Skip to main content
x

सामंत, दत्तात्रेय सीताराम

सामंत मास्तर

     कृष्णाबाई व सीताराम यांच्या पोटी दत्तात्रय सामंत यांचा जन्म झाला. दुतोंड या खेडेगावी राहणाऱ्या या सामंतांच्या घरापासून चार मैल दूर असलेल्या परुळ्याच्या शाळेत दत्ताचे प्राथमिक शिक्षण झाले. गरिबीमुळे चार चार वार लावून शिक्षण चालू ठेवून दत्ता पाचवी इयत्ता पास झाला.

      १९०० - १९०१ च्या आसपास दत्ता वेंगुर्ल्याच्या एका व्यापाऱ्याकडे नोकरी करीत असताना तेथे परुळ्याच्या शाळेचे सहाय्यक व तृतीय वर्ष शिक्षित श्री. वामन बाळकृष्ण सामंत यांची भेट घडली. त्यांच्या घरी शनिवारी व रविवारी जाऊन दत्ता त्यांचे मार्गदर्शन घेत असे. पण तेथे पुस्तके उपलब्ध नसल्याने केवळ दोन पैशांच्या आधारावर पाऊणशे मैलांची पायपीट करत बेळगावला बहिणीकडे जाऊन तिच्या मदतीने दत्ता जुनी पुस्तके घेऊन परतला. वेंगुर्ल्याला वामनरावांकडे तो सहावी शिकला व बाहेरून सातवीच्या (म्हणजे त्यावेळची व्ह. फा. च्या) परीक्षेस बसून तो पहिला आला. १९०४ मध्ये तो पुण्याला गेला व प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य कृष्णाजी गणेश केळकर यांच्या मार्गदर्शनाने, स्वत:च्या चिकाटी व दुर्दम्य इच्छेने, मेहनत करून १९०७ मध्ये तृतीय वर्ष शिक्षित होऊन महाविद्यालयामधून बाहेर पडला. घरी परतला पण वडील सीतारामपंतांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी आयुष्यभर विद्यादानाचे व्रत घेतले. लोक त्याला ‘सामंत मास्तर’ म्हणून ओळखू लागले. १९०८ ते १९६५ पर्यंत त्यांचा विद्यादान यज्ञ अहर्निश चालू होता.

      सामंत यांना संस्कृतची गोडी होती. रघुवंश व अमरकोश त्यांना मुखोद्गत होते. मुलांची सर्वांगीण वाढ व्हावी, प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व्हावा व शिक्षणाचा कसही वाढावा, कुणबी मुलांना व इतर मागास मुलांना शिकण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. मालगुंड, मसुरे, आचरे येथे त्यांच्या बदल्या झाल्या व पुढे रत्नागिरीला बरेच वास्तव्य झाले. मुख्याध्यापक या नात्याने रत्नागिरीला शाळा क्र.एक ची शाळा त्यांनी खरीखुरी क्र. एक ची करून दाखवली. तेथून ते क्र. दोन च्या शाळेत गेले. शाळेच्या वेळाबाहेर ते मुलांना मल्लखांब, आट्यापाट्या शिकवत असत. हस्ताक्षर सुंदर व वळणदार असावे याबद्दल त्यांचा कटाक्ष असे. पुण्याच्या अध्यापन विद्यालयाचे प्राचार्य सी. रा. तावडे यांच्या विद्यमाने भरविलेल्या अखिल महाराष्ट्रातील शाळांमधील मुलांच्या हस्ताक्षरांच्या प्रदर्शनात दिलेल्या २५ प्रशस्तिपत्रकांपैकी १५ एकट्या रत्नागिरी शहराच्या वाट्याला येऊन त्यातील पहिल्या पारितोषिकासकट दहा सामंत मास्तरांच्या शाळेला मिळाली. होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांचा हात सदैव पुढे असे.

      प्राथमिक शिक्षक या नात्याने राष्ट्रपती पुरस्काराचा पहिला मान मिळविणारे गो. गो. ऊर्फ नाना पाटकर यांना प्रशिक्षित होण्यासाठी गुरूजींनी उत्तेजन दिलेच शिवाय रत्नागिरीला सहा महिने आपल्या घरी नानांची राहायची व्यवस्था केली. रत्नागिरीच्या शिक्षक पतपेढीच्या जनकांमध्ये वि. गो. खेर यांच्यासह गुरूजींचीही भूमिका होती. १९२८ मध्ये स्थापन झालेल्या या पतपेढीचे पाच वर्षांनी बँकेत रूपांतर झाले. तोपर्यंत सामंत गुरुजीच तिचे अध्यक्ष होते. १९३३ मध्ये भाग शिक्षणाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेव्हापासून अचानक जाऊन शाळा तपासणीचा झपाटा कधीच चुकला नाही. पहाटे उठून कंदील घेऊन डोंगराळ, खडकाळ पायवाटांनी अनेक मैलांच्या परिसरातील शाळांची तपासणी करताना त्यांचा बारकावा वाखाणण्यासारखा असे. शिक्षक वर्गाबद्दल योग्य ती सहानुभूती असली तरी त्यांनी शिस्त पाळलीच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे.

