Skip to main content
x

अझमत हुसेन खाँ

खुर्जा अत्रौली घराण्याचे गायक अझमत हुसेन खाँ यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यात झाला. काव्य आणि संगीताचा पिढीजात वारसा त्यांना लाभला होता. त्यांचे वडील उ. खैरत अली खाँसाहेब हे उत्तम सतारिये होते. त्यांचे बरेचसे पूर्वज उत्तम बीनकार होते. तसेच उर्दू, हिन्दी, पर्शियन, अरबी, संस्कृत या भाषांचाही त्यांचा अभ्यास होता.
     उस्ताद अझमत हुसेन खाँ यांचे सुरुवातीचे संगीत शिक्षण त्यांचे मामा
, खुर्जा घराण्याचे उस्ताद अल्ताफ हुसेन खाँ यांच्याकडे झाले. त्यांना १९३० साली मुंबईला आल्यानंतर जयपूर अत्रौली घराण्याचे गायक उ. अल्लादिया खाँसाहेबांची तालीम मिळाली.   याबरोबरच आग्र घराण्याच्या उस्ताद विलायत खाँसाहेबांकडूनही त्यांना अनेक राग व बंदिशी मिळाल्या. खुर्जा, अत्रौली, आग्र या घराण्यांच्या गायकीच्या एकत्रीकरणातून घराण्याच्या परंपरागत गायनशैलीला धक्का न लावता, अझमत हुसेन यांनी स्वत:ची स्वतंत्र शैली विकसित केली. उस्ताद शब्बू हुसेन खाँसाहेब व फैय्याज खाँसाहेबांचाही प्रभाव त्यांच्या गायकीवर होता.

    ख्याल, धृपद, धमार, टप्पा, तराणा, तिरवट, दादरा, ठुमरी असे विविध गायन प्रकार ते सारख्याच तयारीने गात. मैफलीत कधीकधी मराठी पद व राजस्थानी मांडही गात असत. दुर्मीळ राग, वैविध्यपूर्ण बंदिशी, तयार तान व अतिशय गुंतागुंतीची लयकारी ही त्यांच्या गायनातील खास वैशिष्ट्ये होती.
    खाँसाहेबांना १९४० ते १९५५ या काळात बरीच लोकप्रियता लाभली. भारताच्या प्रथम वार्षिक स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या उद्घाटन समारंभाला १९४८ साली हफीज अलीखाँ, हिराबाई बडोदेकर, अहमदजान  थिरकवा  या  गायक-वादकांबरोबर अझमत हुसेन खाँ यांनाही आवर्जून आमंत्रित केले होते. खाँसाहेबांची १९५३ साली दक्षिण भारताच्या दौर्‍यात, प्रसिद्ध गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांच्याकडेही मैफल झाली. त्यांना १९५४ साली अफगाणिस्तान येथील राजा झहीर शाहच्या दरबारी आमंत्रित करण्यात आले होते.
    अझमत हुसेन हे बहुगुणी कलावंत होते. संगीताबरोबरच त्यांना काव्याचे उपजत अंगही होते. वयाच्या पंचविसाव्या वर्षी अल्लामा सीमाब अकबराबादी या उर्दू कवीच्या काव्याने प्रभावित  होऊन अझमत हुसेनांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. अझमत हुसेन यांनी मैकश अत्रौलीया टोपणनावाने अनेक गझला व काव्ये लिहिली. त्यांनी दिलरंगया नावाने विविध रागांत अनेक बंदिशी रचल्या, तसेच चंद्रजोगआणि देवता भैरवया दोन रागांची निर्मितीही केली. अझमत हुसेन यांनी दिल्ली आणि मुंबई आकाशवाणीवर संगीत निर्माता आणि सल्लागार म्हणून २५ वर्षे काम केले. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गायनशैलीमुळे तान कप्तानसंगीत सरताजअशा पदव्यांनी त्यांना सन्मानित केले गेले.
     अझमत हुसेन यांनी अनेकांना विद्यादान केले. त्यांच्या प्रमुख शिष्यांत अस्लम खाँ यांचे नाव घ्यावे लागेल. शिवाय वजाहत खाँ व रफात खाँ या दोन पुत्रांनापण त्यांची तालीम लाभली. याशिवाय पं. जितेंद्र अभिषेकी, उस्ताद युनूस खाँ, उस्ताद याकूब हुसेन खाँ, दुर्गाबाई शिरोडकर, दत्ता केरकर इ. प्रथितयश गायकांनाही त्यांची तालीम व मार्गदर्शन लाभले.
    उर्दू काव्य, शिकार, पाकशास्त्र अशा विविध गोष्टींत रस असणार्‍या अझमत हुसेन खाँ यांचे अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले. मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या स्मरणार्थ दक्षिण मुंबईतील एका रस्त्याला गायन सम्राट उस्ताद अझमत हुसेन खाँ दिलरंगअसे नाव दिले आहे. दिलरंग अकॅडमी ऑफ म्यूझिक अ‍ॅण्ड फाइन आर्ट्सया नावाने त्यांच्या शिष्यांनी व चाहत्यांनी संस्था स्थापिली असून तेथे संगीत, काव्य, साहित्य, कलाविषयक अनेक कार्यक्रम केले जातात व काही सामाजिक उपक्रमही राबवले जातात.

माधव इमारते

अझमत हुसेन खाँ