Skip to main content
x

नेरूरकर, प्रभाकर श्रीधर

        प्रभाकर श्रीधर नेरूरकर यांचा जन्म नेरूर येथे झाला. त्यांचे शिक्षण सलग एका ठिकाणी झाले नाही. वडील मिलिटरीत होते. प्राथमिक शिक्षण पुण्यात व मराठी पाचवीनंतरचे शिक्षण वालावल (बेळगाव) येथे झाले. कुडाळच्या हायस्कूलमधून ते १९४० साली मॅट्रिक झाले व काही काळ त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. नंतर राष्ट्र सेवा दलात प्रवेश केला. १९४१च्या सुमारास मुंबईत आल्यावर त्यांनी  नियतकालिकांतून लेखन केले. १९४४ पासून १९४८ पर्यंत छबिलदास हायस्कुलात नंतर नेरूर, कुडाळ, बांदा येथे शिक्षकाची नोकरी करून  १९६२ साली त्यांचे मुंबईत पुन्हा आगमन झाले. अनंत कदम यांच्या ‘किडे’ या कादंबरीवर नेरूरकरांनी ‘ब्लिट्झ’ या साप्ताहिकात परीक्षण लिहिले होते. चिं.त्र्यं.खानोलकर (आरती प्रभू) यांच्या निधनानंतर त्यांच्यावर नेरूरकरांनी एका मासिकात ‘चाफा बोलेना’ नावाचा लेख लिहिला होता. चिं.त्र्यं.खानोलकर हा कुडाळच्या शाळेतला त्यांचा लाडका विद्यार्थी. नेरूरकरांनीच आरती प्रभूंच्या कवितेच्या चोपड्या सर्वप्रथम ‘मौज’च्या स्वाधीन केल्या होत्या.

नेरूरकर लिखित ‘माझ्या आजोळची वाट’ हा ललित संग्रह वाचताना शिरीष पै यांनी नमूद केले आहे, ‘लेखकापेक्षाही हा माणूस एक व्यक्ती म्हणून अधिक अभ्यसनीय आहे. त्यांच्यामधला तीव्र संवेदनांनी गदगदलेला तत्त्वचिंतक या छोट्याशा लेखसंग्रहात अगदी ठसठशीत नितळपणे जाणवला. त्यांच्यातला सहृदय माणूस ओळी-ओळींतून डोकावतो; जुन्या आठवणीत रममाण झालेले नेरूरकर त्यांच्या मनातल्या निसर्गाच्या गाढ ओढीचे साक्षात दर्शन देतात. झाडांशी संलग्न झालेल्या आठवणी त्यांनी अतीव कोमलतेने, हळुवारपणे सांगितल्या आहेत. त्यातून त्यांच्यातला सौंदर्यवादी कवी सहज प्रकट होतो. वाचकाला सहज पटते की ते खूप काही पाहिलेले, सोसलेले आणि भोगलेले गृहस्थ आहेत.’

नेरूरकरांनी निग्रो कवींचे मराठी अनुवाद केले आणि सामाजिक बांधिलकीच्या मराठी कवितांची इंग्रजी भाषांतरे केली. त्यांनी मुंबईत चेकॉव्हच्या साहित्याचा विमर्श घेण्यासाठी चेकॉव्ह क्लब काढला होता. कोकण मराठी साहित्य परिषदेने ‘कोकण साहित्यभूषण’ हा श्रेष्ठ पुरस्कार त्यांना सन्मानाने सावंतवाडी येथे अर्पण केला.

१९४८ पासून १९६२ पर्यंत नेरूरकर गोवामुक्ती आंदोलनात मग्न असल्याने त्यांचे लेखन थांबले होते. मॉरिशसमधल्या मराठी मंडळींबरोबर सुसंवाद प्रस्थापित करण्याचे श्रेय नेरूरकरांना आहे. त्यांनी विपुल लेखन केले.

‘अनवाणी चाल’ हा त्यांचा पहिला लघुनिबंध संग्रह होय. ‘प्रवासिनी’ (१९७३), ‘रोम्बाट’ (१९८८), ‘बेट नावाचे माणूस’ (१९८८) हे कथासंग्रह; ‘किरिस्ताव’ (१९७१), ‘कॉकटेल’ (१९७९), ‘कोण्या एका देशात कोणे काळी’ (१९८६) ‘अजून इंद्रायणी वाहतच आहे’ (१९९५) या कादंबर्‍या; ‘मॉरिशस डायरी’ (१९८५) हे प्रवास वर्णन; ‘बकुळीची फुले’ (१९८५), ‘समुद्रस्पर्श’ (१९९३) हे ललितलेखसंग्रह; ‘फुले-आंबेडकर दलित साहित्य’ (१९९६) ही समीक्षा; ‘ऑन द पेव्हमेन्ट ऑफ लाइफ’ (१९७३) हा नारायण सुर्व्यांच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद त्यांनी केला.

‘नेरूरकरांचा अवघा प्राण कायम साहित्यात गुंतलेला होता. त्यातल्या त्यात सामाजिक परिवर्तनाची आर्त साद घालणारे साहित्य हा त्यांचा कलिजा होता’ असे रवींद्र पिंगे सांगतात. यासोबत ‘ध्येयवादी मूल्य मानणारा, परोपकारी, कनवाळू, सावली देणारा साहित्यसेवक’ असा त्यांचा परिचय आपुलकीने देऊन कौतुकाने उल्लेख करतात की ‘प्रल्हाद चेंदवणकरांपासून हिरा बनसोडे, उर्मिला पवारांपर्यंत सर्वांना नेरूरकरांचा आत्मिक आधार होता.’ नेरूरकरांनी दुर्गा भागवत, सदानंद रेगे आणि विजय तेंडुलकर यांच्या घेतलेल्या मुलाखती केवळ अमोल आहेत. नाटक वगळता नेरूरकरांनी हाताळला नाही असा एकही वाङ्मयप्रकार नाही.

- वि. ग. जोशी

नेरूरकर, प्रभाकर श्रीधर