Skip to main content
x

हुसेन, मकबूल फिदा

           दृश्यकलेच्या क्षेत्रात भारताची ओळख जागतिक स्तरावर निर्माण करणारे चित्रकार हुसेन यांचा उल्लेख भारताचा ‘पिकासो’ म्हणून केला जातो. चित्रकारिता, छायाचित्रण, चित्रपटनिर्मिती, काव्य अशा अनेक कलांमध्ये निर्मिती करणारे हुसेन हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.

              मकबूल फिदा हुसेन यांचा जन्म महाराष्ट्रातील पंढरपूर येथे झाला. त्यांचे आजोबा अब्दुल हुसेन यांचा कंदील बनवण्याचा परंपरागत व्यवसाय होता. मकबूल फिदा हुसेन यांच्या आईचे नाव झइनाब होते. हुसेन एक वर्षाचे होण्यापूर्वीच त्या वारल्या. छोटा मकबूल मातृसुखाला कायम पारखा राहिला. नंतरच्या काळात हुसेन यांच्या चित्रकृतींमध्ये त्यांना आई नसण्याच्या रितेपणातून आलेला अनुभव दिसतो. चेहरा नसलेल्या स्त्रिया, स्त्रीच्या विविध रूपांचे आकर्षण त्यांनी कलाकृतींमधून व्यक्त केले आहे. आई वारल्यानंतर हुसेन यांचे वडील फिदा हुसेन हे इंदूर (मध्यप्रदेश) येथे स्थायिक झाले. इंदूरमध्ये वडिलांबरोबर मकबूलला एक ‘स्त्री’ दिसू लागली. बांगड्या, पैंजण, अत्तरे, मेहंदी आणि कुजबुज असा ‘स्त्री’चा सुवास घरात दरवळायला लागला. हुसेन यांच्या आठवणीतील पहिली ‘स्त्री’ म्हणजे त्यांची सावत्र आई.

              इंदूरला फिदा हुसेन कापडगिरणीमध्ये काम करीत. ते अत्यंत कडक व शिस्तप्रिय होते. फिदा हुसेन यांचे सासरे गुजरात-सिद्धपूरमध्ये धर्मगुरू होते. त्यांच्या प्रभावामुळे घरात एकंदरीतच धार्मिक वातावरण असे. फिदा हुसेन यांनी छोट्या मकबूलला दोन वर्षांकरिता आजोबांकडे इस्लाम धर्माची शिकवण घेण्यासाठी पाठवले होते. फिदा हुसेन यांची महिन्याची कमाई मात्र फार नव्हती. त्यांना दुसर्‍या पत्नीपासून चार मुलगे व चार मुली होत्या, शिवाय मकबूल व घरातील माणसे मिळून वीस जणांचा मोठा कुटुंबकबिला ते सांभाळत असत. एकंदरीतच परिस्थिती गरिबीची असली तरी शिक्षणाविषयी घरामध्ये जागरूकता होती.

               तरुणपणापर्यंत चित्रकार हुसेन यांच्या वाचनात अवनींद्रनाथ टागोर, नंदलाल बोस, रेंब्रां, व्हेलास्क्वेझ, यांच्यावरची पुस्तके येऊन गेली होती. मकबूल हुसेन यांचे शालेय शिक्षण आठवीपर्यंत झाले. त्यांनी उपजीविकेला पूरक असे शिक्षण घ्यावे असे फिदा हुसेन यांना वाटत असे. परिणामी शिंपी, ड्राफ्ट्समनसारखी कामे मकबूल हुसेन लहान वयात शिकले. त्यांची  छायाचित्रणाची आवड लक्षात घेऊन घरची परिस्थिती फार चांगली नसतानाही फिदा हुसेन यांनी त्यांना कॅमेरा घेऊन दिला होता. वडिलांकडून मिळालेल्या अशा प्रोत्साहनामुळे हुसेन यांच्या कलानिर्मितीला सतत चालना मिळाली.

