Skip to main content
x

सहस्रबुद्धे, बळवंत चिंतामण

     बळवंत चिंतामण तथा बाळासाहेब सहस्रबुद्धे हे नाशिक मधील थोर शिक्षणतज्ज्ञ. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नाशिकच्या न्यू इंग्लिश स्कूल (रुंग्टा विद्यालया) मध्ये झाले. मॅट्रिक झाल्यानंतर नाशिकच्या एच.पी.टी. महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तत्त्वज्ञान विषयात त्यांनी  बी. ए. ची पदवी घेतली. त्यानंतर मात्र घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे बी. टी. ची पदवी घेऊन त्यांनी शिक्षकी पेशात प्रवेश केला. प्रारंभीच्या काळातील नोकरीचे रूपांतर त्यांनी ‘व्रता’त केले व शिक्षक या पदवीची प्रतिष्ठा मोठ्या निष्ठेने, सचोटीने जोपासली.

     न्यू इंग्लिश स्कूल मध्ये त्यांनी अध्यापन कार्यास सुरुवात केली. इंग्रजी व संस्कृत ह्या विषयांचे कुशल विद्यार्थीप्रिय अध्यापक म्हणून अल्पावधीतच त्यांनी लौकिक मिळविला. सन १९४२ मध्ये रुंग्टा विद्यालयामधील नोकरी त्यांनी सोडली व आजीव सदस्य म्हणून सहस्त्रबुद्धे नाशिक एज्युकेशन सोसायटीत दाखल झाले. त्यावेळी संस्थेची पेठे विद्यालय ही एकच शाळा होती. 

     सहस्त्रबुद्धे संस्थेचे कार्यवाह झाले आणि नऊ वर्षांच्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने त्यांनी संस्था वाढविली. ओझर येथील नवीन इंग्रजी शाळा धर्मशाळेत एका वर्गाने सुरू केली. भगूर येथील ति. झं. विद्यामंदिर राममंदिरात, तर नाशिक रोडची कन्या शाळा एका छोट्याशा बंगलीत सुरू केली. अनौपचारिक सभा घेऊन निधी जमा केला. इंग्रजी माध्यमाची शाळा तर अनेकांचा विरोध सहन करून सुरू केली. 

     पण कार्यवाह म्हणून काम करत असताना, मुख्याध्यापक असताना विषय शिक्षक म्हणून असणाऱ्या कर्तव्याचा त्यांनी कधीही विसर पडू दिला नाही. विद्यार्थ्यांच्या विकासाचे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम त्यांनी सुरू केले. एका वर्षी त्यांनी भरविलेले व्यवसाय मार्गदर्शन शिबीर पाहण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार आले असताना मुख्यमंत्र्यांनी प्रभावित होऊन शिक्षणमंत्री  मधुकरराव चौधरींनाही प्रदर्शनास भेट देण्यासाठी सुचविले. प्रदर्शनाच्या संदर्भात एक पुस्तिकाही काढली होती. प्रदर्शन पाहताच मधुकररावांनी महाराष्ट्रातील शाळांमध्ये पाठवण्यासाठी या पुस्तिकेच्या एक हजार प्रतींची मागणी केली.

      शुद्धलेखनाच्या बाबतीत त्यांचा मोठा कटाक्ष असे. गावातील दुकानांवर लावलेल्या पाट्यांवरील अशुद्धलेखन मुलांनी पाहू नये म्हणून ते स्वत: आठवड्यातील दोन दिवस पाट्या रंगविणाऱ्या पेंटरांकडे जायचे व मजकूर शुद्ध करून लिहून द्यायचे. नाशिकचे सार्वजनिक वाचनालय सरकारवाड्यात होते. ते नव्या इमारतीत हलवायचे होते. सहस्त्रबुद्धे त्यावेळी पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. त्यांनी मुलांना कामाला लावले व पाऊण लाख पुस्तके नव्या इमारतीत पोहोचवली. ने-आणीचा खर्च वाचला. मुलांना पुस्तकांचे महत्त्व समजले. दरवर्षी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिकांना बोलवायची प्रथा सहस्त्रबुद्धे यांनी सुरू केली. त्यामुळे वसंत बापट, विंदा करंदीकर, रणजित देसाई यांच्यासारख्यांची व्याख्याने ऐकायला मिळाली. शाळेविषयी त्यांचा एक दृष्टिकोन असल्यामुळे त्यांनी पेठे विद्यालयाला नाशिकचे सांस्कृतिक केंद्र म्हणून मान्यता मिळवून दिली.

     महाराष्ट्रातील एक अग्रेसर सांस्कृतिक संस्था म्हणून प्रसिद्धीस आलेल्या नाशिकच्या लोकहितवादी मंडळाच्या स्थापनेपासून आदरणीय वि. वा. तथा तात्यासाहेब शिरवाडकरांचे उजवे हात म्हणून त्यांना सहस्त्रबुद्धेंनी साथ दिली.

     आधाराश्रम, मतिमंद मुलांसाठी असलेले ‘प्रबोधिनी विद्यालय’, ‘नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड’, ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ अशा कितीतरी संस्थांना त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. संघटनकौशल्य, लोकसंग्रह करण्याची हातोटी, माणसे जोडण्याची व सांभाळण्याची कुशलता, अखंड सावधपणा, आर्थिक व्यवहारांतील दक्षता व सचोटी, नि:स्वार्थ वृत्ती, संस्थांच्या उत्कर्षाविषयीची नि:स्सीम तळमळ या सर्व पैलूंबरोबरच एक मिस्किल विनोदबुद्धी सरांना लाभलेली होती.

     ‘ स्वल्पविराम’ या विनोदी कवितांच्या व वात्रटिकांच्या संग्रहामुळे ‘वात्रटिकाकार’ म्हणूनही ते समाजापुढे आले. मुलांसाठी स्त्रीपात्रविरहित ‘जावईबापू’, मुलींसाठी पुरुषपात्रविरहित ‘गुलामांची सत्ता’ ही छोटी नाटके लिहून सहस्रबुद्धे यांनी ती बसवून घेतली. संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाच्या कारभारावर उपरोधिक टीका करणारे ‘काका मंडळ एक प्रहसन’, ‘सोसायन’ ही विडंबनात्मक काव्ये त्यांच्या निखळ विनोदाची साक्ष देणारी आहेत.

- प्रा. सुहासिनी पटेल

सहस्रबुद्धे, बळवंत चिंतामण