Skip to main content
x

हुसेन, अमीर अहमद बक्श

अमीर हुसेन खाँ

उ. अमीर हुसेन खाँ यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील बनखंडा या गावात झाला. त्यांचे वडील उ. अहमद बक्श हे नाणावलेले  सारंगीवादक होते. हैदराबादच्या निझामाने त्यांची दरबारवादक म्हणून नियुक्ती केल्यामुळे हे कुटुंब हैदराबाद येथे स्थलांतरित झाले.
वडिलांनी छोट्या अमीरला पाचव्या वर्षापासून सारंगीचे पाठ द्यावयास सुरुवात केली; परंतु त्यांचा ओढा तबल्याकडे आहे हे जाणवल्यामुळे त्यांनी त्याचे तबल्याचे प्राथमिक शिक्षण सुरू केले. उस्ताद उ. अहमद बक्शांचे मेहुणे उ. मुनीर खाँ हे एक विद्वान तबलावादक होते. एकदा ते आपल्या बहिणीकडे हैदराबादला आले असता, त्यांनी छोट्या अमीरचा लयदार ठेका ऐकला व त्याला तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या सहा महिन्यांच्या मुक्कामात त्यांनी अमीरला बरेचसे  शिकवले व भरपूर रियाज करवून घेतला; मात्र हे शिक्षण दोन ते तीन महिनेच होते.
अमीर हुसेन खाँ वयाच्या अठराव्या वर्षी १९१८ साली मुंबईला आले. उ. मुनीर खाँचे वास्तव्य त्या वेळी मुंबईत होते. त्यांनी १९१७ ते १९३७ म्हणजेच उ. मुनीर खाँ यांच्या मृत्यूपर्यंत सुमारे वीस वर्षे गुरुगृही राहून विद्याग्रहण व रियाज केला.  उस्तादांच्या सांगण्यावरून अमीर हुसेन खाँ यांनी १९३५ साली मध्यप्रदेशातील रायगडचे महाराज राजा चक्रधर सिंह यांच्या दरबारात आठवडाभर रोज तबलावादन केले.
उस्तादांच्या मृत्यूनंतर अमीर हुसेन खाँ हैदराबादला गेले. ते १९४५ साली एका कार्यक्रमासाठी मुंबईला आले. त्यांच्या वादनाने भारावून जाऊन पंढरीनाथ नागेशकर, गुलाम रसूल, शरीफ अहमद व जमाल खाँ यांनी त्यांचे गंडाबंध शिष्यत्व पत्करून त्यांना मुंबईत आग्रहाने ठेवून घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत सुमारे चोवीस वर्षे त्यांचे वास्तव्य मुंबईतच होते. अभिजात खानदानी तबल्याचा, विशेषत: एकल तबलावादनाचा प्रचार करण्याचा उ. मुनीर खाँ यांचा वारसा त्यांनी पुढे चालवला. अधूनमधून ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी हैदराबादेस जात. त्या वेळी ते व त्यांचे पीरभाई उ. अहमदजान थिरकवा, फरूखाबादचे सुप्रसिद्ध तबलानवाझ मियाँ चूडियावाले इमाम बक्श यांचे पुत्र उ. हैदर बक्श खाँ यांच्याकडे बुजुर्गांच्या दुर्मीळ बंदिशी शिकण्यास जात.
उ. मुनीर खाँ यांचे पुतणे उ. गुलाम हुसेन हेसुद्धा हैदराबाद येथे स्थायिक झाले होते. तेही उ. मुनीर खाँ यांचे शागिर्द होते. परंपरेनुसार घराण्याच्या खलिफापदाचा मान त्यांचा होता. परंतु उ. अमीर हुसेन खाँ यांची अलौकिक प्रतिभा, विद्वत्ता, रियाज व वादनातील कर्णमाधुर्य या गुणांमुळे उ. मुनीर खाँ यांनी त्यांनाच खलिफापद बहाल केले. उ. अमीर हुसेन खाँ यांनी जुन्या पारंपरिक रचनांमध्ये स्वरचित असंख्य रचनांची भर घातली. या रचना परंपरेला अनुसरून बांधलेल्या असल्या तरीही अत्यंत सुंदर व चमत्कृतिपूर्ण आहेत.
उ. अमीर हुसेन खाँ यांचा उर्दू व फारसी या भाषांचा चांगला अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी अत्यंत जुन्या संगीतविषयक ग्रंथांचा अभ्यास केला होता. तबल्याची भाषा, व्याकरण, तबल्यातील संज्ञांच्या व्याख्या वगैरे गोष्टींवर त्यांनी खूप विचार केला होता. ते कुरेशी ज्ञातीचे चौधरी होते. ते अतिशय निष्पक्षपणे न्यायनिवाडा करीत असत. जात-धर्म-लिंग हा भेदभाव न ठेवता त्यांनी केलेली मानवतेची सेवा त्यांच्या प्रसिद्धिपराङ्मुख स्वभावामुळे जगापुढे आली नाही.
त्यांनी शेकडो शिष्य तयार केले. त्यांच्या प्रथितयश शिष्यांमध्ये पंढरीनाथ नागेशकर, गुलाम रसूल, जमाल खाँ, सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक गुलाम मुहंमद, निखिल घोष, आत्माराम थत्ते, फकीर हुसेन, पांडुरंग साळुंके, माधव पवार, सदाशिव पवार, अरविंद मुळगावकर यांचा समावेश आहे.

अरविंद मुळगावकर

हुसेन, अमीर अहमद बक्श