              इंदूरमधील होळकर राज्य प्रदर्शनात १९३३-३४ च्या सुमारास हुसेन यांच्या चित्रास सुवर्णपदक मिळाले. वडिलांच्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण असला तरीही मुलाने चित्रकार व्हावे असे त्यांना वाटत नव्हते. चित्रकार एन.एस. बेंद्रे यांनी हुसेन यांच्या वडिलांचा दृष्टिकोन बदलला. बेंद्रे यांच्याकडून मुलाची स्तुती ऐकल्यानंतर मात्र ते मकबूलसाठी सायकल, रंगपेटी, ब्रश, स्केचबुक आणि चित्रकलेचे हे सामान ठेवण्यासाठी विशेष शिवलेले कपडे घेऊन आले. या काळामध्ये हुसेन कधी चित्रकार बेंद्रे यांच्याबरोबर, तर कधी स्वतंत्रपणे रेखाटने व निसर्गचित्रणे करत इंदूरच्या आसपास भटकत. याच काळात ते व्ही.डी. देवळालीकर यांच्या कलाशाळेमध्ये शिकले. दरम्यान एके दिवशी त्यांनी उस्ताद नसीरुद्दीन डागर यांचा ‘धृपद धमार’ ऐकला आणि भारतीय संगीताच्या ताकदीने ते अचंबित झाले. चित्रकार एम.एफ. हुसेन यांचे तरुणपणीचे हे दिवस असे चित्र, संगीत, छायाचित्र, चित्रपट आदी कलांच्या आणि सर्वसामान्य माणसाच्या अस्तित्वाने भारलेले होते.

              सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकण्याच्या इराद्याने १९३४ मध्ये हुसेन मुंबईत आले. जे.जे. स्कूलची दुसर्‍या वर्षाची परीक्षा ते दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. दरम्यानच्या काळात वडिलांची गिरणीमधील नोकरी गेली होती. घरी इतर भावंडे लहान होती. त्यामुळे मकबूल हुसेन यांना स्वत:ला कमवण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे जे.जे. स्कूलमध्ये शिकण्याऐवजी त्यांनी मुंबईमध्ये चित्रपटांची पोस्टर्स व होर्डिंग्ज रंगवण्याचे काम स्वीकारले. या कामाची सहा आणे रोजंदारी मिळत असे.

              हुसेन या काळात कमीतकमी दिवसांत जास्तीतजास्त मोठे काम करण्यास शिकले. हे काम करताना जागा कमी असे, त्यामुळे एका डोळ्याने पाहून काम करण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले. भरपूर रंगाचा जोरकस वापर, उत्स्फूर्तपणा, कमीतकमी रेषांमध्ये चित्रण ही या कामाची वैशिष्ट्ये होती. या अनुभवाचा उपयोग पुढे त्यांनी स्वतंत्र कलाकृती करताना करून घेतला.

              हुसेन यांचा हा काळ अविरत कष्ट करण्याचा काळ होता. सुरुवातीच्या दिवसांत मुंबईत राहायला जागा नाही, घरचे जेवण नाही, अशी परिस्थिती होती. हळूहळू जम बसत गेला, तसे चार पैसे गाठीशी पडू लागले. या दरम्यान त्यांनी सुलेमानी पद्धतीचे अन्न देणार्‍या खानावळीत जेवण्यास सुरुवात केली. ही खानावळ महमुदा बीबी या प्रेमळ, विधवा स्त्रीची होती. पुढे ११ मार्च १९४१ रोजी महमुदा बीबीची मुलगी फाझिलाबरोबर हुसेन यांनी निकाह केला. हुसेन या काळात खेळणी व फर्निचर डिझाइनिंग आणि ते रंगवण्याचेही काम करत. या कामातूनही बर्‍यापैकी पैसे मिळत. पण तेव्हाही हुसेन यांना चित्र काढणे महत्त्वाचे वाटे. अडचणीच्या परिस्थितीत फाझिला हुसेन यांनी मकबूलना साथ दिली. आणि ते कोट्यधीश होण्यापर्यंतच्या सगळ्या प्रवासात ही साथ कायम राहिली.

