अल्लादिया खाँ
उ. अल्लादिया खाँ साहेबांचा जन्म उनियारा येथे एका नामवंत कलाकार कुटुंबात झाला. नाथ विश्वंभर हे त्यांच्या घराण्याचे मूळ पुरुष होत. ते पूजाअर्चा, मंत्रपठण आदी रागरागिण्यांमध्येच करत असत. तानसेनचे गुरू हरिदास स्वामी हेसुद्धा याच वंशातील होते. काळाच्या ओघात पुढे काही कारणास्तव खाँ साहेबांचे पूर्वज मुसलमान झाले. खाँ साहेबांचे वडील ख्वाजा अहमद खाँ हे उनियारा येथे दरबारी गायक होते. त्यांची पहिली काही अपत्ये अल्पवयातच मृत्यू पावली. अवलियांच्या कृपेने खाँ साहेबांचा जन्म झाला म्हणून ख्वाजा अहमदखाँनी मुलाचे नाव गुलाम अहमद असे ठेवले; परंतु ‘अल्ला का दिया’ म्हणून त्यांचे नाव ‘अल्लादिया’ असे झाले व पुढे याच नावाने ते प्रसिद्ध झाले.
अल्लादिया खाँसाहेबांना पैतृक घराण्याच्या बरोबरीने मातुल घराण्याकडूनही संगीताचा वारसा मिळाला. मातुल घराण्यातील पूर्वज गोबरहार वाणीचे गायक होते. दिल्ली व इतर दरबारांत मानसन्मान मिळवून ते उनियारा येथे स्थायिक झालेे. काका उ. जहांगीर खाँ हे उत्तम गाणारे व उ. ख्वाजा अहमद खाँ यांचे शिष्य, त्यामुळे खाँसाहेबांना संगीताचे शिक्षण घरीच मिळाले. त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षी वडिलांचा मृत्यू झाला. त्या वेळी ख्वाजा अहमद खाँ टोक दरबारात दरबारी गायक होते. पाठच्या दोन बहिणी, एक भाऊ उ. हैदर खाँ, आई व इतर नातेवाईक यांची जबाबदारी खाँसाहेबांवर येऊन पडली.
खाँसाहेबांना गाण्यापेक्षा अरबी, फारसी भाषा शिकण्याचा छंद जडला होता. तथापि, घरची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी घरच्याच कलेचा अभ्यास करावयाचा असे ठरविले व काका उ. जहांगीर खाँ यांच्याकडे त्यांची संगीताची तालीम सुरू झाली. गुरूवरील अविचल निष्ठा, अपार कष्ट करण्याची वृत्ती, सौंदर्याचा वेध घेणारी प्रज्ञा, गुरूंची तालीम व आजूबाजूचे वातावरण यांमुळे खाँसाहेब एक तयार मैफली कलाकार झाले. काका उ. जहांगीर खाँ त्यांना आपल्या गायकीचा वारसदार समजत.
उ. जहांगीर खाँसाहेबांकडून त्यांना एक तप तालीम मिळाली. सुरुवातीला पाच ते सहा वर्षे धृपद-धमाराची तालीम मिळाली. खाँसाहेबांनी हजारो धृपद व धमार कंठगत केल्यानंतर ख्यालगायन शिकवायला सुरुवात केली. उ. जहांगीर खाँ यांच्या पाठीमागे तंबोऱ्यावर साथ करणे हा अल्लादिया खाँचा नित्याचा कार्यक्रम झाला. रामपूरच्या नवाबांचे बंधू कल्लन खाँ हे जयपूरमध्ये असताना प्रसिद्ध गवय्ये उ. मुबारक अली खाँ कल्लन खाँच्या भेटीसाठी येत असत. अल्लादिया खाँसाहेबांच्यावर त्यांचा अतिशय प्रभाव पडला. जयपूर येथेच त्यांनी तानरस खाँ, हद्दू खाँ व मुबारक अली खाँ यांचा चुरशीचा सामना ऐकला होता.
काका उ. छम्मन खाँ यांच्या मुलीशी विवाह करून त्यांनी जोधपुरात वैवाहिक जीवनास प्रारंभ केला. १८८६ साली पहिले चिरंजीव नसरुद्दीन ऊर्फ बडेजी, १८८८ मध्ये मधले चिरंजीव बद्रुद्दिन ऊर्फ मंजी खाँ व १८९० मध्ये धाकटे चिरंजीव शमशुद्दीन ऊर्फ भुर्जी खाँ यांचा जन्म झाला.
खाँसाहेब प्रथितयश गायक म्हणून नावलौकिक मिळवत असतानाच एक दुर्दैवी घटना घडली. आमलेटा संस्थानात खाँसाहेबांच्या गळ्यावर अतिरिक्त ताण पडला. त्यांचा आवाज चिप्प बसला व गाणेही अशक्य झाले. पुढे जोधपूर येथे आल्यावर निकराच्या प्रयत्नाने दोन वर्षांनी त्यांचा आवाज सुटला, तथापि त्यातली ऊर्जा नाहीशी झाली होती. पण तीव्र बुद्धीचे वरदान असलेल्या खाँसाहेबांनी गोड आवाजाची गायकी बाजूला सारून नव्या वळणाची बुद्धिप्रधान, पेचदार गायकी निर्माण केली. मींड, गमकयुक्त गायकी, तीही शुद्ध आकारात व संथ लयीत असल्यामुळे त्या गायकीला भारदस्तपणा प्राप्त झाला. त्यांच्या रुंद, कमवलेल्या आवाजाला ही गायकी अतिशय अनुकूल होती. त्यांची ‘हिक्के की तान’ ही त्यांच्या रियाजाचा परिपाक होती. खाँसाहेबांना उर्दू, ब्रज भाषा उत्तम अवगत असल्यामुळे बोलांचे उच्चार ही त्यांची स्वत:ची खासियत होती. तान हा तर त्यांच्या गायनाचा उत्कृष्ट नमुना होता. या तानेवर मुबारक अली खाँसाहेबांचा विलक्षण प्रभाव जाणवत असे.
