Skip to main content
x

आठवले, शांताराम गोविंद

शांताराम गोविंद आठवले यांचे वडील सरदार शितोळे यांच्या पुण्याकडील जहागिरीची व्यवस्था पाहत असत. कसबा पेठेतील त्यांच्या वाड्यातच शांताराम यांचे बालपण गेले. त्यांच्या वडिलांना नाटकाचा व गाण्याचा शौक होता. शितोळे यांच्या वाड्यातील दिवाणखान्यात तमाशाचे फड कडकडत, बैठकी रंगत, शाहिरांच्या हजेऱ्या लागत. हे सारे शांताराम आठवले यांना लहानपणीच पाहायला मिळाले. तो काळ मराठी नाटकाच्या वैभवाचा काळ होता. त्यांनी बहुतेक सारी चांगली नाटके पाहिली. त्यातूनच त्यांचा कलावंताचा पिंड हळूहळू घडत गेला.

भावे स्कूलमधील शिक्षकांनी शांताराम यांची कलात्मक अभिरुची अधिक डोळस केली. याच शाळेत त्यांना कविवर्य माधव ज्युलियन यांच्या अध्यापनाचा लाभ घडला. पण आठवले यांची काव्यवृत्ती खरी फुलवली ती प्रा. वा. भा. पाठक यांनी. मराठीसोबतच प्रा. किंकर यांनी इंग्रजी काव्याचीही त्यांना गोडी लावली. त्यांनीच शांताराम आठवले यांच्या कविता प्रथम प्रकाशात आणल्या.

शांताराम १९३० साली मॅट्रिक झाले. कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी पहिल्या वर्षातच महाविद्यालय सोडले. प्रसिद्ध लेखक ना. ह. आपटे यांचे ‘पहाटेपूर्वीचा काळोख’ हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याने प्रभावित होऊन शांताराम त्यांना भेटायला कोरेगावला गेले, तेथे त्यांच्या सहवासात काही काळ राहिले.

याच सुमारास ‘प्रभात फिल्म कंपनी’ कोल्हापूरहून पुण्यास आली होती व ना. ह. आपटे यांच्या कथेवरून ‘अमृतमंथन’ हा चित्रपट काढायची बोलणी सुरू होती. आपटे यांनी शांताराम आठवले यांचे साहित्यगुण पारखले होते. त्यांनीच शांतारामबापूंकडे आठवल्यांच्या नावाची शिफारस केली. आपटे यांच्याच प्रेरणेने आठवल्यांनी ‘प्रभात’मध्ये पदार्पण केले. प्रभातमध्ये तीस रुपये पगारावर पद्यलेखक म्हणून त्यांची नेमणूक झाली. सुरूवातीला पद्यलेखनाबरोबरच चित्रीकरणास साहाय्यक म्हणून पडणारी सर्व कामे ते करत असत. शिवाय प्रभातच्या प्रसिद्धीचे व त्यानिमित्त करावे लागणारे सर्व लेखन करण्याची जबाबदारीही आठवले यांच्यावर होती.
          ‘अमृतमंथन’ या चित्रपटापासून शांताराम आठवले यांनी प्रभातच्या अनेक चित्रपटांचे गीतलेखन केले. त्यांनी लिहिलेली ‘अहा भारत विराजे’, ‘भारती सृष्टीचे सौंदर्य’, ‘उसळत तेज भरे’, ‘हासत वसंत ये वनी’, ‘राधिका चतुर बोले’, ‘लखलख चंदेरी’, ‘दोन घडीचा डाव’ ही सारी गीते प्रासादिक, नादमधुर व अर्थपूर्ण होती. आपल्या पद्यरचनेने शांताराम आठवले यांनी पद्यरचनेचा श्रेष्ठ आदर्श घालून दिला.

            आठवले यांनी लिहिलेल्या ‘आधी बीज एकले’ या ‘संत तुकाराम’मधील अभंगाला तुकारामाची प्रतिष्ठा आणि पावित्र्य लाभले. संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक ह.भ.प. पांगारकर यांनी हा अभंग ऐकला. तुकारामांचा हा अभंग आपल्या दृष्टीतून कसा सुटला, याचे आश्चर्य वाटून त्यांनी तुकारामाची गाथा पुन्हा धुंडाळली, या पांगारकर यांच्या कृतीतच आठवले यांच्या काव्यप्रतिभेचे वैशिष्ट्य अधोरेखित होते. प्रभातमध्ये आठवले १९३४ ते १९४३ अशी नऊ वर्षे होते. नंतर ते दिग्दर्शनाकडे वळले. शांतारामबापूंबरोबर काम करताना त्यांनी दिग्दर्शनातील बारकावे व वैशिष्ट्ये आत्मसात केली. आठवले यांनी १९४८ साली ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट निर्माण व दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यांनी ‘मै अबला नहीं’, ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘संसार करायचाय मला’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘पडदा’ असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. १९५९ मध्ये भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’मध्ये दिग्दर्शक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तिथे त्यांनी अनेक अनुबोधपटांचे दिग्दर्शन केले.

‘एकले बीज’ व ‘बीजांकुर’ हे काव्यसंग्रह व ‘प्रभातकाल’ हे ‘प्रभात’मध्ये असतानाच्या काळात लिहिलेले त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे. त्यांना १९६५ सालच्या ‘वावटळ’ चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचे महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. त्यांचा ‘ज्ञानेश्वरी’चा व ‘ज्योतिषशास्त्रा’चा अभ्यास दांडगा होता. आध्यात्मिक वृत्तीने ते निवृत्तीचे जीवन जगत होते.

- मधू पोतदार

आठवले, शांताराम गोविंद