              भारताला १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याने भारतीय कलाकारांच्या मनाला उभारी आली. याच वर्षीच्या ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या प्रदर्शनात हुसेन यांचे ‘सुनहरा संसार’ हे चित्र प्रदर्शित झाले. ग़्रामीण जीवनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी कुटुंबाचा बैलगाडीतून सुरू असलेला प्रवास या चित्रामध्ये चित्रित केला होता. चित्रकार सूझांनी १९४७ मध्ये ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप’ स्थापन केला. त्यांच्या आमंत्रणावरून हुसेन या ग्रूपमध्ये सामील झाले. त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्याबरोबर दिल्लीला जाऊन, हुसेन राष्ट्रपती भवनातील दृश्यकलेचे प्रदर्शन बघून आले. भारतीय शिल्पकला, लोकचित्रकला आणि पहाडी, बशोलीसारख्या अभिजात कला पाहताना भारतीय दृश्यकला क्षेत्राच्या व्याप्तीची पहिली जाणीव हुसेन यांना झाली. सूझांमुळेच हुसेन यांनी या काळात जेन्सनचे ‘मॉडर्न आर्ट’, कुमारस्वामींचे ‘भारतीय कला’ इत्यादींवरचे विचार वाचले. या दरम्यान सूझा, रझा आणि अकबर पदमसी हे तीन ‘प्रोग्रेसिव्ह ग्रूप’मधील चित्रकार पॅरिसला गेले आणि ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप’चे काही काळातच विसर्जन झाले.

              हुसेन यांचे पहिले स्वतंत्र प्रदर्शन १९५० मध्ये झाले. दुसरे प्रदर्शन कलकत्त्याच्या (कोलकाता) केमोल्ड आर्ट गॅलरीच्या उद्घाटनप्रसंगी झाले. परंतु त्या काळात ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्टस् ग्रूप’च्या प्रकारांची चित्रे विकत घेण्याकडे लोकांचा कल नव्हता. हुसेन यांनी १९५१ पासून ‘घोडा’ या विषयावरची चित्रे काढण्यास सुरुवात केली. लहानपणी हुसेन जुमनमियाँ या घोड्याच्या नाला बनवणार्‍या आजोबांच्या मित्राकडे जात, तेव्हापासून त्यांच्या मनात घोड्याविषयीचे आकर्षण दडले होते.

              हुसेन यांना १९५२ मध्ये चीनमध्ये जाण्याची संधी मिळाली. चीनमधील प्रसिद्ध चित्रकार ‘चि पै हंग’ यांची घोड्यांची चित्रे बघून हुसेन यांना स्फूर्ती मिळाली आणि त्यांनी पुन्हा घोड्यांच्या चित्रांची चित्रमालिका केली. त्यानंतर हुसेन युरोप दौर्‍यावर गेले. भारतात परतल्यावर मद्रास येथील कलासंग्रहालयात जाऊन चोला शिल्प व नंतर खजुराहोच्या शिल्पांची त्यांनी दोनशे रेखाटने केली. हे वर्ष होते १९५४. या रेखाटनांमध्ये कमीतकमी रेषांमध्ये समोरील आकाराचा आकृतीबंध सामावून घेण्याचा प्रयत्न होता. याच वर्षी हुसेन यांना ललित कला अकादमीने सन्माननीय सदस्यत्व बहाल केले. ललित कला अकादमीचे १९५५ मध्ये पहिले देशव्यापी प्रदर्शन भरले, त्यात हुसेन यांच्या ‘जमीन’ या चित्राला प्रथम पारितोषिक मिळाले. ‘जमीन’मधल्या मानवाकृतींचा आकृतिबंध हुसेन यांच्या स्वतंत्र शैलीमधून आलेला आहे. गावाचे भूतकाळातील संदर्भ या चित्रामध्ये प्रामुख्याने दिसतात.

