटर फॉर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी’ (एन.सी.एस.टी.) येथे डॉ. सुधीर मुदुर व डॉ. पीयूष घोष यांच्या मदतीने प्रयोग करून ध्वन्यात्मक पद्धतीने संगणकावर देवनागरी लिपीचे अक्षरारोहण १९७८ सालच्या जानेवारीत करून दाखविले व एक क्रांतिकारी प्रयोग सिद्ध झाला. या प्रयोगातील अक्षरांकन र.कृं.नी केले होते. या प्रयोगापासून र.कृ. तेथे नेमाने जाऊ लागले.
सुलेखनावर आधारित विविध अक्षरवळणे तयार करण्यासाठी ‘पॅलाटिनो’ ही संगणकीय आरेखन प्रणाली र.कृं.नी १९९३ मध्ये एन.सी.एस.टी. येथे विकसित केली. तसेच, ‘अक्षरविन्यास’ हा शब्दसंस्कारक (वर्ड प्रोसेसर) तयार केला. दुर्दैव असे की, ह्या अस्सल भारतीय संगणक प्रणाल्या सर्वांसाठी वापरावयास उपलब्ध झाल्या नाहीत.
र.कृं.नी १९८३ मध्ये ‘उल्का अॅडव्हर्टायझिंग’ सोडली व मुंबई येथील आय.आय.टी.च्या ‘आय.डी.सी.’ (इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) मध्ये ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. मुक्त शैक्षणिक वातावरणात मनातील कल्पनांना मूर्त रूप देण्यास त्यांनी सुरुवात केली. संशोधन आणि अध्यापन असा मनाजोगता प्रवास सुरू झाला. तेथे त्यांचे अनेक शिष्य-अनुयायी तयार झाले.
आय.आय.टी., पवई येथे १९८३ मध्ये ‘अक्षरयोग’ हे चर्चासत्र व संलग्न प्रदर्शन, मुंबईच्या नेहरू सेंटर येथील भारतीय लिप्यांच्या विकासाचे टप्पे दाखविणारे भव्य प्रदर्शन; १९८८ मध्ये दिल्ली स्थित इंदिरा गांधी नॅशनल कल्चरल सेंटर येथील जागतिक सुलेखन प्रदर्शन ‘आकार’, अशा अनेक जबाबदार्या र.कृं.नी समर्थपणे पेलल्या व भारतास व इतर जगास भारतीय संस्कृतीची ‘अक्षर’ओळख करून दिली. ही प्रदर्शने म्हणजे र.कृं.च्या अक्षराभ्यासाची, ध्यासाची, ध्येयाची आविष्कृती होती.
‘मायक्रोसॉफ्ट’च्या संगणक प्रणालीवर सर्व भारतीय भाषांसाठी त्यांनी केलेले योगदान ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठी कामगिरी ठरली आहे. वैदिक चिन्हांचे युनिकोडमध्ये मानकीकरण होण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते. त्याच संदर्भात ते अमेरिकेस गेले असताना त्यांचे आकस्मिक निधन झाले.