Skip to main content
x

गायतोंडे, विकास मंगेश

          दृक्संवादकलेतील संकल्पन-कार विकास मंगेश गायतोंडे यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून १९७३ साली त्यांनी जी.डी. आर्ट (अप्लाइड) ही पदविका संपादन केली. जे.जे.मध्ये विद्यार्थीअसताना त्यांच्यावर षांताराम पवार आणि सुरेश देसाई ह्यांचा कलाशिक्षक म्हणून विशेष प्रभाव पडला. जे.जे.मधून बाहेर पडल्यावर गायतोंडे यांनी अनेक प्रथितयश जाहिरात कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर नोकर्‍या केल्या आणि जाहिरात क्षेत्रात आपल्या कल्पक प्रतिभेने स्वतंत्र स्थान निर्माण केले.

          ‘चैत्र’ (आताची लिओ बर्नेट) या जाहिरातसंस्थेत त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ‘जे. वॉल्टर थॉम्पसन’च्या दिल्ली शाखेत ते वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी चीफ आर्ट डायरेक्टर झाले. ‘त्रिकाया’ जाहिरात संस्थेच्या स्थापनेत रवि गुप्ता यांच्याबरोबर गायतोंडे यांचाही वाटा होता. तिथे ते नॅशनल क्रिएटिव्ह डायरेक्टर होते. नंतर ही जाहिरातसंस्था ‘ग्रे वर्ल्डवाइड’ ह्या कंपनीत विलीन झाली. ‘मेकॅन एरिक्सन’, ‘साची अ‍ॅण्ड साची’ ह्या आंतरराष्ट्रीय जाहिरातसंस्थांमधूनही त्यांनी उच्चपदांवर काम केले. आता ते स्वतःची ‘विकास गायतोंडे कन्सल्टन्सी’ चालवतात. गायतोंडे जवळपास सदतीस वर्षे जाहिरात आणि दृक्संवादकलेच्या क्षेत्रात एक सर्जक तज्ज्ञ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

          या चार दशकांत राजकीय, आर्थिक क्षेत्रात मोठे बदल घडून आले. जाहिरात क्षेत्र हे सत्तरच्या दशकात मुद्रणकेंद्रित होते. नंतर आकाशवाणी, दूरदर्शन इंटरनेट अशी माध्यमांची विविधता येत गेली. उत्पादनांच्या जाहिरातींबरोबरच करमणूक उद्योग, समारंभांचे आयोजन (इव्हेंट मॅनेजमेंट), राजकीय निवडणुका यांच्यासाठी जाहिरातींबरोबरच दृक्संवादकलेच्या इतर अंगांची गरज भासू लागली. मध्यमवर्गाची वाढती सुबत्ता, जागतिकीकरणामुळे बदललेली अभिरुची यांचा जाहिरात संकल्पनावर परिणाम होऊ लागला. 

          या पार्श्वभूमीवर विकास गायतोंडे यांनी केलेल्या कामाची विभागणी चार प्रकारांमध्ये करता येईल. जाहिरातींची कामे, ब्रॅण्ड डिझाइनिंग, चित्रपट आणि एशियाड क्रीडा स्पर्धा, तसेच राजकीय पक्षाच्या निवडणुकांची कामे. जाहिरातीच्या क्षेत्रात ओडोनिल, हॉर्लिक्स, गुजरात अंबुजा सिमेंट, विविध मोटारींचे ब्रॅण्ड्स, थम्स अप अशा अनेकविध उत्पादनांची जाहिरात आणि सादरीकरण (ब्रॅण्ड लाँच) त्यांनी यशस्वीपणे केले. ब्रॅण्ड डिझाइनिंग हा अधिक व्यापक असा दृक्संवादकलेमधला महत्त्वाचा भाग होय. विकास गायतोंडे यांनी ‘ओपेल अ‍ॅस्ट्रा’, ‘सॅन्ट्रो’ अशा भारतीय बाजारपेठेत नव्याने आलेल्या मोटारींचे ब्रॅण्ड डिझाइनिंग केले. चित्रपट अभिनेता शाहरूख खानला ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर बनवून ‘सॅन्ट्रो’ला एक वेगळी ओळख दिली. ‘एरियल डिटर्जंट’, ‘हेड अ‍ॅण्ड शोल्डर’, टाटा इंटरनॅशनलचे ‘ताशी’ फुटवेअर अशा उत्पादनांचे बॅ्रण्ड प्रस्थापित केले.

          गायतोंडे यांच्या जाहिरातींचे संकल्पन विचारपूर्वक केलेले असले, तरी त्यांचे सादरीकरण अतिशय साधे, पण थेट संवाद साधणारे असते. त्यामुळे त्यांच्या जाहिरातींना वर्तमानाचा ताजेपणा आणि सार्वकालिक अभिजाततेचा स्पर्श झालेला असतो. मग त्या ओडोनिल, हॉर्लिक्ससारख्या जाहिराती असोत, की थम्स अप, एशियाड, गांधी चित्रपट यांची आयकॉन्स झालेली बोधचिन्हे असोत. ‘मिड डे’तर्फे २००० साली ‘अ‍ॅड ऑफ द सेन्च्युरी’ म्हणून गौरविण्यात आलेली जाहिरात याचे उत्तम उदाहरण आहे. या जाहिरातीत ‘न्यूड मॉडेल्स वॉन्टेड’ अशी मोठी स्लोगन आहे आणि खाली बारीक अक्षरांत ८ ते १० महिने वयाची लहान मुले असा उल्लेख आहे. ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीच्या जाहिरातींसाठी लहान मुले मॉडेल्स म्हणून हवी असल्याची ही जाहिरात. आकर्षक स्लोगन, वाचकांच्या अपेक्षाभंगातली निरागसता यांमुळे ती प्रभावी झाली आहे.