              हुसेन यांनी १९५६ मध्ये ‘स्पायडर अ‍ॅण्ड द लँप’ ही चित्रकृती केली. ही चित्रकृती हुसेन यांच्या कलाप्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. अभिजात व लोकचित्रशैलीच्या एकत्रीकरणातून आलेले आकार, सपाट रंगलेपन, कमीतकमी रंगांचा वापर, आकारांची जोरकस व ठळक बाह्यरेषा ही चित्राची वैशिष्ट्ये म्हणता येतील. हुसेन यांच्या कलाकृतींची १९५६ च्या पुढे जवळपास चौदा वर्षे म्हणजे १९७० पर्यंत जगभर प्रदर्शने झाली. त्यांतील झुुरिच, प्रयाग, बर्लिन, टोकियो, जर्मनी, रोम, न्यूयॉर्क, कॅनडा, लंडन, बगदाद येथील प्रदर्शने उल्लेखनीय ठरली. हुसेन यांना १९६० मध्ये टोकियो बिनालेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

              हुसेन यांनी १९६० ते ७०च्या दशकामध्ये केलेली ‘रामायण’वरील चित्रमालिका व त्यापाठोपाठ ‘महाभारत’ ही चित्रमालिका या त्यांतील आशय व शैलीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या. हुसेन यांच्या चित्रशैलीवर लोकचित्रकला आणि आदिवासी चित्रकला यांचा प्रभाव कायम राहिला. विठ्ठल, कृष्ण, गणपती, हनुमान अशा देवदेवता आणि जनमानसाचे नाते पंढरपूर, सिद्धपूर, इंदूर या ठिकाणी बालपण गेल्यामुळे हुसेन यांनी अनुभवले होते. त्यांनी रामलीला, कथकली, पुराणे, उपनिषदे यांचा केलेला अभ्यास या अनुभवांना पूरक ठरला व या सार्‍यांचे प्रतिबिंब या चित्रांमध्ये उमटले.  हुसेन यांनी १९७८ मध्ये सूफी काव्याचा अभ्यास करून त्यावर चित्रमालिका तयार केली.

              हुसेन यांच्या चित्रकृती १९७१ मध्ये ‘साओ-पाउलो बिनाले’मध्ये पिकासोच्या चित्रांसमवेत प्रदर्शित झाल्या. १९७५ मध्ये भारतामध्ये आणीबाणी जाहीर झाली. या काळात हुसेन यांनी इंदिरा गांधींना ‘दुर्गे’च्या रूपात रंगवले. हे त्यांचे वैयक्तिक राजकीय मत होते. परंतु त्यावर भारतभरातून निषेधाचे सूर उमटले.

              ऐंशीच्या दशकातील हुसेन यांच्या महत्त्वाच्या चित्रकृती म्हणजे मदर तेरेसांवरील चित्रमालिका. मदर तेरेसा यांच्या कोलकात्यातील भेटीने हुसेन प्रभावित झाले. वृद्ध, थकलेल्या मदर तेरेसा हुसेन यांना प्रकाश आणि आशेचे प्रतीक वाटल्या. आईचे नसणे अनुभवलेल्या व्यक्तीला आईच्या कुशीची जी ओढ वाटते, ती हुसेन यांनी अनुभवली होती; पण चित्रकार म्हणून कलाकृती करण्यापूर्वी त्यांनी युरोपातील रेनेसान्स काळातल्या मेरी आणि येशू यांच्या चित्र, शिल्पाकृतींचा पुन्हा अभ्यास केला व त्या अभ्यासातून ही चित्रमालिका निर्माण केली. हुसेन यांनी १९८७ मध्ये सर सी.व्ही. रामन यांना आदरांजली म्हणून ‘द रामन इफेक्ट’ यावर चित्रमालिका केली. हुसेन यांच्या इतर चित्रांपेक्षा वेगळे असे हे काम होते.

