पौडवाल, अनुराधा अरुण
अनुराधा अरुण पौडवाल (पूर्वाश्रमीच्या अलका नाडकर्णी) यांचा जन्म मुंबई येथे झाला. घरामध्ये संगीताची परंपरा नसतानाही त्यांना संगीताची उपजतच विशेष आवड होती. बालवयात त्यांचा आवाज गायनासाठी अनुकूल नव्हता. पण मूलतः असलेली संगीतविषयक जाण चांगली असल्यामुळे कुठलेही गाणे त्या ऐकताक्षणी आत्मसात करत असत. त्यांचा गाण्याकडे असलेला कल पाहून त्यांच्या आईने त्यांना प्रोत्साहन दिले.
वयाच्या पाचव्या वर्षी महाराष्ट्र महिला मंडळात त्यांनी सर्वप्रथम जाहीरपणे गीत सादर केले. अलका नाडकर्णी यांनी महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स या महाविद्यालयात घेतले. त्यांना तंत्रशुद्ध संगीताचे शिक्षण जरी घेता आले नाही, तरी मान्यवर गायिकांची गाणी ऐकूनच त्यांनी स्वतःच्या आवाजाची तयारी केली. दरम्यानच्या काळात आजारी असताना त्यांच्या आवाजामध्ये आमूलाग्र बदल झाला. गाण्यांच्या विविध कार्यक्रमांत आणि वाद्यवृंदांमध्ये त्या गाऊ लागल्या. त्यांचा १९७२ साली, वयाच्या अठराव्या वर्षी संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी विवाह झाला.
साधारणपणे १९७३ च्या सुमाराला दत्ता डावजेकर यांचे संगीत असलेल्या ‘यशोदा’ या चित्रपटासाठी त्यांना पार्श्वगायनाची प्रथम संधी मिळाली. या चित्रपटातील ‘घुमला हृदयी निनाद’ आणि ‘माळते मी माळते’ ही गाणी लोकप्रिय झाली. याच वर्षी ‘अभिमान’ या अनेक कारणांनी लोकप्रिय झालेल्या हिंदी चित्रपटामध्ये त्यांना एक संस्कृत श्लोक गाण्याची संधी मिळाली. अशा प्रकारे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत हळूहळू पार्श्वगायिका म्हणून अनुराधा पौडवाल यांनी स्वतःची जागा निर्माण केली. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रमातही त्यांचा दाद देण्यासारखा लक्षणीय सहभाग होता.
एच.एम.व्ही.ने १९७४ मध्ये मराठी भावगीतांची ध्वनिमुद्रिका आणली. त्यांपैकी ‘रसिका मी कैसे गाऊ’, ‘सजणा कशासी अबोला’ यांसारख्या सुमधुर गीतांनी अनुराधा पौडवाल हे नाव रसिकांच्या मनांत कायमस्वरूपी कोरले गेले. संगीतकार अशोक पत्की यांची ‘अनुरागाचे थेंब झेलती’, ‘मी अशी ही बांधलेली’, ‘चंद्र वाटेवरी एकटा’ ही गाणी, तसेच ‘रजनीगंधा’ आणि ‘बंदिनी’ या अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांच्या ध्वनिमुद्रिकांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला.
सुरुवातीला ‘डबिंग आर्टिस्ट’ म्हणून काम करण्यास त्यांनी नकार दिला. पण बऱ्याचवेळा गायक कलाकारांना याच पद्धतीने संधी मिळते हेे लक्षात आल्यावर त्यांनी अनेक चित्रपटांच्या गाण्यांकरिता डबिंग केले. यामुळे ‘हीरो’ या चित्रपटात त्यांना पार्श्वगायनाची संधी मिळाली. संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत असतानाच १९७६ साली ‘कालीचरण’ या हिंदी चित्रपटात त्यांना पार्श्वगायनाची संधी मिळाली.
लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीने ‘आपबीती’ या चित्रपटात खऱ्या अर्थाने त्यांना स्वतंत्रपणे एकल पार्श्वगायनाची संधी दिली. पार्श्वगायिका म्हणून स्वतःला सिद्ध करताना त्यांनी ‘देस-परदेस’ (राजेश रोशन), ‘दूरीयाँ’, ‘लैला मजनू’ (जयदेव), ‘कलाकार’, ‘विधाता’(कल्याणजी-आनंदजी), ‘सौतन’ (उषा खन्ना) अशा काही प्रथितयश संगीतकारांकडे पार्श्वगायन केले. विशेष करून लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीची अनुराधा पौडवाल यांनी गायलेली गाणी सर्वाधिक लोकप्रिय झाली.