          विकास गायतोंड्यांना त्यांच्या जाहिरात क्षेत्रातील कामासाठी शंभरहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. ‘मॉरिशस टूरिझम’साठी केलेल्या जाहिरात मोहिमेला न्यू यॉर्कच्या ‘वन शो अ‍ॅन्युअल’मध्ये दोनदा पुरस्कार मिळाला, तर ‘डी अ‍ॅण्ड एडी’चे बहुमानाचे अवॉर्ड मिळवणारे ते पहिले भारतीय होते.

          ग्रहकोपयोगी उत्पादनांपेक्षा वेगळ्या प्रकारच्या उपक्रमांसाठी गायतोंडे यांनी काम केले. त्यांपैकी एशियाड क्रीडा स्पर्धा आणि इंदिरा गांधी यांच्या १९८० सालच्या जनता राजवटीनंतरच्या निवडणुकांसाठी केलेल्या जाहिरात मोहिमा यांनी एक नवा प्रवाह आणला. एशियाड क्रीडा स्पर्धा भारताच्या क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाच्या ठरल्या त्या रंगीत दूरदर्शनच्या आगमनामुळे आणि भारताची बहुराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा आयोजक म्हणून प्रतिमा उंचावल्यामुळे. ही प्रतिमा निर्माण करण्याचे काम जाहिरातींच्या माध्यमातून गायतोंडे यांनी जे. वॉल्टर थॉम्पसनमध्ये असताना केले. 

          एशियाडच्या कामामुळे इंदिरा गांधींनी त्यांच्या परदेशी दौर्‍याची डिझाइनिंगची व्यक्तिगत कामेही गायतोंडे यांच्याकडे विश्वासाने सोपवली. इतकेच नव्हे, तर पूर्णतः व्यावसायिक पद्धतीने हाताळलेली अशी निवडणुकीतील काँग्रेस प्रचाराची जाहिरात मोहीम आखण्याचे काम गायतोंडे यांच्याकडेच आले. हिंदुस्थान थॉम्पसन असोशिएट्स (एच.टी.ए.) या जाहिरातसंस्थेतील अ‍ॅडव्हर्टायझिंग एक्झिक्युटिव्ह रोमी चोप्रा ह्यांचे गांधी परिवाराशी जवळचे संबंध होते. १९८० च्या निवडणुकीत जनता पक्षाचे जाहिरात मोहिमेचे काम ‘उल्का’ या संस्थेकडे दिले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून रोमी चोप्रा, कॉपिरायटर क्वेंटिन कोएल्हो आणि गायतोंडे अशा तिघांनी इंदिरा काँग्रेससाठी जाहिरात मोहीम आखली आणि ती यशस्वी केली. ‘इलेक्ट अ गव्हर्नमेन्ट दॅट वर्क्स’ हे या मोहिमेतले घोषवाक्य खूपच प्रभावी ठरले. राजकीय पक्षांनी प्रचारासाठी जाहिरातमाध्यमाचा उपयोग करण्याची सुरुवात १९६२ च्या लोकसभा निवडणुकांपासून झालेली होती; पण प्रसारमाध्यमांचा खर्‍या अर्थाने उपयोग १९८० नंतर सुरू झाला.

          चित्रपटासाठी जाहिरात मोहीम आणि ब्रॅण्ड म्हणून त्यांचे सादरीकरण होऊ लागले ते ऐंशी आणि नव्वदच्या दशकात. हॉलिवुडचे चित्रपटनिर्माते भारताकडे एक मार्केट म्हणून बघू लागले तेही याच काळात. बॉलिवुडलाही भारताबाहेर मोठा प्रेक्षकवर्ग मिळू लागला. त्यामुळे एकेकाळी शिळामुद्रण पद्धतीने छापलेली पोस्टर्स किंवा हाताने रंगवलेले चित्रपटांचे बॅनर्स जाऊन त्यांची जागा छायाचित्रांच्या डिजिटल प्रिंट्स आणि मागच्या बाजूने प्रकाश योजना असलेली बॅकलिट व्हिनाइल होर्डिंग्ज यांनी घेतली. गायतोंडे यांनी अशी व्हिनाइल होर्डिंग्ज भारतात प्रथम आणली ती धर्मेंद्रच्या विजेता फिल्म कंपनीसाठी. रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटाची ब्रॅण्ड आयडेंटिटी आणि जाहिरात- मोहीम गायतोंडे यांनी केली. त्यानंतरही जेम्स बाँड, स्पायडरमॅनसारख्या अनेक हॉलिवुड चित्रपटांचे भारतातील सादरीकरण गायतोंडे यांनी केले. विकास गायतोंडे एक तज्ज्ञ सल्लागार म्हणून जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहेत.

- दीपक घारे, रंजन जोशी

गायतोंडे, विकास मंगेश