              हुसेन यांच्या कलाप्रवासातील १९९० नंतरचा काळ हा वादग्रस्त काळ म्हणावा लागेल. त्यांनी १९७० मध्ये ज्या विविध देवदेवतांची चित्रणे केली, त्यांत सरस्वतीचे नग्न चित्रण होते. भारतीय तत्त्वज्ञान नग्नतेला शुद्धता मानते. परंतु १९९६ मध्ये ‘विचार मीमांसा’ नावाच्या हिंदी मासिकाने ‘चित्रकार या कसाई’ नावाचा लेख या चित्रकृतींच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध केला. भारतामध्ये १९७० ते १९९६ या दरम्यान राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या घटना घडून गेल्या होत्या. अयोध्येचे बाबरी मशीद प्रकरण व त्या मागोमाग झालेले बॉम्बस्फोट यांमुळे समाजात तणाव होता. या स्थितीत ‘विचार मीमांसा’मधील लेखाने भर घातली आणि हुसेन यांना टीकेचे लक्ष्य बनविले गेले.

              बजरंग दलाने १९९८ मध्ये हुसेन यांच्या घरावर हिंसक हल्ला केला. हुसेन यांच्या चित्रांविरोधात भारतभरातून अनेक खटले न्यायालयांमध्ये दाखल झाले. या सगळ्याचे कळत-नकळतपणे हिंदुत्ववादी गटांनी समर्थन केले. ‘इंडिया टुडे’ने २००६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘काश्मीरसाठी कला’ या प्रदर्शनातील चित्र ( जे ‘भारतमाता’ नावाने ओळखले जाते; पण हे नाव हुसेन यांनी दिलेले नाही) पुन्हा वादग्रस्त ठरले. या सगळ्या वादांची, खटल्यांची, हिंसक हल्ल्याची परिणती म्हणजे २०१० मध्ये हुसेन यांनी कतारचे नागरिकत्व घेतले.

              हुसेन यांची कलानिर्मिती केवळ चित्रांपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची भित्तिचित्रे केली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, दिल्ली; टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फण्डामेन्टल रिसर्च, मुंबई; अलिगड विश्‍वविद्यालय, इंद्रप्रस्थ भवन, दिल्ली; एअर इंडिया इंटरनॅशनल, हाँगकाँग; बँकॉक, झुरीच, प्रयाग, जकार्ता एअरपोर्ट इत्यादी अनेक ठिकाणची भित्तिचित्रे या त्यांच्या उत्कृष्ट कलाकृती आहेत.

              चित्रपट माध्यम हा हुसेन यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. लहानपणी ते मोठा खोका घेऊन, त्याच्या दोन टोकांना स्वत: काढलेली चित्राची पट्टी बांधून फिरवत व चित्रपट तयार करत. हुसेन यांनी १९६६ मध्ये भारत सरकारच्या निमंत्रणावरून पहिला लघुचित्रपट केला : ‘थ्रू द आइज ऑफ ए पेंटर’. राजस्थानच्या पार्श्‍वभूमीवर गाय, छत्री, कंदील, चप्पल, स्त्रिया व पुरुष अशा अनेक आकारांचे संदर्भ आणि संबंध या कृष्णधवल चित्रपटामध्ये टिपले होते. हुसेन यांच्या चित्रांवरदेखील या आकार-वस्तूंचा प्रभाव आहे, जो या चित्रपटात प्रकर्षाने जाणवतो. या लघुचित्रपटाला १९६७ च्या बर्लिनमधील चित्रपट महोत्सवात ‘गोल्डन बेअर’चा (लघुचित्रपट) सन्मान मिळाला.

              वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी, २००० मध्ये हुसेन यांनी ‘गजगामिनी’ हा माधुरी दीक्षितची प्रमुख भूमिका असलेला आणि स्त्रीत्वाची विलोभनीय रूपे दाखवणारा चित्रपट केला. ‘हम आपके हैं कौन’ हा माधुरी दीक्षितची भूमिका असलेला प्रसिद्ध चित्रपट हुसेन यांनी अनेकदा पाहिला होता आणि त्यांनी माधुरीवर चित्रमालिकाही केली होती.