      शारीरिक शिक्षणासाठी त्यांनी स्वखर्चाने एका शिक्षकाची योजना करून तीन ते चार आठवड्यांचे वर्ग चालवले. जवळपासच्या शिक्षकांना एकत्र करून त्यांना लेझीम, लाठीकाठी इत्यादीचे शिक्षण दिले. १९३९ मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी अप्पासाहेब पटवर्धनांच्या मदतीने १९४० मध्ये कुणबी सेवासंघाची स्थापना केली. पुढच्याच वर्षी लांजे येथे कुणबी मुलांसाठी छात्रालय सुरू झाले. त्यावेळी खादीचा पंचा, साधा सदरा, बंद जाकीट व डोक्यावर खादीचीच टोपी चढली ती अखेरपर्यंत. गुरुजी छात्रांबरोबरच असत. आवारात भाजीपाला, झाडे - माड लावत. काटकसरीचे, शिस्तीचे, कष्टाचे, नम्रतेचे संस्कार त्यांनी मुलांत राहूनच त्यांच्यावर केले. १९४४ मध्ये साठी निमित्त त्यांचा बाळासाहेब खेरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांना मिळालेल्या थैलीत स्वत:चे १००रु. घालून ती त्यांनी कुणबी सेवा संघासाठी अप्पासाहेब पटवर्धनांच्या हवाली केली. त्यानंतर ते दापोलीला आले व तेथे नवभारत छात्रालयाची वाढ केली. डॉ. ग. वा. मंडलीक पति-पत्नी,शिवप्रताप मालूशेट यांच्याशी गुरुजींचे जिव्हाळ्याचे, घरोब्याचे संबंध होते. 

       छात्रालयात गुरुकुल शिक्षण पद्धती प्रमाणे दिनक्रम असे. नवभारत छात्रालयाची सुमारे पाच एकर जमीन आहे. त्यात भातशेती, केळी, फळझाडे यांची लागवड केली जाई. ते मुलांबरोबर असत. मुलांना दिले जाणारे पूर्णान्न दिसायला साधे, करायला कटकट कमी, उत्तम सत्त्वांशयुक्त असे. मुलांना सकाळी पावडरचे दूध किंवा कांजी मिळे. शरीरसौष्ठव स्पर्धेत कुणबी मुलांनी दोनदा पहिला नंबर पटकावला. छात्रांची नखे, केस, दात तसेच कपड्यांकडे त्यांचे जातीने लक्ष असेच. आजारी पडल्यास त्याची शुश्रूषा ते मातेच्या ममतेने करीत. गुरूजी मुलांना चित्रकला, हिंदी, संस्कृत परीक्षांना बसवीत. गावातल्या तज्ज्ञ शिक्षकांकडून त्या त्या विषयात मार्गदर्शन करत असत.

       १६-१७ वर्षांच्या कालखंडात एखाद दुसरे वर्ष वगळल्यास छात्रालयातील मुलांचा शालान्त परीक्षेचा निकाल १०० टक्के लागत असे.

त्यांनी १९४८ पासून जिल्हा शाळा समिती सदस्य या नात्याने आपल्या अनुभवाच्या आधारावर भरीव कामगिरी केली. सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू झाल्यावर १९५१ मध्ये जिल्ह्यातील शाळांची संख्या व शिक्षकांची संख्या तिप्पट झाली परंतु शाळागृहांच्या व प्रशिक्षित शिक्षकांच्या अभावी अनेक गावी दयनीय स्थिती निर्माण झाली. यातून स्वस्त शाळागृह योजना निर्माण झाली. त्यांच्या प्रेरणेने इयत्ता चौथी ते सहावीचे प्रश्‍नपत्र जिल्हा बोर्ड छापील काढून सर्व शाळांना पुरवू लागले. त्यामुळे चुरस व स्पर्धा निर्माण झाली. शिक्षणाचा कस वाढीस लागला. भूमितीची उपकरणे, नकाशे, पृथ्वीचा गोल, नाणी व तत्सम वस्तू, मुलांना समजून सांगण्यासाठी त्या त्या प्रकारचे तक्ते ही साधने शाळांकडे असली पाहिजेत असा गुरुजींनी आग्रह धरला.

      बोर्डाच्या बैठकीत येणाऱ्या ठरावांचा ते कसोशीने अभ्यास करीत, सहकाऱ्यांशी चर्चा करीत, अधिकाऱ्यांना भेटत, शाळांना भेट देऊन तपशीलवार माहिती घेत, इतर तालुक्यातील शाळांच्या परिस्थितीचे तुलनात्मक चित्र पाहत. मसुद्यावरील प्रत्येक विषयाचे ते स्वतंत्र टाचण करीत. १९५७ पर्यंत ते समिती सदस्य राहिले. १९५० व १९५२ या काळात त्यांनी अनेक शाळांना आकस्मिक भेट देऊन त्यांतील काही ठिकाणचे विदारक चित्र पाहिले. त्यांच्या प्रयत्नाने शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दापोली हे केंद्र मिळाले. त्यांना ८० वर्षे पूर्ण झाली तेव्हा १९६४ मध्ये मुंबईत मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

      - वि. ग. जोशी

संदर्भ
१. साखळकर, म. दि; ‘अमात नंदादीप’; साधना प्रकाशन, पुणे; १९७१.
सामंत, दत्तात्रेय सीताराम