सुखटणकर, यशवंत हणमंत
गोव्यामधील चिंचणी गावात यशवंत ऊर्फ नानासाहेबांचा जन्म झाला. गावात मराठी शाळा नसल्याने यांचे शिक्षण वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडे येथे झाले. त्यांना लहानपणापासून वाचनाचा छंद होता. त्यांनी इंग्रजी शिक्षण मुंबईत मुगभाटात चुलत्यांच्या घरी राहून केले. १९१० मध्ये नाना स्कूल फायनल परीक्षा पास झाले. नोकरी अपरिहार्य होती. ३० मार्च १९१० रोजी राजापूर तालुक्यातील बाळाजी आत्माराम पत्की यांच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. विल्सन महाविद्यालयात नाना ग्रंथपाल म्हणून नोकरी करीत व वाचनाचा छंदही जोपासत.
‘सारस्वत विद्यार्थी साहाय्यक मंडळी’ ची स्थापना काशिनाथ रघुनाथ मित्र व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९०२ मध्ये केली. नानासाहेब सुखटणकर व इतरांच्या श्रमांमुळे या मंडळीचा पुढे विकास झाला. नानांनी १९११ मध्ये वरील सारस्वत विद्यार्थी साहाय्यक मंडळीच्या कार्याची धुरा वाहिली. त्यानंतरच्या अर्धशतकात सुमारे २८०० विद्यार्थ्यांना ९ लाख रुपयांहून अधिक मदत दिली व संस्थेची गंगाजळी १० लाख रुपयांपर्यंत नेली. एवढा दीर्घ काल अविरतपणे या संस्थेसाठी झटलेला दुसरा कार्यकर्ता संस्थेच्या इतिहासात नाही. नाना संस्थेचे स्वयंसेवक, चिटणीस, अध्यक्ष व नंतर विश्वस्त होते.
जुलै १९२३ मध्ये नाना, रा. ब. सखाराम विश्वनाथ राजाध्यक्ष, दि. ब. डॉ. ज. शं. नेरूरकर या तिघांनी मिळून, राजाध्यक्ष फॉरिन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळाला.
लिंगभेद किंवा ज्ञातीतील पोटभेद लक्षात न घेता गरजूंना शिक्षणात मदत करण्याच्या उदार धोरणातून संस्थेचे काम चालते. या सत्कार्याच्या प्रचारासाठी नानांना पायपीट करून वर्गणीदार वाढवणे, त्यांची यादी करणे, वर्गणी गोळा करणे, अर्जाचे फॉर्म देऊन भरून घेणे, वृत्तान्ताच्या प्रती घेऊन जिन्यांची चढउतार करीत उत्साह टिकवून काम करण्याचा आदर्श निर्माण केला. मानापमान दूर ठेवून, चिकाटीने व निरलस, निःस्वार्थीपणे नानांनी लोकांच्या वारंवार भेटी घेऊन संस्थेचे महत्व पटवून, सहानुभूती मिळवून वर्गणीदार वाढवले व देणगीदार मिळवले. १९१६ मध्ये सभासद संख्या ९३८ होती व वार्षिक मदत ४१०० रु. दिली जाई.
नानांच्या पुढे अण्णासाहेब कर्वे यांचा आदर्श होता. नानांनी ‘अनाथ विधवा शिक्षण फंड’ निर्माण करण्यासाठी खूप कष्ट केले. वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले. पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकरांसारखे त्यात भाग घेऊ लागले व बक्षिसे पटकावू लागले. सदानंद लक्ष्मण कापडी यांनी नानांना १९०९ ते १९६७ पर्यंत अखंड साथ दिली.
गरीब विद्यार्थ्यांना मदत करणारी एकमेव आदर्श ज्ञातीय संस्था असा सारस्वत विद्यार्थी साहाय्यक मंडळी व राजाध्यक्ष फॉरिन एज्यु. सोसायटीचा लौकिक झाला. त्याग व निष्ठेने शैक्षणिक कार्यात साहाय्यभूत झालेल्या नानांविषयी थोर मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे लिहितात, “सारस्वत ज्ञातीत जन्मलेल्या गरीब विद्यार्थ्यांच्या अभ्युदयासाठी नानांनी आपल्या अवघ्या जीवनाचे भिक्षापात्र केले.... एका विशिष्ट जातीतल्या विद्यार्थ्यांपुरते त्यांनी आपल्या सेवेचे क्षेत्र मर्यादित केले म्हणून त्यांच्या सेवेला गौणत्व येत नाही. माझ्यासारख्या लहानांनी पितृतुल्य नानांचे अभिनंदन न करता पदवंदन करायला हवे.”
२. प्रा. ग. ह. जांबोटकर, सा. वि. सा. मंडळी, मुंबई, १९६९.