उपजत असलेली गाण्याची समज, सुमधुर आवाज, तरलता यांमुळे त्यांना संधी मिळत गेल्या. ‘तेजाब’, ‘हीरो’, ‘बंटवारा’, ‘नगीना’, ‘मेरी जंग’ (१९८५), ‘कर्मा’ (१९८६), ‘रामलखन’ (१९८९), ‘साजन’ (१९९१), ‘संगीत’ (१९९२), ‘बेटा’ (१९९२), ‘साहिबान’ (१९९३) ‘प्यार किया तो डरना क्या’(१९९८), ‘हम आपके दिल में रहते हैं’ (१९९९), ‘दाग - द फायर’ (१९९९), ‘बुलंदी’, ‘पुकार’ (२०००), ‘लज्जा’ (२००१), ‘शक्ती-द पॉवर’ (२००२), ‘मर्डर’ (२००४) अशा काही महत्त्वपूर्ण चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले.
संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याचा योग नसल्यामुळे लता मंगेशकर, आशा भोसले, मुहम्मद रफी अशा मान्यवर, तसेच प्रतिभाशाली गायकांची गाणी ऐकूनच त्यांनी रियाझ केला. स्वतःच्या मेहनतीने आणि संगीतक्षेत्रात घडणाऱ्या आणि नव्याने येऊ पाहणाऱ्या घडामोडींविषयक विचारपूर्वक चिंतनाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची जागा आणि वलय निर्माण केले.
मराठी सिनेजगताशीही त्यांचे ॠणानुबंध जोडले गेले. मूलतः आवाजात असलेला अभिनय, आवाजातील माधुर्य, संगीतावर असलेली नितांत श्रद्धा यांमुळे मराठी चित्रपटांतील त्यांनी गायलेली सुरेल गाणी घराघरांत निनादू लागली. ‘अष्टविनायक’, ‘थोरली जाऊ’, ‘हेच माझे माहेर’, ‘जावयाची जात’, ‘अरे संसार संसार’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘कळत नकळत’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘नवरा माझा नवसाचा’ अशा मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीतील यशस्वी संगीतकारांकडे गाणी गाऊन ती लोकप्रिय केली. मराठी आणि हिंदीबरोबरच त्यांनी नेपाळी, ओरिया, गुजराती, भोजपुरी व बंगाली चित्रपटांसाठीही पार्श्वगायन केले.
अरुण पौडवाल यांचे १ नोव्हेंबर १९९१ साली अकाली निधन झाले. कालांतराने चित्रपट निर्माते गुलशन कुमार यांच्याबरोबर त्यांचे सूर जुळले. ‘लाल दुपट्टा मलमल का’, ‘आशिकी’, ‘दिल है कि मानता नहीं’, ‘मीरा का मोहन’ या नव्या धर्तीच्या चित्रपटांबरोबरही अनुराधा पौडवाल हे सुरेल नाव जोडले गेले आणि पुन्हा एकदा नव्याने यशाचा मार्ग खुला झाला. साधारणतः २००५ साली आलेल्या ‘कलयुग’ या चित्रपटापर्यंत त्यांचा पार्श्वगायनाचा प्रवास सुरू राहिला. याशिवाय त्यांच्या ‘शिवभजन’, ‘जय अंबे गौरी’, ‘गायत्रीमंत्र’, ‘महालक्ष्मी अमृतवाणी’, ‘ओम गंगा माँ’ या भक्तिरसपूर्ण ध्वनिमुद्रिका, तसेच समर्थ रामदासांचे ‘मनाचे श्लोक’ आणि ‘करुणाष्टका’च्या ध्वनिमुद्रिकाही उपलब्ध आहेत.
आजवरच्या कामाची पावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘उत्सव’ या १९८६ साली आलेल्या चित्रपटातील ‘मेरे मन बजा मृदंग’ या गीताला ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘आशिकी’ (नजर के सामने) १९९१ साली , १९९२ साली ‘दिल है कि मानता नहीं’ या शीर्षकगीतासाठी आणि १९९३ साली ‘बेटा’ (धक धक करने लगा) या गीतांसाठी अशी सलग तीन वर्षं त्यांना उत्कृष्ट पार्श्वगायनाकरिता फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले. याशिवाय ‘कळत नकळत’ (१९८८) या मराठी चित्रपटातील ‘हे एक रेशमी घरटे’ या गीतासाठी त्यांना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. संगीत क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानासाठी २०११ साली ‘मदर तेरेसा जीवन गौरव’ पुरस्कारही त्यांना देण्यात आला. २०१७ साली त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एका दिवसात नऊ गाण्यांचे रेकॉर्डिंग करणाऱ्या त्या एकमेव गायिका आहेत.
गायिका कविता पौेडवाल आणि संगीतकार आदित्य पौडवाल या दोन्ही मुलांना त्यांचा संगीताचा वारसा लाभला. त्यांच्या आधीच्या आणि नंतरच्या पिढीचे सांगीतिक काम जवळून पाहिल्यामुळे आणि प्रत्यक्ष अनुभवांमुळे आज अनुराधा पौडवाल नव्या संगीतप्रवाहाचे अवलोकन प्रगल्भतेने करताना दिसतात. याखेरीज त्यांनी समाजकार्याला वाहून घेतले आहे. त्यांनी त्यासाठी सूर्योदय फौंडेशन नावाची संस्था स्थापन केली आहे.
२.www.anuradhapaudwal.com
३.www.arunpaudwal.com