Skip to main content
x

भावे, वामन प्रभाकर

      हाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा वामनराव भावे यांनी सुरू केली. ही शाळा म्हणजेच गेल्या १५० वर्षापासून कार्यरत असलेली शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ होय. भावे कुटुंब मुळचे कोकणातील रत्नागिरीजवळील भावे आढंब या गावचे. आजोबा विनायकराव भावे हे प्रथम पुण्यात आले व बांधकाम कंत्राटदाराचा व्यवसाय सुरू केला. त्यांचे  पुत्र  प्रभाकर हे सावकारी करून सुस्थितीत होते. वामनराव हे प्रभाकररावांचे द्वितीय सुपुत्र. वामनरावांचा जन्म वामन द्वादशीस इ.स. १८५० मध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण विश्रामबागवाड्यातील सरकारी विद्यालयामध्ये झाले. त्यांचे बंधु व ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर डेक्कन महाविद्यालयामध्ये गेले. परंतु शिक्षण अर्धवट सोडून देऊन कुटुंबाचा भार पेलावा लागला. वामनरावांनी बोमन साहेबांच्या ख्रिश्‍चन मिशनरीच्या इंग्रजी शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली. परंतु त्या ठिकाणी काही धार्मिक बाबींवरून बोमनसाहेब व त्यांच्यात मतभेद होऊन त्या नोकरीस रामराम ठोकला व स्वतंत्र शाळा स्थापन करण्याचे ठरविले.

      त्यावेळी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लक्ष्मणराव इंदापूरकर व वामनराव भावे या तिघांनी त्यावेळच्या लहान सहान शाळांची पुनर्रचना करून त्यावेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी २४ सप्टेंबर १८७४ रोजी ‘पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूटची’ स्थापना केली. राष्ट्रीय वृत्तीच्या शिक्षणासाठी या तिघांनी मिळून स्थापन केलेली ही पहिली बिनसरकारी संस्था होय.

      पुढे ‘पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन’ या शाळेला सरकारकडून केवळ शिक्षणविषयक मान्यता मिळाली. पण अनुदानरूपाने  होणारी मदत मात्र कित्येक वर्ष शिक्षण खात्याकडून मंजूर होईना. याच काळात वामनरावांनी अत्यंत स्वार्थत्यागाने, चिकाटीने, काटकसरीने व धोरणाने वागून संस्थेचे संरक्षण केले.

      सुदैवाने त्यांना संस्था स्थापनेमध्ये साह्य करणारी मंडळी देखील तेवढी सामर्थ्यशाली होती. ही मंडळी अनुदान मिळविण्याच्या प्रयत्नात असतानाच ब्रिटिश हिंदुस्थान सरकारचे दक्षिण विभागाचे सेनापती लॉर्ड मार्क केर साहेबांनी ‘पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूटला’ भेट दिली व ते शाळा पाहून खुश झाले. तेव्हा पासून शिक्षण खात्याकडून सरकारी अनुदान सुरू झाले. शाळेला सरकारी अनुदान सुरू होईपर्यंत कित्येक वर्ष ती केवळ लोकाश्रयावरच चालली होती. हळूहळू शाळा चांगली नावारूपाला आली. शाळेत मुलांची संख्या वाढू लागली. तसेच उत्साही, स्वार्थत्यागी शिक्षक मिळाले. पैकी इंदापूरकरांचे त्यांना जास्त सहकार्य मिळाले. त्यामुळेच संस्थेला स्वतःची जागा विकत घेता आली. तशातच पुण्यात १८९६ मध्ये प्लेगने थैमान घातले. अशा प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता मोठ्या धैर्याने काम चालूच ठेवले.

      वामनराव नेहमी संस्थेला थोर लोकांचा कसा आश्रय मिळविता येईल या योजनेत असत. लॉर्ड मार्क केर यासारख्यांच्या परिचयामुळे त्यांच्याच साह्याने बादशाहचे चुलते ड्युक ऑफ कॅनॉट यांच्या भेटीचा योग आला. तसेच लॉर्ड हॅरिस, लॉर्ड रे, इत्यादी गव्हर्नर मंडळी, राजेमहाराजे तसेच इतर थोर मंडळींनीही संस्थेस भेटी दिल्या आणि संस्थेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

      संस्थेची पुढे भरभराट झाल्याने संस्थेचे एक महाविद्यालय असावे असे वाटल्याने ‘महाराष्ट्र कॉलेज’ सुरू केले.  परंतु त्यावेळच्या परिस्थितीमुळे शाळा टिकविण्यासाठी महाविद्यालय बंद करावे लागले. आपण सुरू केलेल्या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून वामनरावांनी आपली संपूर्ण खाजगी मालमत्ता उदारहस्ताने सार्वजनिक स्वरूपाची केली.  संस्थेच्या कामासंबंधी नियम ठरवून घेऊन, नेटिव्ह इन्स्टिट्यूट असोसिएशनच्या ताब्यात दिली. संस्थेच्या कामात वामनरावांनी चांगले यश मिळविले व चांगला नावलौकिक मिळविला. त्यांची लोकप्रियता इतकी होती की, त्यांनी स्थापन केलेल्या पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूट या शाळेला लोक ‘भावे स्कूल’ असे म्हणत आणि आजही म्हणतात. वामनरावांनी सुरू केलेल्या शाळेचा आज ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ नावाने शैक्षणिक वटवृक्ष झाला आहे.

     शाळेशिवाय इतर सार्वजनिक कामांची देखील वामनरावांना आवड होती. पुणे शहर महानगरपालिकेचे लोकनियुक्त सभासद म्हणून अनेक वेळा ते निवडून आले होते व शाळासमितीचे अध्यक्ष  म्हणूनही त्यांनी काम केले होते. १८९६ मध्ये इंदापूरकरांच्या मृत्यूमुळे वामनरावांचा उजवा हातच नाहीसा झाला असे त्यांना वाटले. नंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळेे व पुण्यात प्लेग असल्यामुळे वामनराव कर्जतला हवा पालटण्यासाठी गेले. तेथे नवज्वराने त्यांचा मृत्यू झाला.

- विवेक कुलकर्णी

भावे, वामन प्रभाकर