              हुसेन यांनी २००४ मध्ये ‘मीनाक्षी : अ टेल ऑफ थ्री सिटीज’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटातील ‘नूर उन अल्ला नूर’ ही कव्वाली कुराणातील शब्दांवर आधारित आहे असे म्हणत इस्लामवादी गटांनी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली. ‘‘मला कुणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत,’’ असे सांगून हुसेन यांनी हा चित्रपट चित्रपटगृहांतून काढून घेतला.

              हुसेन यांचे चित्रपटवेड पूर्वीपासूनचे आहे. सिनेमाची होर्डिंग्ज तर ते करीत होतेच; पण लोकरंजनाचे माध्यम म्हणूनही चित्रपट, नाटकांसारखी माध्यमे त्यांना महत्त्वाची वाटत. सत्यजित रे यांच्या ‘पथेर पांचाली’ या चित्रपटाने प्रभावित होऊन त्यांनी ‘फ्रॉम गीतांजली टू पथेर पांचाली’ अशी चित्रमालिका १९८६ मध्ये केली होती. ‘घाशीराम कोतवाल’ या विजय तेंडुलकरांच्या नाटकाचा प्रयोग पाहून हुसेन यांनी स्केचेस आणि चित्रे केली होती. दृश्यकलेला समांतर अशा चित्रपटामधली अभिजातता आणि रंजनात्मकता या दोन्हींचे त्यांना कुतूहल होते.

              चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांच्या कलाकृतींनी भारतीय दृश्यकला क्षेत्रातील विक्रीचे उच्चांक मोडले. सर्वाधिक किमतीच्या कलाकृतींचा मान त्यांच्या चित्रकृतींना मिळत राहिला. चित्रकार हुसेन यांना अनेक मानसन्मान मिळाले. भारत सरकारने ‘पद्मश्री’ (१९५५), ‘पद्मभूषण’ (१९७३) व ‘पद्मविभूषण’ (१९९१) देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांना १९७३ मध्ये राज्यसभेचे सदस्यपद बहाल करण्यात आले.

              हुसेन प्रसिद्धिलोलुप असले तरी समकालीन गुणवान चित्रकारांबद्दल त्यांना तितकाच आदर होता. तय्यब मेहता, व्ही.एस. गायतोंडे, एस.एच. रझा, एन.एस. बेंद्रे यांच्याबद्दलचा आदर ते बोलूनही दाखवत. म्हणूनच बॉम्बे आर्ट सोसायटीने नवोदित चित्रकारांसाठी सुरू केलेल्या शिष्यवृत्तीचे नाव ‘बेंद्रे-हुसेन स्कॉलरशिप’ असे ठेवण्याचा त्यांनी आग्रह धरला. याच नावाने ही स्कॉलरशिप आता दिली जाते.

              न्यूयॉर्क येथील प्रकाशक हॅरी अ‍ॅब्रम्स यांनी १९६७ मध्ये हुसेन यांच्या चित्रकृतींवर पुस्तक छापले. भारतीय चित्रकाराचे भारताबाहेर प्रसिद्ध झालेले हे पहिले पुस्तक आहे. साठ आणि सत्तरच्या दशकांतले प्रसिद्ध लघुचित्र-पटकार शांती चौधुरी यांनी फिल्म्स डिव्हिजनसाठी चित्रकार हुसेन यांच्यावर लघुचित्रपटाची निर्मिती केली. हुसेन यांनी तीन कलाकेंद्रांची निर्मिती केली. कलाकारांनी एकत्र येऊन विचारमंथन करण्याची जागा, असे याचे स्वरूप आहे. ‘हुसेन सानकलाना’, बंगलोर; ‘हुसेन की सराई’, फरीदाबाद; व ‘हुसेन दोशी गुफा’, अहमदाबाद या ठिकाणी या कलावास्तू उभ्या आहेत.

