Skip to main content
x

अब्दुल, हलीम जाफर खाँ

ब्दुल हलीम जाफर खाँ यांची कर्मभूमी मुंबई असली तरी त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील जावरा इथे झाला. उस्तादजींची घराणेदार संगीताची तालीम अगदी त्यांच्या जन्मापासूनच सुरू झाली. त्यांचे वडील उस्ताद जाफर खाँ हे इंदूर घराण्याचे बीनकार होते. घरातच संगीत असल्यामुळे अगदी पाचव्या वर्षीच उस्तादजींचे कंठसंगीत आणि सतार या दोन्हींचे शिक्षण सुरू झाले.
     एकीकडे वडिलांकडून तालीम घेत असतानाच दुसरीकडे त्यांना नावीन्याची ओढ वाटू लागली. त्यांच्या अत्यंत सर्जनशील मनाने नव्याचा ध्यास घेत कर्नाटक संगीतातले किरवाणी’, ‘लतांगीवगैरे राग एका अनोख्या सौंदर्यदृष्टीने पेश केले. त्याच शोधयात्रेमध्ये त्यांनी कल्पना’, ‘शरावती’, ‘मध्यमीवगैरे सदाबहार रचनाही बांधल्या. प्रतिभेच्या चौफेर भरारीने उस्तादजींना काळाच्या पुढे जाण्याची कल्पनाशक्ती दिली आहे. याचा प्रत्यय त्यांच्या एच.एम.व्ही.ने काढलेल्या सितार क्विंटेटया ध्वनिमुद्रिकेत दिसून येतो. यातल्या रचना जाणकारांना थक्क करतात. उ. अब्दुल हलीम जाफर खाँ यांनी स्वतंत्र प्रतिभेतून एक लालित्यपूर्ण, आगळीवेगळी शैली निर्माण केली. सतारीची अंगभूत वैशिष्ट्ये, बीनचे तंत्र आणि कंठसंगीतातले बारकावे या तिन्हींचा मनोहारी मिलाफ या शैलीमध्ये दिसून येतो. भारतीय शास्त्रीय संगीतात वापरल्या जाणार्‍या मींडया महत्त्वाच्या आविष्कारासाठी सतारीवर वापरल्या जाणार्‍या खेचकामतंत्राचा अतिशय बारकाईने केलेला विचार, विशेषत: उलटी मींडया तंत्रावर उस्तादजींनी मिळवलेला हुकमी ताबा याबरोबरच सतारवादनाच्या पारंपरिक तंत्रामध्ये त्यांनी घातलेली अनेक नव्या तंत्रांची भर, अशा अनेकविध अंगांनी उस्तादजींनी आपली शैली समृद्ध केली. जाफरखानी बाजया नावाने या शैलीला रसिकमान्यता मिळाली.
    उस्तादजींची संगीत क्षेत्रातली कामगिरी सर्वस्पर्शी आहे. ते शास्त्रीय संगीताशी निगडित अनेक समितींचे सभासद होते. ते फिल्म सेन्सॉर समितीच्या सभासदही होते. तसेच त्यांनी आकाशवाणीच्या निवड समितीमध्ये बहुमोल कार्य केले आहे.
    ‘अतिथी गुरूम्हणून बडोदा, खैरागड, दिल्ली इत्यादी विद्यापीठांत उस्तादजींनी ज्ञानदान केले आहे. देशातल्या महत्त्वाच्या संगीत समारंभांबरोबरच परदेशांतही त्यांनी आपल्या अनोख्या शैलीने रसिकांना मोहित केले आहे. इंग्लंड, चीन, आफ्रिका, बांगला देश, अफगाणिस्तान, अमेरिका, मॉरिशस वगैरे देशांमधून त्यांची सतार झंकारली आहे.
    सर्वस्पर्शी प्रतिभेचे वरदान मिळालेल्या उस्तादजींनी आपली प्रतिभा फक्त शास्त्रीय संगीताच्या चौकटीतच बंदिस्त करून ठेवली नाही. हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातली सदाबहार गाणी त्यांच्या सतारीच्या सुरांनी रत्नजडित झाली आहेत. उदाहरणादाखल, ‘कोहिनूर’, ‘अनारकली’, ‘मुगल-ए-आझम’, ‘झनक झनक पायल बाजेहे त्यांपैकी काही गाजलेले चित्रपट होत. उस्तादजींनी इतर भारतीय वाद्यांबरोबर केलेले सहवादन रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवून गेले. पं. शंकर शास्त्रींची वीणा, उ. बिस्मिल्ला खाँ साहेबांची शहनाई, पं. रामनारायण यांची सारंगी अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर उस्तादजींनी जुगलबंदी सादर केलीआहे. तसेच, अमेरिकेत जॅझ संगीत आणि सतारवादन यांचा एकत्र मेळ घालण्याचा अभिनव प्रयोगही त्यांनी केला आहे.
    उस्तादजींच्या अनेक तबकड्या, ध्वनिफिती व ध्वनिचकत्या रसिकांच्या खजिन्यात मानाचे स्थान मिळवून आहेत. अरज, आरभी, जैताश्री, चांदनी केदार, लतांगी इत्यादी रांगांमध्ये त्यांच्या खास रचना उपलब्ध आहेत. या सगळ्यांत त्यांची पहाडीची तबकडी प्रचंड गाजली. त्यांच्या जाफरखानी बाजया वैशिष्ट्यपूर्ण शैलीबद्दलची संपूर्ण माहिती देणारे पुस्तक जाफरखानी बाजया नावानेच प्रसिद्ध आहे. सतार शिकणार्‍या विद्यार्थ्यांना ते खूपच मार्गदर्शक ठरत आहे. उस्तादजींनी हलीम अकॅडमी ऑफ सितारस्थापन केली आहे. या माध्यमातून होतकरू, गुणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे ज्ञानसत्र अखंड चालू आहे.
    उस्तादजींना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, बंगाल, उत्तरप्रदेश, दिल्ली वगैरे राज्यांमधून त्यांना सन्मानाचे शिरपेच  मिळाले. भारत सरकारने पद्मश्री’ (१९७०), तसेच संगीत नाटक अकादमी (१९८७) आणि २००६ साली पद्मभूषणपुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव केला आहे.

उस्ताद उस्मान खाँ

अब्दुल, हलीम जाफर खाँ