Skip to main content
x

पाठक, यशवंत त्र्यंबक

      शवंत त्र्यंबक पाठक यांचा जन्म पिंपळनेर, ता.साक्री, जि.धुळे येथे झाला. प्राथमिक शिक्षण ग्रामपंचायतीच्या शाळेत झाले. नाशिकच्या पेठे विद्यालयातून ते एस.एस्सी. (१९६४), हंसराज प्रागजी महाविद्यालयातून १९७०मध्ये एम.ए. झाले आणि ‘मराठी कीर्तन परंपरा व मराठी वाङ्मय’ या अनोख्या विषयावर अत्यंत परिश्रमपूर्वक प्रबंध लिहून पुणे विद्यापीठाची पीएच.डी, पदवी संपादन केली.

‘अंगणातले आभाळ’ या पाठक यांच्या आत्मकथात्म लेखनात घरातील कुळधर्म, कुळाचार व बाळबोध वातावरणापासून तो त्यांनी पीएच.डी. करण्यापर्यंतच्या वाटचालीचे यथार्थ वर्णन आहे. आंतरिक जिव्हाळ्यातून निर्मित सहजस्पर्शी लेखनातून लोककला व लोकसंस्कृती यांचे हृदय चित्रण झालेले आहे. त्यांचे कुटुंब एकत्र व मोठे होते. त्यांचे वडील त्र्यंबकराव (भाऊ) प्रख्यात कीर्तनकार होते, त्यामुळे ते फिरतीवर असत व मधूनमधून पिंपळनेरला, म्हणजे घरी मुक्काम करीत. ते जातिवंत स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी प्रपंचाचा विचार केला नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी कीर्तनकाराचा पेशा पत्करला. त्यासाठी संगीताचे व संस्कृत भाषेचे धडे घेतले. १९३०च्या जंगल सत्याग्रहासाठी धुळ्यातून त्यांनी पाच हजार तरुण नेले, तर १९४२च्या चलेजाव चळवळीसाठी खानदेशातून अकरा हजार कार्यकर्ते तयार केले. त्यांच्या ओळखी दांडग्या होत्या. अशा कर्तबगार भाऊंची अत्यंत उत्कट इच्छा यशवंताने कीर्तनकारच व्हावे, अशी होती. भाऊ अतिशय तापट स्वभावाचे होते. यशवंताची आईदेखील कीर्तने करी, परंतु तिची इच्छा मुलाने उत्तम शिकावे व नोकरीस लागावे अशी होती. भाऊंनी मुलाला प्राथमिक शिक्षण मंदिरातून काढून पंचवटीच्या संस्कृत पाठशाळेत घातले. त्याचबरोबर संध्याकाळी तो गांधर्व संगीत विद्यालयात जाऊन तबला शिकू लागला. पाठक म्हणतात, “माझ्या गोदाकाठच्या ‘अंगणाने’ मला भलतेच ‘आभाळ’ दाखवले.”

शाळेत व महाविद्यालयात यशवंत हे वक्तृत्व, निबंध व तबला ह्या स्पर्धांत नेहमी भाग घेत व बक्षिसे मिळवत. त्यांचे शिक्षण शिष्यवृत्तीवर झाले. शिक्षण शिक्षकांनी व हितचिंतकांनी शिक्षण शुल्क भरले. शिष्यवृत्तीच्या पैशातूनच त्यांनी सायकल घेतली, कारण घरी अठराविसे दारिद्य्रच होते. शाळेत व महाविद्यालयात शिकताना यशवंत (नाना) यांना भाऊंच्या कीर्तनात तबलावादन करावे लागे. आईची ओढाताण पाहून यशवंतांचे मन तीळतीळ तुटे. होईल तितकी पैशाची मदत तो आईला करी. किराणा दुकानात नोकरी केली, भिक्षुकी केली, सुट्टीच्या दिवसांत किरकोळ कामे केली. यशवंतांचे पाठांतरही उत्तम होते. नाशिकला तात्यासाहेब शिरवाडकरांकडे नामवंत साहित्यिक येत. त्यांचा सहवास यशवंतांना मिळे. ‘तात्यांचा फार सहवास घडला. त्याचा परिणाम माझ्यावर असा झाला की, अडचणींवर ठामपणे उभे राहण्याइतका आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला. तात्यांचे माझ्या अभ्यासावर, बाकीच्या विविध सांस्कृतिक कार्यावर फार बारीक लक्ष होते. काही वेळा काही पुस्तके ते माझ्यासाठी राखून ठेवीत. तात्यांकडे गेले की परतताना नवा जन्म घेतल्यासारखं वाटे.’ असे यशवंत पाठक यांनी तात्यासाहेब शिरवाडकरांबद्दल म्हटले आहे.

भाऊ मुंबईला कीर्तनासाठी जात. एकदा ते यशवंतांना श्री.रा.टिकेकर यांच्या घरी घेऊन गेले. टिकेकरांनी भाऊंना सांगितले, ‘तुम्ही त्याला सक्तीने ढकलू नका. त्याचं त्याला ठरवू दे.’ पाठक नमूद करतात, ‘एखाद्या पालकाप्रमाणे त्यांनी माझ्यावर जी सावली केली ती अखेरपर्यंत सोडली नाही... इतक्या विलक्षण अभ्यासयोगी व रसरशीत माणसाच्या सहवासात मी आलो. मीही त्यांच्या कुटुंबातला एक झालो.’

बी.ए.ला ऑनर्स मिळवून पेठे हायस्कुलात तीन महिने टाइपिस्टची नोकरी केली. एम.ए.ला उत्तम गुण मिळाल्यामुळे ते प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात रुजू झाले.

यशवंत पाठक यांच्या विविध प्रकारच्या लेखनात ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ (१९७९), ‘नक्षत्रांची नाती’ (व्यक्तिचित्रे, १९८७), ‘ब्रह्मगिरीची सावली’ (ललित लेख, १९८८), ‘मातीचं देणं’ (१९९०), ‘स्पंदने श्रीसमर्थांची’ (१९९५) ही समीक्षात्मक पुस्तके, ‘आभाळाचे अनुष्ठान’ (२०००) हा काव्यसंग्रह आणि ‘अंगणातले आभाळ’ (१९८५) यांचा समावेश आहे.

- वि. ग. जोशी

पाठक, यशवंत त्र्यंबक