Skip to main content
x

देशपांडे, वामन हरी

पल्या संगीतविषयक लेखनाने मराठी संगीत समीक्षेच्या विश्‍वाला मोठे योगदान देणाऱ्या वामनराव देशपांडे यांचे सत्यभामाबाई व हरी सखाराम देशपांडे आईवडील होत. सातार्‍यातील शिरवळ येथे प्राथमिक शिक्षण झाल्यावर वामनरावांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल येथून मॅट्रिक (१९२५) केले. नंतर १९२५ ते १९२८ या काळात मुंबईला ‘बाटलीबॉय आणि पुरोहित’ या अकाउंटन्सी फर्ममधून जी.डी.ए., एफ.सी.ए., एच.सी.ए. या परीक्षा देऊन ते व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंट झाले व १९३० पासून याच कंपनीत ते नोकरीस लागले. निवृत्तीनंतर त्यांचे पुण्यात वास्तव्य होते. 

वामनरावांच्या घरातच संगीतास अनुकूल वातावरण होते. त्यांचे वडील बंधू पांडुरंगशास्त्री हे आयुर्वेदाचार्य होते व त्यांना किराणा घराण्याची तालीम होती. त्यांच्याकडे अनेक कलाकारांचे जाणे-येणे असे. साताऱ्याला मटंगेबुवांकडे वामनरावांचे आरंभीचे संगीत शिक्षण झाले. पुण्यातील वास्तव्यात १९२२च्या सुमारास ते सन्मित्र समाजाच्या मेळ्यात रामभाऊ लिमये या संगीत शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली गात असत व त्यांच्या या गाण्याची चांगलीच तारीफ झाली. १९२५ ते १९२८ या काळात मुंबईत शंकरराव कुलकर्णी, यादवराव जोशी यांजकडून वामनरावांनी गायनाचे शिक्षण घेतले. बापूराव केतकर, तांबेशास्त्री यांजकडूनही ते वेळोवेळी मार्गदर्शन घेत असत. किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक सुरेशबाबू माने यांचे गायन वामनरावांनी ऐकले आणि ते या गायनाने अतिशय प्रभावित झाले. त्यांनी सुरेशबाबूंकडून १९२८ ते १९४० अशी बारा वर्षे शिक्षण घेतले.

सुरेशबाबूंकडून इतकी वर्षे शिकल्यावरही आपल्या गळ्यावर ती तरल-तलम गायकी चढत नाही असे त्यांना वाटू लागले. गोविंदराव टेंब्याशी त्यांचा परिचय झाल्यावर त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी गानमहर्षी अल्लदिया खाँ साहेबांचे शिष्य नत्थनखाँ यांजकडून शिक्षण घेण्याचे ठरविले. त्यानुसार खुद्द अल्लादिया खाँ साहेबांच्या उपस्थितीत रीतसर गंडाबंधन होऊन ते उ.नत्थनखाँचे शिष्य झाले. विशेष म्हणजे त्या काळात घराण्यांची बंधने कठोर आणि काटेकोर असूनही याबाबत त्यांचे आधीचे गुरू सुरेशबाबू माने हे यावरून यत्किंचितही नाराज झाले नाहीत आणि या दोघांच्या स्नेहात दुरावा आला नाही. नत्थनखाँची तालीम १९४० ते १९४६ अशी सहा वर्षे चालली. नत्थनखाँ वारल्यावर वामनराव जयपूर परंपरेच्या बुजुर्ग गायिका मोगूबाई कुर्डीकरांकडे ते शिकले.

१९२८-२९ सालापासून वामनराव संगीतावर लिहू लागले होते. संगीताच्या मराठीकरणावर ‘विविध वृत्त’मध्ये त्यांचा पहिला लेख आला होता. त्यानंतर  घरंदाज गायकी (मौज प्रकाशन, १९६१ - ‘बिटवीन टू तानपुराज’ या नावाने याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध), पं. कुमार गंधर्वांच्या ‘अनूपरागविलास’ या बंदिशींच्या पुस्तकाची प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना (मौज प्रकाशन, १९६५), ‘आलापिनी’ (मौज प्रकाशन, १९७९) तसेच अनेक स्फुट लेख असे विपुल लेखन त्यांनी केले. ‘महाराष्ट्राज काँट्रिब्यूशन टू म्युझिक’ हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले. या ग्रंथाचा ‘महाराष्ट्राचे संगीतातील कार्य’ हा स.ह.देशपांडे यांनी केलेला मराठी अनुवाद महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने १९७४ साली प्रकाशित केला. ‘एका गायकाचा ताळेबंद’ (संपादक अ.पां. देशपांडे, ग्रंथघर, मुंबई) हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तकही १९८८साली प्रकाशित झाले. 

महाराष्ट्राच्या स्वातंत्र्योत्तर सांगीतिक घडणीत वामनरावांचे मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे समाजाच्या सांगीतिक जाणिवा विकसित केल्या, तसेच संगीत महोत्सवांचे व परिसंवादांचे आयोजन, कलाकारांस व संशोधकांस आर्थिक पाठबळ देऊन प्रोत्साहित करणे, विविध शासकीय समित्यांच्या कार्यातून सरकार व कलाकार यांत दुवा जोडणे, ‘आर्य संगीत प्रसारक मंडळा’द्वारे सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे नियोजन करणे, ‘संगीत कलाविहार’सारख्या संगीतविषयक मासिकास अर्थसाहाय्य मिळवून देणे, असे वामनरावांचे कितीतरी उपक्रम सांगीतिक वातावरणाच्या अभिवृद्धीसाठी पोषक ठरले.

एक माणूस म्हणून वामनराव हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. बाटलीबॉय कंपनीसारख्या प्रसिद्ध आणि मोठ्या ऑडिटिंग कंपनीचे ते वरिष्ठ भागीदार होते. त्यांच्या कामानिमित्त तीस-चाळीस वर्षे ते साऱ्या देशात फिरले. अनेक बड्या कंपन्यांच्या धंद्यातील लबाड्या शोधून काढायचे काम त्यांच्याकडे असायचे. ती प्रकरणे उघडकीस येऊ नयेत म्हणून काही लाख रुपयांपर्यंत प्रलोभने त्यांना दाखविली गेली, कधी त्यांना जीवे मारण्याच्या अप्रत्यक्ष, कधी प्रत्यक्ष धमक्याही दिल्या गेल्या. पण पैशांच्या प्रलोभनालाही ते बळी पडले नाहीत, ना जिवाची पर्वा केली. व्यासंगी वृत्तीने ऑडिट आणि संगीत वाढवीत राहिले. लक्ष्मी आणि सरस्वती यांचा सुयोग्य मेळ वामनरावांच्या व्यक्तिमत्त्वात आणि आयुष्यात प्रतीत होतो.

‘घरंदाज गायकी’साठी उत्कृष्ट समीक्षेचा महाराष्ट्र राज्य सरकार पुरस्कार (१९६२), ‘आलापिनी’साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९७९), संगीतविषयक लेखनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने त्यांना डॉक्टरेट प्रदान केली होती. पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी मंजिरी आलेगावकर, लता गोडसे, ज्योत्स्ना चोळकर इ.ना शिकवले. त्यांचे पुत्र सत्यशील देशपांडे हे त्यांचा वारसा चालवीत आहेत.

            — डॉ. शुभदा कुलकर्णी

देशपांडे, वामन हरी