              एम.एफ. हुसेन यांची कला आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व दोन्ही इतके एकरूप होेते, की त्यांच्या कलाकृतींचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ पद्धतीने करणे कठीण होते. त्यांची सतत नवी माध्यमे शोधणारी निर्मितिशील ऊर्जा एकीकडे आणि दुसरीकडे स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याची, वाद निर्माण करण्याची त्यांची प्रवृत्ती, यांमुळे अनेकदा हुसेन यांच्या कृतीमागील निखळ कलात्मकता आणि प्रसिद्धीचा स्टंट यांत नीरक्षीरविवेक करणे त्यांच्या चहात्यांनाही कठीण जाई. हुसेन यांची तुलना पिकासोशी केली गेली ती दोघांमध्ये असलेल्या अखंड ऊर्जेमुळे, प्रचंड निर्मितीमुळे आणि स्वत:च्या हयातीत आख्यायिका होण्याची क्षमता पुरेपूर वापरून घेण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे. आपल्या चित्रांप्रमाणेच स्वत:चे व्यक्तिमत्त्वही हुसेन यांनी कलात्मक चातुर्याने सतत लोकांसमोर ठेवले.

              उंच आणि बारीक अंगकाठी, भेदक डोळे, मिस्कील हास्य, लांब दाढी, अनवाणी पाय, हातात मोठा ब्रश अशा हुसेनना चित्रे काढताना पाहणे हा एक अनुभव होता. चित्रविषयांबद्दलचा अभ्यास, चौफेर वाचन, हिंदी, उर्दू काव्याची आवड, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व या त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या बाजू होत्या. सामाजिक घडामोडींशी त्यांचा संपर्क होता आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कामात पडत असे. मग ती आणीबाणी असो वा मदर टेरेसा. चित्रकार, छायाचित्रकार, मुद्राचित्रकार, कोरिओग्रफर, अभिनेता, नेपथ्यकार, चित्रपट दिग्दर्शक अशा अनेक भूमिका त्यांनी निभावल्या.

              त्यांनी केलेल्या सनसनाटी सादरीकरणांमध्येही कलावंताचे तर्कशास्त्र होते. मग तो ‘श्‍वेतांबरी’सारखा कापडाचे तागे आणि वर्तमानपत्रांचे कपटे पसरलेला, प्रेक्षकांच्या अभिरुचीला आव्हान देणारा प्रयोग असो, टाटा सेंटर, कोलकाता येथे प्रेक्षकांसमोर चित्रे रंगवून शेवटच्या दिवशी त्यांच्यावर पांढरा रंग लावून ती नष्ट करण्याचा प्रसंग असो, अथवा भीमसेन जोशी यांच्याबरोबर केलेल्या संगीत आणि चित्रकला अशा संयुक्त प्रयोगाची घटना असो, अशा स्टंट्समागे हुसेन यांचा दृष्टिकोन कलेच्या गुणात्मकतेपेक्षा कला हेदेखील एक ‘घटित’ अथवा ‘हॅपनिंग’ आहे हे दाखवून देण्याचा होता.

              चित्रकार मकबूल फिदा हुसेन पंचाण्णव वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य जगले. ‘‘नागरिकत्व आणि पारपत्र हे केवळ कागदाचा तुकडा आहेत, त्याला महत्त्व द्यायचे कारण नाही,’’ असे म्हणून घडलेल्या राजकीय घटनांची संभावना करत शेवटच्या श्‍वासापर्यंत जगात कुठेही राहून हुसेन यांनी कलानिर्मिती करण्यालाच महत्त्व दिले. मात्र हुसेन यांनी कलेच्या माध्यमातून स्वत:ची नाळ भारतीय मातीशी जोडून ठेवली होती. धर्म आणि राजकारण यांच्यामध्ये भरडला गेलेला हा प्रतिभासंपन्न कलावंत  शेवटी लंडनच्या मातीमध्ये विसावला.

- माणिक वालावलकर

हुसेन, मकबूल फिदा