कुंटे, वामन जनार्दन
वामन जनार्दन कुंटे हे बी.ई. (सिव्हिल), आर्किटेक्ट व इंजिनिअर होते. त्यांचे वास्तव्य सांगली, फलटण व जमखिंडी येथे झाले. याव्यतिरिक्त कवी आणि अनुवादक म्हणून ते ओळखले जातात.
कुंटे ह्यांची वाङ्मयविषयक सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे; काव्यविषयक काही नवे प्रयोग करूनही काहीसे उपेक्षित राहिलेले कवी रेंदाळकर यांच्या कवितांचे दोन खंडात संकलन करून क्रमशः १९२४ व १९२८ मध्ये ते स्वखर्चाने प्रसिद्ध केले, ही होय. दुसर्या खंडांत कुंटे यांनी कवी चरित्रासोबत ‘रेंदाळकरांचे निंदक’ हा नागेश गणेश नवरे यांचा लेख समाविष्ट केला आहे. मन लावून शांतपणे काम करीत राहणे हा कुंटे यांचा स्वभावधर्म होता. विनोबाजींनी प्रसिद्ध केलेले ‘गुरुबोध’ म्हणजे श्रीशंकराचार्यांच्या ‘स्तोत्रे आणि प्रकरण’ ह्या ग्रंथातील निवडक वेच्यांचा संग्रह असून तो संस्कृतमध्ये आहे. त्याची प्रस्तावना हिंदीत व मराठीत आहे. अनेकांनी या पुस्तकाच्या मराठी भाषांतराची मागणी केली होती. अति व्यग्रतेमुळे स्वत: विनोबाजी ते करू शकले नाहीत. प्रकाशकांनी हे काम वामनराव कुंटे यांच्यावर सोपविले. त्यांनी ते काम आनंदाने स्वीकारून पूर्ण केले. तत्पूर्वी त्यांनी जाणकारांशी चर्चा केली व विनोबाजींशीही चर्चा केली. याविषयी कुंटे म्हणतात, “मी काही मोठा संस्कृतज्ञ नाही किंवा अध्यात्मशास्त्रात प्रवीण नाही.” त्यांनी पूर्ण मेहनतीने हे भाषांतर प्रसिद्ध केले. १९११ साली प्रसिद्ध झालेले ‘सरला’ खंडकाव्य ही त्यांची पहिली साहित्यकृती. मूळ बंगालीवरून त्यांनी मराठीत ‘सुशीला की विमला आणि इतर गोष्टी’ (१९३१) लिहून प्रसिद्ध केल्या. टॉलस्टॉयच्या ‘इव्हन द फूल’ या प्रदीर्घ कथेचे स्वैर रूपांतर ‘भोळ्या रामजींचे साम्राज्य’ या नावाने प्रसिद्ध केले. ‘अपरोक्षानुभूति’ (१९५४), ‘प्रबोध सुधाकर’ (१९६१), ‘ओडिसाच्या जगन्नाथदासाचा भागवत एकादश स्कंध’, ‘भागवत सार‘, ‘कबिराचे बोल’ (१९६२) ही त्यांची अध्यात्मविषयक भाषांतरे होत. ‘थोरोचे श्रमजीवन’ (१९५१) आणि ‘मालकीची मीमांसा’ (१९५५) हे दोन अनुवाद उल्लेखनीय आहेत. ‘विनोबा वाङ्मय दर्शन’मध्ये कुंटे यांनी विनोबांच्या वाङ्मयाचा परिचय करून दिला आहे. वरील उल्लेखांवरून अध्यात्म व तत्त्वज्ञान ह्या विषयांकडे लेखकाची विशेष रुची दिसून येते.