खाँसाहेब अतिशय धोरणी व बुद्धिमान होते. त्यामुळे आपल्या आवाजाला साजेशी गायकी, तीही इतरांपेक्षा वेगळी अशी असावयाला हवी याचा विचार करून रसिकांना स्तिमित करणारी गायकी निर्माण करून त्यांनी खरे तर क्रांतीच केली. नंतर खाँसाहेब इंदूर, अहमदाबाद व बडोदा येथे आले. बडोदे संस्थानात त्यांना दरबारगायक होण्याची इच्छा होती. त्यांच्या गायकीवर राजेसाहेब खूशही होते. तथापि उ. मौलाबक्ष यांच्या कारवायांमुळे ते तेथून बाहेर पडले व मुंबईला आले. त्या वेळी मुंबईत भेंडीबाजारघराण्याचे उ. नजीर खाँ, उ. छज्जू खाँ व उ. खादिम हुसेन खाँ ही त्रयी आपला प्रभाव राखून होती. उ. अल्लादिया खाँना त्यांचाही विरोध सहन करावा लागला.
पुढे १८९५ साली श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरला दरबारी गवई म्हणून आणले. ते कोल्हापूरचेच झाले आणि महाराष्ट्र त्यांची खऱ्याअर्थाने कर्मभूमी झाली. प्रचंड मेहनतीने कमावलेल्या दमसासयुक्त गायकीचे दर्शन त्यांच्या विलंबित लयीत ठसठशीतपणे जाणवे. विलंबित लय व आकारयुक्त आलापिका यांमुळे आलेला भारदस्तपणा किंवा बोजदारपणा हा त्यांच्या गायकीचा प्राण ठरला. या दोन बाबींमुळे त्यांच्या गायनात अतूटता आली. बलपेचाची तान हा तर खाँसाहेबांच्या गायकीचा प्राण होता. स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी खाँसाहेबांनी झुमरा, तिलवाडा या तालांऐवजी विलंबित त्रिताल, आडाचौताल, झपताल, रूपक हे ताल कलाविष्कारासाठी निवडले. त्याच बरोबरीने प्रचलित रागांपेक्षा अनवट व मिश्रराग खाँसाहेबांनी स्वसामर्थ्यावर लोकप्रिय केले. सावनी, नट, खोकर, बिहागडा, काफी कानडा, तोडी व बहारचे विविध प्रकार, ललिता गौरी यांसारखे जोडराग, त्रिवेणी, टंकेश्री, लंकेश्री असे अनोखे राग त्यांनी प्रचारात आणून लोकप्रिय केले.
जोडराग गात असताना त्या रागांचा सांधा ते असा बेमालूमपणे जोडत असत, की दोन्ही राग एकजीव होत असत. आलाप व तानेमध्येही हा एकजिनसीपणा दिसत असे. ‘डागुरी’सारख्या काही रागांची निर्मिती त्यांनी केली. ‘अहमदपिया’ या मुद्रेने त्यांनी अनेक बंदिशी रचल्या. जयपूर, जोधपूर, बडोदा, अहमदाबाद, इंदूर, कलकत्ता, नेपाळ, आमलेटा, महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी अनेक मैफली करून खाँसाहेबांनी रसिकांना मंत्रमुग्ध करून आपली गायकी प्रस्थापित केली. याच गायकीला कोल्हापूर गायकी (कोल्हापूर घराणे) असेही म्हटले जाते. कारण खाँसाहेबांची करवीर ही कर्मभूमी ठरली. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असेपर्यंत (१९२२ सालापर्यंत) ते तेथेच राहिले. नंतर ते मुंबईला स्थायिक झाले. त्यांची शिष्यपरंपराही मोठी आहे.
तानीबाई कागलकर, आग्र व ग्वाल्हेर घराण्यांची तालीम घेतलेले पं. भास्करबुवा बखले, केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, गोविंदबुवा शाळीग्रम, गुलूभाई जसदनवाला, सुशीलाराणी पटेल, वामनराव सडोलीकर, शंकरराव सरनाईक, लीलाताई शिरगावकर, निवृत्तीबुवा सरनाईक यांसारख्या अनेक शिष्यवरांनी त्यांची गायकी त्यांच्या हयातीतच लोकप्रिय केली. खाँसाहेबांची ही गायकी महाराष्ट्रात रुजली व तिचा प्रभाव आजही जनमानसावर आहे.
स्वत:च्या तपश्चर्येने ते ‘संगीतमहर्षी’ या पदाला पोहोचले, तर बॅ. जयकरांनी त्यांना ‘संगीतातील गौरीशंकर’ या उपाधीने गौरविले. खाँसाहेबांच्या मुळात उर्दूमध्ये असलेल्या अप्रकाशित आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद ‘माय लाइफ’ या नावाने २००० साली प्रकाशित झाला. त्यांच्या स्मृतिनिमित्त चेंबूर येथे दरवर्षी संगीत महोत्सव आयोजित केला जातो.