Skip to main content
x

हेबळेकर, अरुण कृष्णराव

     अरुण कृष्णराव हेबळेकर यांचा जन्म मुंबई येथे एका उच्चमध्यमवर्गीय, सारस्वत कुटुंबात झाला. त्यांचे सर्व शिक्षण मुंबई येथे झाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. (१९६४) व पीएच.डी. (१९८०) ह्या पदव्या घेतल्या. प्रारंभी मुंबईतील विल्सन व नंतर के.जे. सोमय्या या महाविद्यालयांतून पदार्थ-विज्ञान या विषयाचे अध्यापन केल्यावर १९६४ सालापासून मडगाव (गोवा) येथील श्रीमती पार्वतीदेवी चौघुले महा-विद्यालयात १९७४पर्यंत अध्यापन केले. नंतर त्यांनी पणजी येथे मुंबई विद्यापीठाच्या अध्यापन व संशोधन केंद्रात १९७४ ते १९७५ या काळात व नंतर गोवा विद्यापीठात १९८५ ते १९८८ सालापर्यंत काम केले. नंतर १९८८पासून १९९३पर्यंत फोंडा एज्युकेशन सोसायटीच्या कला व विज्ञान महाविद्यालयात ते प्राचार्य होते. मध्यंतरी, काही काळ ते गोवा विद्यापीठाचे कुलसचिव व नंतर पुन्हा १९९५ ते २००३ सालापर्यंत, निवृत्तीपर्यंत त्यांनी प्राचार्यपदावर काम केले.

     आजवर त्यांचे ‘थिऑरिटिकल फिजिक्स’ या विषयावरील सात शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. गोवा कोकणी अकादमीच्या ‘नवो सोद’ या शास्त्रीय विषयाला वाहिलेल्या नियतकालिकाचे ते काही काळ मानद संपादक होते.

     हेबळेकरांनी विपुल ललित लेखन केलेले असून त्यांतील विषयांची झेप व विविधता लक्ष वेधून घेते. त्यांचे कादंबरीलेखन वास्तववादी, तसेच ते भविष्याचा वेध घेणारे विज्ञानपरही आहे. ‘सलोमीचे नृत्य’(१९८३), ‘रुद्रमुख’(१९८५), ‘आदित्य’ (१९९०), ‘भृगुसेतू’ (१९९०), ‘जोनास आर्क’ (१९९९), ‘भद्रमुखी’ (२००६), या विज्ञान कादंबर्‍यांतून भविष्यात डोकावून पुढील काळातील विज्ञान प्रगतीचा व त्याचा दुरुपयोग करून अरिष्टे ओढवून घेण्याच्या मानवी प्रवृत्तीवर बोट ठेवण्याचा प्रयत्न आहे. विज्ञानाचे फायदे आहेत, तसेच त्यातून देशद्रोह, गुन्हेगारी व विनाश यांनाही ते कसे कारणीभूत ठरते, याचे त्यांनी प्रभावी चित्रण केले आहे. ‘आदित्य’ हा अणुसंकल्प जैविक संघटना न बनता तो नियंत्रणाबाहेर का गेला याभोवती कथानक फिरते ठेवून, विज्ञान व मानव यांच्यातील संबंधांवर मार्मिक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ‘आदित्य’मध्ये लक्ष वेधून घेतो. अन्य कादंबर्‍यांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे.

     त्यांच्या विज्ञान कादंबर्‍या केवळ रहस्यकथा नसून त्यांत विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर निसर्गाचे आव्हान, माणसाचा स्वार्थ व त्याची हतबलता यांचेही दर्शन घडते, तर ‘ओ जॉनी’सारख्या लघुकादंबरीतून गोव्यातील फुटबॉलच्या विश्वातील जीवघेणी स्पर्धा व कारस्थाने यांचे दर्शन घडते.

     त्यांच्या ‘रिंग ऑफ सॅटर्न’ (१९८०), ‘पाय नसलेली माणसे’ (१९८२ व ‘पुरंध्रा’ (२००६) या कथासंग्रहांतून माणसा-माणसांमधल्या नात्यांचा कधी करकचून आवळला जाणारा, तर कधी सुटून मोकळा होणारा गोफ विणला जातो. वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती, उत्कट प्रसंग, निकोप पुरोगामी दृष्टी, बोलीभाषेची सहजता व शैली ही त्यांच्या कथांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

     भविष्याचा वेध घेत प्रत्यक्षात घडणार्‍या वैज्ञानिक घटनांच्या आधारे मानवाचा स्वार्थ, निर्घृण निसर्ग आणि अदम्य प्रवृत्ती यांच्या परस्पर संघर्षांतून हेबळेकरांमधील कलावंत भविष्याचा जो वेध घेतो, तो दुर्मीळ आहे. रूपक व फँटसीचा गोडवा, त्यातील गूढता आणि केवळ विज्ञानाकरिता विज्ञानाची भलामण असा एकेरी दृष्टिकोन न स्वीकारता, विज्ञानालाही एक मानवी चेहरा असू शकतो हे हेबळेकरांनी दाखविले आहे. त्यांच्या ‘भद्रमुखी’ या २००६ साली प्रकाशित झालेल्या कादंबरीत ही सर्व वैशिष्ट्ये दिसून येतात तर ‘सलोमीचं नृत्य’मधील गोमंतकाच्या निसर्ग व संस्कृतीचा भविष्यकाळात होऊ घातलेला विनाश अस्वस्थ करून सोडतो. त्यामुळे विज्ञानकथा लिहिणार्‍या मराठीतील मोजक्या लेखकांत  त्यांची दखल घ्यावी लागते.

     त्यांनी कोकणीमध्ये लिहिलेल्या ‘भुरग्यारवातीर’ (मुलांसाठी) या चरित्रमालिकेत ‘आर्यभट्ट’ (१९८०) व ‘भास्कराचार्य’ (१९८२) यांचा समावेश आहे. तसेच, विज्ञानमालिकेत ‘विश्वाची उत्पत्ती’ (२००४) हे पुस्तक आहे.

     त्यांना आजवर मिळालेल्या मानसन्मानांत ‘रिंग ऑफ सॅटर्न’ (१९८०) व ‘रुद्रमुख’ / ‘ओ जॉनी’ (१९८६) यांना गोव्याच्या कला अकादमीने दिलेल्या पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच ‘आदित्य’ व ‘जोनास आर्क’ या कादंबर्‍यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. गोमंतक मराठी अकादमीचा प्रतिष्ठेचा ‘कृष्णदास शामा पुरस्कार’ त्यांच्या ‘आदित्य’ (१९९२) या कादंबरीला मिळालेला आहे. गोव्यातील नियतकालिकांतून त्यांनी अनेक वैज्ञानिक संकल्पनांवर लेखन केले आहे.

     - डॉ. प्रल्हाद वडेर

 

हेबळेकर, अरुण कृष्णराव