Skip to main content
x

सितारादेवी,

सितारादेवी यांचा जन्म कलकत्ता (कोलकाता) येथे धनत्रयोदशीच्या मंगल दिवशी झाला. त्यांचे वडील पं. सुखदेव महाराज हे नेपाळच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार होते. त्यांची आई मत्स्यकुमारी ही नेपाळच्या राजगुरूंची कन्या होती. सितारादेवींचे मूळ नाव धनलक्ष्मी होते. मोठ्या बहिणी अलकनंदा व तारा (पं. गोपीकृष्ण यांची आई) यांच्यासमवेत सितारादेवींनी नृत्याचे शिक्षण घेतले. त्यांना गुरू म्हणून पंडित सुखदेव महाराजांनी म्हणजे वडिलांनीच मार्गदर्शन केले. उच्चभ्रू समाजात मुलींनी नृत्य करणे अमान्य असल्यामुळे तत्कालीन समाजाने या कुटुंबावर बहिष्कार टाकला. परंतु या सामाजिक बहिष्काराला न घाबरता सुखदेव महाराजांनी आपल्या तीनही मुलींना नृत्याचे शिक्षण दिले.
 पं.सुखदेव महाराज सितारादेवींकडून रोज दहा ते बारा तास नृत्यसाधना करून घेत. पं. सुखदेव महाराज हे तालमींच्या बाबतीत फार कडक शिस्तीचे होते; परंतु खूप मेहनत झाल्यावर पायाला तेल चोळून देण्याएवढे त्यांचे हृदय कोमलही होते. तसेच साधनेसाठी आवश्यक ताकद मिळवण्यासाठी पौष्टिक, शक्तिवर्धक आहार मुलांना मिळाला पाहिजे, याकडेही ते कटाक्षाने लक्ष देत. गुरूंच्या कडक शिस्तीमुळे  सितारादेवींनाही  साधनेची गोडी लागली, म्हणून त्या रियाझाच्या वेळा काटेकोरपणे पाळत. एकच हालचाल शंभर वेळा करून त्यामध्ये सितारादेवी अचूकता आणण्याचा प्रयत्न करत. पायांची ताकद वाढविण्यासाठी त्या तासन्तास समुद्रकाठच्या रेतीमध्ये तत्कार करत.  सितारादेवींना पं.सुखदेव महाराजांबरोबरच कथक नृत्यातील अध्वर्यू पं.लच्छू महाराज आणि पं. शम्भू महाराज या बंधुद्वयांकडेही नृत्य शिकण्याचे भाग्य लाभले. त्यामुळे पं. लच्छू महाराजांच्या नृत्यातील लास्यांग आणि शम्भू महाराजांच्या नृत्यातील तडफ व चमक यांची प्रचिती सितारादेवींच्या नृत्यातून येते.
सितारादेवींनी कथक नृत्याव्यतिरिक्त भरतनाट्यम्, मणिपुरी या भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींचाही खोलवर अभ्यास केला. लोकनृत्य, पाश्चात्त्य नृत्यांतही त्यांना रुची होती. विविध मैदानी खेळ, पोहणे इ.चीही त्यांना आवड होती. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या सितारादेवींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपली छाप पाडली. नर्तिका म्हणूनच चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली, तसेच अभिनयातील परिपक्वतेमुळे प्रमुख नायिकेची भूमिकाही त्यांना साकारायला मिळाली.
संगीताच्या क्षेत्रातील मोठमोठ्या कलाकारांचा सहवास सितारादेवींना लाभला. पंडित रविशंकर, उस्ताद अल्लारखाँ, बडे गुलाम अली खाँ यांनी सितारादेवींच्या नृत्याचे कौतुक केले. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याकडून त्यांना क्विन ऑफ कथक डान्सही उपाधी मिळाली. त्यांनी १९६९ मध्ये बिर्ला मातोश्रीसभागृहामध्ये सलग बारा तास नृत्य करण्याचा विक्रम केला. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री’ (१९७३) बहुमान व पुढे कालिदास सन्मान’  (१९९५) मिळाला. तसेच त्यांना २००९ मध्ये संगीत नाटक अकादमी, दिल्लीतर्फे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते फेलोशिपप्रदान करण्यात आली. नृत्यशिक्षणाचा प्रसार करण्यासाठी नव्वदीच्या वयातही त्या झटत असत. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

माधुरी आपटे

 

सितारादेवी,